मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग १००१ ते १०१०

अप्रसिद्ध अभंग - अभंग १००१ ते १०१०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


१००१
देव ते कल्पित शास्त्र तें शाब्दिक ।
पुराणें सकळीक बाष्कळिक ॥१॥
बाहुले ती जीव सूत्रे तेचि जीव ।
मिथ्याचि माव जीव झालें ॥२॥
तेथें कैंचे मुक्त मुळी नाहीं बद्ध ।
सर्वही अबध्द दिसे जे का ॥३॥
अर्कापासूनी नीर जैसें कां भासत ।
जग तैसें घडत मिथ्याचि सत्य ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सावधान होणें ।
अखंड साधणे परवस्तूशी ॥५॥
अर्थ:-
ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देवपणाची वाच्यता काल्पनिक आहे. शास्त्रे केवळ शब्दमय आहेत. पुराणामध्ये असंबद्धता आहे. कळसूत्रांच्या खेळातील, बाहुल्या व सूत्रे ही जशी परतंत्र त्याचप्रमाणे जीवही परतंत्र आहे. ज्या ठिकाणी बंधच नाही तेथे मुक्तीचा विचार कशाला तेंव्हा हा बंधमोक्षाचा शास्त्रांनी सांगितलेला व्यवहार अबद्ध नाही काय. ज्या प्रमाणे सूर्यकिरणावर मिथ्या मृगजळ भासते त्याप्रमाणे सर्व जगत् सत्य परमात्म्यावर भासते. सावधान राहून जग मिथ्यत्व निश्चय करून, परमात्मवस्तु प्राप्त करून घ्यावी. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१००२
देव नाहीं तेथें पूजी तया कोण भक्त ।
गुरुशी ठाव नाहीं कोणी शिष्याशी पुसत ॥१॥
सदोदीत ब्रह्म पूर्ण निराकार निर्गुण ।
भेदाभेद क्षीण तेथें अनुभवी हे खूण ॥२॥
आदि अंत मध्य नाही दृश्य दृष्टा दर्शन ।
सच्चिदानंदरूप वस्तु सनातन ॥३॥
एक तेचि अनेक झाले अनेकरुपी एक ।
खुण सांगे ज्ञानेश्वर जग जाणा कल्पक ॥४॥
अर्थ:-
देवच जेथे नाही मग त्याची पूजा करणारा भक्त कोण असणार? गुरुचा जर पत्ता नाही तर शिष्यांना विचारतो कोण? ब्रह्म सर्वव्यापक, निर्गुण, निराकार व सनातन असल्यामुळे त्यांत भेदाभेद मुळीच नाहीत. हे अनुभवाच्या खुणेने कळेल. ब्रह्माला आदि, मध्य व अंत हे तिन्ही नाही तसेच ते कोणाला पाहात नाही. व कोणाच्या पाहण्याचा विषयही होत नाही. अगर दर्शनही म्हणजे कोणाचे ज्ञानही नाही. म्हणजे त्रिपुटीविवर्जित आहे. ते अनादि सच्चिदानंदरुपच आहे. ते ब्रह्मतत्त्व एकच असून अनेकरूपाने प्रतीतीला येते. म्हणून जगत् काल्पनिक आहे. अशी तुम्हाला खूण सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

१००३
देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी ।
निजदेव नेणशी मुळीं कोण ॥१॥
देवा नाहीं रूप देवा नाही नांव ।
देवा नाही गांव कोठें कांहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ।
अखंडित सेवा करा त्याची ॥३॥
अर्थ:-
देव, देव म्हणून निष्कारण लोक फिरत राहातात परंतु अंतर्मुख दृष्टी करुन हृदयातील देवाला कोणी ओळखत नाही. तात्त्विक पाहिले तर देवाला नाम, रुप, काही नाही. आत्मा हाच खरा देव असून त्याला ओळखून त्याची सतत सेवा करा म्हणजे त्याच्या ठिकाणी तल्लीन होऊन रहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१००४
अमानत्व स्थिती ते अंतीं कठीण ।
येरा जन्म जाण न साधेची ॥१॥
अनपेक्ष शुचि जे का उदासिन ।
अमानत्व जाण त्यासी लाभे ॥२॥
सहज ज्ञानेश्वरी अखंड समाधी ।
ग्रासूनि उपाधि राहियला ॥३॥
अर्थ:-
भगवद्गीतेत सांगितलेली अमानित्व स्थिती प्राप्त होणे फार कठीण आहे कित्येकांना जन्मभर साधत नाही. अनपेक्षत्व, शुचित्व, उदासीनत्व इत्यादि गण ज्यांनी संपादन केले असतील त्यानांच अमानित्व प्राप्त होते. मी सर्व उपाधिचा बाध निश्चय करून ग्रास करुन टाकला. त्यामुळे मला सहज अखंड समाधी लाभली. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

