मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ९७१ ते ९८०

अप्रसिद्ध अभंग - अभंग ९७१ ते ९८०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


९७१
जहाला इंद्र शेष तरी आम्हां काय ।
नैश्वरी तो पाहे भुललासे ॥१॥
हरिश्चंद्रादिक ब्रह्मादि करून ।
मायोपाधीन भास जाले ॥२॥
निरंजनी घेतां ययाचि पै शुद्धि ।
एकही अवधी न दिसती ॥३॥
हरिहरादिक देही सुकल्पिक ।
इतरांचा लेख कोण करी ॥४॥
गुरूकृपायोगें ब्रह्म ज्ञानेश्वर ।
तरला संसार भवसिंध ॥
अर्थ:-
इंद्राला स्वर्णाचे व शेषाला पाताळाचे राज्यभोग असले तरी आम्हाला त्याचे काय कौतुक ते क्षणभंगुर सुखातच गुरफटलेले आहेत. हरिश्चंद्र, ब्रह्मदेव वगैरे यक्ति देखील मायोपाधीने भासमात्र झालेले आहेत. शुद्ध ब्रह्माच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्वच नाही. मोठ मोठे विष्णु शंकरादिक हेही जर काल्पनिकच आहेत तर इतरांची काय कथा. सद्गुरू कृपेने मी बह्मरूप आहे अशी खात्री होऊन या संसार सिंधुतून तरून गेलो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात

९७२
चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेविण ॥१॥
तीन वीस चारी कळा अनुभविले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥२॥
अष्टांगादि योग प्रयासें जोडले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥३॥
कर्मधर्मक्रिया नाना आचरले ।
व्यर्थची जाहले ज्ञानेवीण ॥४॥
ज्ञानेश्वर म्हणे ब्रह्म साधियलें ।
कीर आथीयलें ज्ञानेवीण ॥५॥
अर्थ:-
चौदा विद्या, चौसष्ट कला, अष्टांग योग व अनेक पुण्यकारक कर्माचरणे केली पण ब्रह्मज्ञान जर झाले नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. एका ब्रह्मज्ञानावांचून काही जरी केले तरी ते सर्व व्यर्थ होय असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९७३
कासवाच्या परी आत्मा तो या देहीं ।
इंद्रिये जो पाही अवलोकी ॥१॥
सहज प्रकाश आहे तो करीत ।
स्वयें चेष्टवीत दीपापरी ॥२॥
जाणे येणे काही नाही आत्मयाशी ।
द्रष्टुत्व तयासी जाणिजे की ॥३॥
तद्विवर्त जीव अविद्यक मन ।
संसारबंधन’इयेचेनि ॥४॥
ज्ञानदेव म्हणे आत्मा शुद्ध बुद्ध ।
नव्हेचि पैं बद्ध कदाकाळीं ॥५॥
अर्थ:-
या देहामध्ये आत्मा कासवाप्रमाणे असल्यामुळे इंद्रियादि आपल्या अवयवांना प्रकाशित करतो.तात्त्विक प्रकाश कर्तृत्व त्याच्याकडे नाही. त्याच्या सहज प्रकाशाने देहादि व्यवहार होतात. म्हणून तो प्रकाशन करतो. असा दिव्याप्रमाणे गौण व्यवहार होतो. हा कोठे जात नाही वा कोठून येत नाही. मात्र जीवांच्या व्यवहाराचा साक्षी आहे.जीव त्याचा विवर्त आहे. व मन अविद्याकार्य याच योगाने त्या जीवाला संसार बंधन आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, असल्यामुळे याला केंव्हाही बंधन नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९७४
वेदांत सिद्धांत देतात पैं हाक ।
स्तब्ध ते जंबुक येर शास्त्रे ॥१॥
तेंचि की प्रमाण साधनानुक्रम ।
येर भवभ्रम की आथी ॥२॥
ऐकजे ती शास्त्रे पडिलीं संदेहीं ।
होय नाहीं कांही म्हणूनियां ॥३॥
वेदांतीही भिन्न जाणा पूर्वपक्ष ।
लक्षितेती अती मूर्ख ॥४॥
काय बहिर्मुख नेणतीच येर ।
म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥
अर्थ:-
संसाररूपी हत्तीस नाश करण्याला एक वेदांतशास्त्ररूपी सिंहच पाहिजे बाकीचे शास्त्रे कोल्ह्याप्रमाणे स्वस्थ बसतात. तेच शास्त्र मुमुक्षुला फार उपयोगी पडते. बाकीच्या शास्त्रांत संसारभ्रम दूर करण्याची शक्ती नाही. वेदांताखेरीज इतर शास्त्रांचा जे अभ्यास करतात. ते लोक अधिकच संशयातच पडतात.वेदांत मतातही खंडनाकरता पूर्वपक्ष घेतलेला असतो. तो त्यांच्या मतासी विरोधी असतो.त्यातच काही लोक पूर्ण लक्ष ठेवून आपला गोंधळ करून घेतात. असे ते अतिमूर्ख समजावे. असे जे मूर्ख पुरूष असतात.त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. असे राजयोगी माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९७५
पाहणें जें कांहीं त्यासी मुळी पाहें ।
मग सुखी राहें योगीराया ॥१॥
मी तूं द्वैत भ्रांती पहा रे काढुनी ।
आत्मा तो गिवसुनी राहे सुखें ॥२॥
अविद्या नाथिली रज्जु सर्पापरी ।
भासली विचारी अनुभवें ॥३॥
तेंव्हा हे उपाधि राहिली सौरस ।
ज्ञानदेवदास पूर्ण धाला ॥४॥
अर्थ:-
जगांतील दृश्य पदार्थांना अधिष्ठानरूपाने असणाऱ्या मूळच्या आत्मवस्तुकडे तुला पाहिले पाहिजे. अशारितीने दृश्यपदार्था वरील दृष्टि जाऊन अधिष्ठानाकडे तुझी दृष्टी आली म्हणजे मग योगीराजा तूं सुखाने खुशाल काळ घालव. आत्मज्ञान प्राप्त करून मी व तूं हे द्वैत काढून सुखाने राहा. ज्याप्रमाणे भ्रांतीने दोरीवर सर्पाचा भास होतो. त्याप्रमाणे जिला अस्तित्वच नाही अशी अविद्या आत्म्यावर भासली असे अनुभवाने समजावून घे. असे आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर देहरूप उपाधिची आसक्ती नाहीशी होते व जीव ब्रह्माचे पूर्ण ऐक्य होऊन तृप्ती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९७६
मूक्तत्वाची भ्रांती जे कांहीं धरिती ।
तेचि बद्ध होती निश्चयेंसी ॥१॥
कल्पना इवलुशी जये ठायीं असे ।
तिये ठायीं वसे अहंकार ॥२॥
देहीं ग्रासुनिया राहती जे सुखी ।
तेचि ते पारखी आत्मतत्त्वीं ॥३॥
सर्व ब्रह्मपूर्ण तयाशीच बोध ।
तयाशीच पद कैवल्याचें ॥४॥
साक्षीरूप पहा धरिती शरीर ।
तेचि ज्ञानेश्वर पूर्ण योगी ॥५॥
अर्थ:-
ज्यांना मुक्तत्वाचा अहंकार असतो. तेच खरे बद्ध असतात. व अहंकारही ज्याच्या ठिकाणी मी मुक्त आहे अशी यत्किंचितही कल्पना असेल त्याचे ठिकाणी सिद्ध होतो. अशा देहांत असणाऱ्या अहंकाराला ग्रासून जे ब्रह्मानंदात निमग्न असतात तेच आत्मतत्त्वाची खरी पारख करणारे असतात. सर्व जगत ब्रह्म आहे असे जे पाहतात त्यांनाच यथार्थ ज्ञान होऊन विदेह कैवल्य मिळते. वरीलप्रमाणे स्वतः साक्षीरूपाने अलिप्त राहून ज्याचे सर्व शरीरव्यवहार चालतात. तेच पूर्ण योगी होय असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९७७
गगनाहूनि व्यापक वायुहूनि चालक ।अग्नीहूनी दाहक आन नसे ॥१॥
ब्रह्म परिपूर्ण तोचि सनातन ।
स्वयें आनंदघन आन नसे ॥२॥
दृश्याहूनि गोचर इहिहूनि पर ।
गुरूवीण ज्ञानेश्वर आन नसे ॥३॥
अर्थ:-
परमात्मा आकाशापेक्षाही व्यापक आहे. तसेच वायु सर्वांचा चालक आहे. पण त्या वायुचाही चालक परमात्मा आहे. अग्नीची दाहकशक्ती मोठी खरी पण ती अलस्वरूपाहून वेगळी नाही. तरी ते ब्रह्मच पूर्ण, सर्वव्यापी, अनादि व आनंदघन असून सर्व दृश्य वस्तुच्याही पलीकडे आहे. मीही ज्ञानस्वरूप जे ब्रह्मरूप सदगुरु त्यांच्याहून वेगळा नाही.असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९७८
सिंहाचे दुग्ध सायासें जोडलें ।
आणुनी पाजिल मार्जाराशी ॥१॥
अमोलिक विद्या धन झाली प्राप्ती ।
पहावया प्रतीति स्वशीस छेदी ॥२॥
अनेक दीप लाविले दीपाशीं ।
फुंकूनिया त्यासी मग सोडी ॥३॥
परीस जोडुनी घालियाली भिंती ।
शिळा घेऊनी हातीं फिरत आहे ॥४॥
अमृताचा कुंभ बळेंचिं उलंडूनी ।
कांजिये भरूनी ठेवितसे ॥५॥
अमोलिक देहीं न साधा जरी पर ।
म्हणे ज्ञानेश्वर व्यर्थ होय ॥६॥
अर्थ:-
मोठ्या प्रयासाने मिळविलेला मनुष्य देह तो परमार्थ न करता व्यर्थ घालविणे म्हणजे कष्टाने सिंहीणीचे दूध मिळवावे व ते एखांद्या मांजराला पाजावे त्याप्रमाणे आहे.किंवा एखाद्याने कष्टाने विद्या अथवा धन मिळवावे व त्या धनाचा उपभोग घेण्याऐवजी आपले शीर तोडून घ्यावे. अथवा सायासाने दिवे लावावे. व आपणच फुकून मालवून टाकावे. अथवा परीस मिळाला असता तो दगड समजून भिंत बांधण्याला त्याचा उपयोग करावा किंवा दगड म्हणून हातात घेऊन फिरावे. अमृताने भरलेली घागर लवंडून देऊन तिच्यामध्ये भाताची पेज भरून ठेवावी. या वरील गोष्टी करणेे मूर्खपणाचे आहे. मोठ्या भाग्याने प्राप्त झालेल्या मनुष्यदेहाचा जर परमात्म प्राप्ती करता उपयोग केला नाही. तर त्याचा जन्म व्यर्थ होय. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९७९
साधूचा महिमा वर्णवेना कांहीं ।
ब्रह्मादिक तेही वर्णिताती ॥१॥
त्याचिये कृपें मोक्ष जिऊनियां ।
लाधिजे प्राणिया निश्चयेंचि ॥२॥
गंगेहूनि थोर संत शुचिष्मंत ।
गंगा शुद्ध होत त्याचे संगें ॥३॥
वडवानळ शुचि परी सर्वही भक्षक ।
इंद्र पुण्यश्लोक पतन होय ॥४॥
पतीत पावन कृपाळ समर्थ ।
देताती पुरुषार्थ चारी दीना ॥५॥
बाप रखुमादेविवर विठ्ठलाच्या संगी ।
झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर ॥६॥
अर्थ:-
साधूंचा महिमा आमच्या सारख्याला वर्णन करता येत नाही हे खरे. पण तो ब्रह्मदेवादिक वर्णन करतात.त्या संतांच्या कृपेने जेवण करुन प्राण्यांना मोक्षाचा लाभ होतो. सदाचारी संतांची योग्यता गंगेहूनही अधिक आहे कारण सांधूंच्या स्पर्शानि गंगा ही पावन होते. संतांना शुोद्ध अशा वडवानळाची उपमा द्यावी तर ती कमीच ठरते. कारण वडवानल सर्व भक्षक आहे. इंद्राची उपमा द्यावी तर त्यालाही अधोगती प्राप्त होते. पतीत पावन संत मात्र होत जनांना उद्धरुन नेणारे व चारी मुक्ती देणारे असे आहेत. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्यामुळे व निवृत्तीच्या संगतीने मी पूर्ण योगी झालो. असे माऊली सांगतात.

९८०
मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति ।
तरीच विरक्ती प्रगटेल ॥१॥
विरक्तीविषयीं होतांचि विचार ।
नित्य हे नैश्वर ओळखती ॥२॥
तेव्हां आत्मज्ञान अनुभव होय ।
अविद्यत्व जाय जीवरुप ॥३॥
शांति क्षमा दया तिष्ठती सहज ।
न दिसे दृश्य काज जगामाजीं ॥४॥
गुरुकृपा द्वारें लहिजे पैं सिद्धी ।
बोलिला त्रिशुद्धि ज्ञानेश्वर ॥५॥
अर्थ:-
मुक्ति प्राप्त करुन घेण्याची इच्छा असेल तर परमेश्वराची भक्ति करा. त्यापासून वैराग्य उत्पन्न होईल. एकदा विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे परमात्माच एक सत्य आहे. व इतर वस्तु अनित्य आहे असा जीवांचा निश्चय होईल. व असा निश्चय झाला म्हणजे जीवरुपाने असलेली अविद्या जाऊन शुद्ध आत्मस्वरुपाचा अनुभव येतो. ज्यांना आत्मज्ञान झाले अशा पुरुषांच्या ठिकाणी शांती, दया, क्षमा वगैरे गुण सहजच दिसतील. व त्यांना जगांत कर्तव्य कांही राहातच नाही. हे आत्मज्ञान गुरुकृपेने प्राप्त होणारे आहे असे निश्चित समजा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP