TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ७६४ ते ७८०

अप्रसिद्ध अभंग - अभंग ७६४ ते ७८०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


अप्रसिद्ध अभंग

७६४

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।

रत्नकीळ फांकती प्रभा ।

अगणित लावण्य तेज पुंजाळलें ।

न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।

त्यानें मज लाविलें वेधी ।

खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी ।

आळविल्या साधुनेदी ॥२॥

शब्देंवीण संवादु दुजेवीण अनुवादु हें तव कैसेनि गमे ।

परेहि परते बोलणे खुंटले ।

वैखरी कैसेनि सांगे ॥३॥

पायां पडू गेलों तंव पाउलचि न दिसे ।

उभाची स्वयंभु असे ।

समोर कीं पाठीमोरा न कळे ।

ठकचि पडिले कैसें ॥४॥

क्षेमालागीं जीव उतावीळ माझा ।

म्हणवुनि स्फुरताती बाहो ।

क्षेम देऊं गेलें तव मीची मी एकली ।

आसवला जीव राहो ॥५॥

बापरखुमादेविवरु ह्रदयींचा जाणुनी अनुभवु सौरसु केला ।

दृष्टीचा डोळा पाहूं गेलें ।

तंव भीतरी पालटु झाला ॥६॥

७६५

अनुपम्य मनोहर ।

कांसे शोभे पितांबर ।

चरणीं ब्रिदाचा तोडर ।

देखिला देवो ॥१॥

योगियाची कसवटी ।

दावितसे नेत्रपुटीं ।

उभा भीवरेच्या तटी ।

देखिला देवो ॥२॥

बापरखुमादेविवरु ।

पुंडलिका अभयकरु ।

परब्रह्म साहाकारु देखिला देवो ॥३॥

७६६

नाहीं जाती कूळ तुझें म्या पुसिले ।

परि मन मावळलें देखोनिया ॥१॥

तुझेंचि कुवाडें संगिन तुजपुढें ।

तेणें मुक्तीची कवाडे उघडती ॥२॥

दुजापाशी सांगतां वाटे लाजिरवाणें ।

हांसतील पिसुणें प्रपंचाची ॥३॥

आतां उगवितांचि भले नुगवितां सापंडलें ।

ज्ञानदेव बोले निवृत्तीशीं ॥४॥

७६७

नित्य धर्म नाम पाठ ।

तोचि वैकुंठीची वाट ।

गुरु भजनी जो विनट ।

तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥

धन्य धन्य त्याचा वंश ।

धन्य तो आला जन्मास ।

तयाजवळी ह्रषीकेश ।

सर्वकाळ नांदतु असे ॥२॥

रामकृष्ण स्मरण जप ।

तेंचि तयाचें अमुप तप ।

तो वास करील कोटी कल्प ।

वैकुंठ पीठ नगरीशी ॥३॥

ज्ञानदेवी जप केला ।

हरि समाधीसी साधिला ।

हरिमंत्रें प्रौक्षिला ।

सर्व संसार निर्धारे ॥४॥

७६८

उपजोनी नरदेहीं ।

जयाशी हरिभक्ति नाहीं ।

तोचि भूमिभारु पाही ।

व्यर्थ जन्म त्याचा गेला ॥१॥

पशुप्राणी तया जोडी ।

नेघेचि हरिनाम कावडी ।

तो कैसेनि परथडी ।

नामेवीण पावेल ॥२॥

जिव्हा बेडुकी चावट ।

विसरली हरिनाम पाठ ।

ते चुकले चुकले वाट ।

वैकुंठीची जाण रया ॥३॥

बापरखुमादेवी निर्धार ।

नामें तरले सचराचर ।

जो रामकृष्णीं निरंतर ।

जिवें जपु करील रया ॥४॥

७६९

रामकृष्ण जप सोपा ।

येणें हरती जन्म खेपा ।

संसारु तुटेल महा पापा ।

धन्य भक्त तो धरातळीं ॥१॥

जया हरीची जपमाळी ।

तोचिं पडिला सर्व सुकाळी ।

तया भय नाहीं कदा काळीं ।

ऐसें ब्रह्मा बोलियला ॥२॥

बापरखुमादेवी हरी ।

नामें भक्ताशी अंगीकारी ।

नित्य सेवन श्रीहरि ।

तोचि हरीचा भक्त जाणावा ॥३॥

७७०

अवघाचि श्रृंगारु डोईचे दुरडी ।

डोळेचि मुरडी परतोनिया ॥१॥

देखिलें स्वरुप विठ्ठल नामरुप ।

पारुषेना चित्त त्याचे चरणाहुनी ॥२॥

बापरखुमादेवीवरु विठ्ठल सुखनिधी ।

अवघीची उपाधी तुटली माझी ॥३॥

७७१

कासवीचें तूप जेवी ।

आकाश घालीपां पेवीं ।

वांजेंचें बाळ खेळवी ।

रुदना करी रया ॥१॥

पाहे पा नवल चोज ।

म्या देखिलें पा मज ।

गुह्यांचे गुज ।

जाणरे मना ॥२॥

मृगजळ सागर भला ।

डोंगरें ओणवा विझविला ।

समुद्र तान्हेला ।

जीवनालागी ॥३॥

ज्ञानदेव ऐसें म्हणे ।

कापुराची मैस घेणें ।

दुधावीण सांजवणे ।

भरलें दिसे ॥४॥

७७२

जीवन कैसें तान्हेजत आहे ।

मन धाले परि न धाये ॥१॥

पुढती पुढती राजा विठ्ठल पाहे ।

निरंजनी अंजन लेईजत आहे ॥२॥

आपुलें निधान आपण पाहे ।

निवृत्ति गार्‍हाणें मांडले आहे ॥३॥

बापरखुमादेवीवर विठ्ठलाचे पाये ।

विसंबला क्षण माझा जीव जाऊं पाहे ॥४॥

७७३

अवचित वरपडी जालिये अंबुलिया ।

लाजिले आपुलिया सकळ गोता ॥१॥

एकांतीचें सुख भोगी आपुलिया सरीसी ।

दोहीचि सरसी गती झाली ॥२॥

बापरखुमादेवीवर विठ्ठल लाधला ।

मज घेऊनि गेला बाईये वो ॥३॥

७७४

अंबुला विकुनी पवित्र झाली ।

पोटीचीं बाळें कौतुकीं मारिलीं ॥१॥

पापा वेगळी मी जाले वो नारी ।

विठ्ठला घरीं नादंतसे ॥२॥

आशा तृष्णा नणंदा मारिल्या ।

शेजारीं राहविल्या संतसंगें ॥३॥

बापरखुमादेवीवर विठ्ठल भोगिला ।

मज पैं लाधला गुणेविण ॥४॥

७७५

पांचही वर्‍हाडी पांच ठायीं बोळविली ।

येरा दिधली मिठी देखा ॥१॥

आंबुलियाचें सुख माझें मी भोगी ।

सेवेशीं रिघे अंगोअंगी ॥२॥

बापरखुमादेवीवरु विठ्ठल जोडला ।

वेव्हारा मुकला बाईये वो ॥३॥

७७६

गरुवार जाली अंबुला व्याली ।

व्येउनिया मेली माझ्या ठाई ॥१॥

जेथें ठाव ना ठेवणी निघाली कोनी ।

तेथें सुईणी हात नाहीं ॥२॥

बापरखुमादेवीवरा विठ्ठली शेजबाज ।

सहज सहजाकार अंबुला देखा ॥३॥

७७७

ऐशिया माजी तो निज एकांती राहिला ।

विठ्ठल अनुसरला भावें एके ॥१॥

नित्य प्रळय निद्रिस्त नित्य पळय मृत्यु ।

कल्पांती जीव जात मायाहीं नाहीं तेथ ॥२॥

तेचि तूं होउनि राहे विश्वासी ।

ठायींच्या ठायीं निवशी अरे जना ॥३॥

तेथें नाहीं दु:ख नाहीं तहान भूक ।

विवेका विवेक नाहीं तेथें ॥४॥

ऐसें तें पाहोनी तये तृप्ति राहोनी ।

तेंचि तूं जाणोनी होई बापा ॥५॥

बापरखुमादेवीवरु विठ्ठलुगे माये ।

स्वस्वरुपीं राहे तये कृपा ॥६॥

७७८

सखीप्रती सखी आदरे करी प्रश्न ।

जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥

सखी सांगे मात उभयतां ब्रह्म ।

नाहीं हो विषम हरीवीण ॥२॥

सूर्य प्रकाश मही घटमठीं समता ।

तैसा हा उभयतां बिंब एका ॥३॥

बापरखुमादेवीवर विठ्ठल जिवाचा ।

व्यापक शिवाचा शिवपणें ॥४॥

७७९

सांग सखिये बाई मज हें न कळे ।

कैसा हा अकळे सम तेजें ॥१॥

भाव दृढ धरी चित्ताची लहरी ।

प्रकृती कामारी सत्रावीची ॥२॥

येरी म्हणे वाजट झाली हो पुराणें ।

समरस जाणे कोणे घरीं ॥३॥

ज्ञानदेव म्हणे आदिमध्य समता ।

सुखें पहातां चढे हातां ॥४॥

७८०

पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालो मी अज्ञान ।

विषय बुंथी घेउनिया त्याचें केलें पोषण ।

चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान ।

अवचटें गुरुमार्गे प्रगट ब्रह्मज्ञान ॥१॥

दाते हो वेग करा कृपाळुवा श्रीहरि ।

समता सर्व भावीं शांति क्षमा निर्धारी ।

सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥

शरण रिघे सदगुरु पाया पांग फिटेल पांचाचा ।

पांगुळलें आपेआप हा निर्धारु पै साचा ।

मनामाजी रुप घाली मी माजी तेथें कैचा ।

हरपली देहबुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥

निजबोध धवळा शुध्द यावरी आरुढ पै गा ।

क्षीराब्धि वोघ वाहे तेथें जायपा वेगा ।

वासना माझी ऐसी करी परिपूर्ण गंगा ।

नित्य हें ज्ञान घेई अद्वैत रुपलिंगा ॥४॥

पावन होशी आधीं पांग फिटेल जन्माचा ।

अंधपंग विषयग्रंथीं पावन होशील साचा ।

पाडुरंग होसी आधी फळ पीक जन्माचा ।

दुष्ट बुध्दि टाकी वेगी टाहो करी नामाचा ॥५॥

ज्ञानदेव पंगपणें पांगुळली वासना ।

मुरालें ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना ।

दृश्य हें लोपलें बापा परती नारायणा ।

निवृत्ती गुरु माझा लागो त्याच्या चरणा ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-03-01T04:11:17.4670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

tallowiness

  • स्त्री. चरबीयुक्तता 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site