१००५
आमुचिया देवा नाही नाम गुण ।
नाही स्थानमान रुपरेखा ॥१॥
नित्य निराकारीं आमचें भजन ।
अहंब्रह्म पूर्ण निजध्यासें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे आमिष जोडिलें ।
निरंजनी केला वास आम्हीं ॥३॥
अर्थ:-
आमच्या देवाला नाम, गुण, स्थान, मान, रुप, रेषा कांही नाही. तो नित्य व निराकार स्वरुप आहे. त्याचे भजन अहं ब्रह्मास्मि अशा शब्दांनी आम्ही करतो. त्याची प्राप्ती निजध्यासाने होते. अहं ब्रह्मास्मि असा निजध्यास हे एक त्याच्या प्राप्तीचे निमित्त आहे. त्या योगाने आम्ही ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१००६
योग तो कठिण साधितां साधेना ।
जेणे गा चिद्घना न पाविजे ॥१॥
याचीलागीं आतां सांगणे हें तुज ।
माझें निजगुज अंतरींचें ॥२॥
इंद्रिये कोंडावी आवरावें मन ।
सहज ब्रह्मज्ञान लाधलाशी ॥३॥
जेथे जेथें मन धांवोनियां जाय ।
तेथें गुरुचे पाय वसवावे ॥४॥
ज्ञानदेव म्हणे होईं तूं निर्गुण ।
कळेल तुज खूण पूर्ण तेव्हां ॥५॥
अर्थ:-
योगाभ्यास करणे फार कठीण आहे. तो साधता साधत नाही. जरी साध्य झाला तरी ज्ञानघन परमात्मा प्राप्त होईलच असे नाही. एवढ्याकरता तुला आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट सांगतो. ती ही की इंद्रिय निग्रह करावा, मनोनिग्रह करावा, व जेथे जेथे आपले मन जाईल. त्या त्या ठिकाणी सद्गुरुंचे पाय आहेत अशी भावना करावी. त्यामुळे ब्रह्मज्ञान तुला सहज प्राप्त होईल. तूं तुझ्या ठिकाणचे दुष्ट गुण टाकून देऊनं निर्गुण हो म्हणज तुला ब्रह्मस्वरुपाची यथार्थ खूण कळेल. म्हणजे तुला ब्रह्मज्ञान होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१००७
कासया प्रतिष्ठा व्यर्थ मानितोसी ।
सर्वत्र धरिसी समभावें ॥१॥
आत्मयासी जगतीं अवघाची एकला ।
जगांत संचला तद्रूपें तो ॥२॥
अणुरेणु तृण काष्ठादि पाषाण ।
सर्वत्रीं समान आत्मा तोचि ॥३॥
देह उच्च नीच आत्मा सर्व सम ।
मानिती विषम मंदमती ॥४॥
भेदाभेद दोन्ही सर्व एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण योगीं ॥५॥
अर्थ:-
सर्व ठिकाणी माझा समभाव आहे. अशी प्रतिष्ठा लोकांमध्ये विनाकारण कशाला मिरवितोस. त्या ऐवजी जर सर्वव्यापक एक ब्रह्म आहे. असे जर जाणशील तर जगव्यापक परमात्माशी तूं एकरुप होशील. परमात्मा अणु, रेणु, तृण, काष्ठ, पाषाण या सर्व ठिकाणी समान भरलेला आहे. तेच तुझेही स्वरुप आहे. उंच नीचपणा आत्म्याचा नसून देहादि उपाधिचा आहे. पण मंदमती लोक ती विषमता आत्म्याची मानतात. जगातील भेदाभेद हे सर्व एक ब्रह्मरुपच आहेत.असे जाणणारा तो पूर्ण योगी समजावा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

१००८
त्रिवेणींचे स्नान अखंडित करा ।
काशीवासीं मरा ज्ञानेवीण ॥१॥
तया नाहीं गती वस्ती निरंजनीं ।
भोगी रुद्रयोनी कर्मवसे ॥२॥
लिंगदेहभंग जंव झाला नाहीं ।
तोवरी बा पाहीं मुक्ती कैची ॥३॥
ज्ञानदेव म्हणे करावें सुमन ।
तरीच चिद्घन पाविजे तो ॥४॥
अर्थ:-
तुम्ही त्रिवेणीचे अखंडित स्नान करा, नाही तर काशीत मरा पण ज्ञाना वाचून निरंजन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गती होणे शक्य नाही.पवित्र त्रिवेणीचे किंवा काशीवासा सारखे पुण्य कर्म केले आहे म्हणून तो त्या पुण्यकर्माच्या योगाने रुद्रयोनी भोगेल. पण हे निश्चित आहे. जोपर्यंत दशेंद्रिय, पंचप्राण आणि सोळावे अंतःकरण मिळून जो लिंगदेह आहे त्याचा नाश झाला नाही. तोपर्यंत त्याला मुक्ति कशी मिळणार. जर अंतःकरण शुद्ध केले. तरच ज्ञानस्वरुप परमात्म्याची प्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१००९
सुवर्णाचे भाडें दुधाचे आधण ।
कुसुंबा घालुनी नाश केला ॥१॥
तोडुनि चंदन कर्दळीचें वन ।
बाभुळा रक्षण बैसविलें ॥२॥
उत्तम भूमिका कमाविली पाही ।
धोत्रा लवलाही पेरियेला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐसें न करावें ।
शरण रिघावें सदगुरुसी ॥४॥
अर्थ:-
सोन्याच्या भांड्यात दूध तापवून त्यांत कुसुंबा टाकून ते जसे नासवून टाकावे, किंवा चंदनाचे व केळीचे वन तोडून त्याठिकाणी बाभळीची झाडे लावून त्याच्या रक्षणाकरिता रक्षक बसवावे. जमिनीची उत्तम मशागत करुन त्यात धोत्रा पेरणे अशा गोष्टी जशा मूर्खपणाच्या ठरतील त्याप्रमाणे हा महान भाग्याने प्राप्त झालेला मनुष्यजन्म केवळ विषय सेवनांत घालविला तर मूर्खपणाचाच ठरेल.असे मूर्खपणाचे कृत्य करु नये. तर मनुष्याने सद्गुरुला शरण जाऊन आपल्या जन्माचे सार्थक करुन घ्यावे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०१०
एक माझी माता दोघेजण पिता ।
मज तीन कांता दोघे सुत ॥१॥
चौघे बंधु आणि दशक बहिणी ।
कन्या झाल्या तिन्ही माझ्या पोटीं ॥२॥
बहिणी भावासंगें खेळूं पैं लागले ।
विपरीत झालें सांगूं कोणा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अघटित घडे ।
गुरुकृपा जोडे परब्रह्म ॥४॥
अर्थ:-
मला जीवत्वदशा देणारी अविद्या ही एक आहे. आत्मा व अंतःकरणात पडलले प्रतिबिंब म्हणजे चिदाभास हे दोन माझे दोन वडील आहेत. जागृति स्वप्न व सुशुप्ती ह्या या तीन बायका आहेत. प्रवृत्ति व निवृत्ति हे दोन माझी मुले आहेत. मन बुध्दी चित्त अहंकार हे माझे चार भाऊ आहेत. दहा इंद्रियांच्या दहा वृत्ति ह्या बहिणी आहेत बाल, तरुण, व वृद्ध या तीन अवस्था माझ्या मुली जेव्हा बहिण भावासंगे खेळू लागल्या तेव्हा काय विपरीत झाले कोणास ठाऊक.जीवाला ब्रह्मस्वरुपता प्राप्त होणे ही जी अघटीत गोष्ट आहे ती देखील गुरुकृपेने घडून येईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP