मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ९११ ते ९२०

अप्रसिद्ध अभंग - अभंग ९११ ते ९२०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


९११
निळिये मंडळी निळवर्ण सांवळी ।
तेथें वेधलिसे बाळी ध्यान रुपा ॥
वेधु वेधला निळा पाहे घननिळा ।
विरहणी केवळा रंग रसने ॥
नीळवर्ण अंध निळवर्ण स्वयंभ ।
वेधे वेधु न लभे वैकुंठीचा ॥
ज्ञानदेव निळी हृदयीं सांवळी ।
प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ॥
अर्थ:-
निलवर्ण आकाशा सारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बाल्यावस्तेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेध लागले. त्या आकाशीच्या निळेपणाला पाहुन त्या घननिळाचे वेध लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करु लागली. तो घननिळा व त्या निळ्यारंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेध लागले आहेत. त्या निलवर्ण असलेल्याला माझ्या हृदयात त्याच निळ्यारंगाने रंगुन त्यात प्रेमरस कल्लोळ करुन बुडी दिली असे माऊली सांगतात.

९१२
निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी ।
चिंतामणी अंगणी पेरियेला ॥
कैसा हा माव करुं गोविला संसारु ।
कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥
हिरियाची खाणी दिव्य तेज मणी ।
सांपडला अंगणी सये मज ॥
सूर्यकर रश्मी चंद्र बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळामस्मि ।
प्रकट झाल्या रश्मी जेथूनियां ॥
कल्पतरु चोखु चिंतामणी वेखु ।
मना माझी हरिखु देखियेला ॥
ज्ञानदेवी वल्ली विद्युल्लता सलिलीं ।
फळपाकें दुल्ली दुभिनल्या ॥
अर्थ:-
निळ्या मोत्यांच्या पाटातुन अंगणात पेरलेल्या चिंतामणीला पाणी दिले. त्या संसाराच्या मायेतुन आम्ही त्या कृष्णकृपेने तरलो. तो हिऱ्याच्या खाणीतील दिव्य मणी मनाच्या अंगणात सांपडला. चंद्र व सूर्य ह्यातुन प्रगट झालेल्या रश्मी त्याच्या पासुनच तयार झाल्या आहेत. कल्पतरु व चिंतामणी समान असलेला तो पाहिला की मला आनंद वाटत आहे. विद्युलतेच्या कडकडाटात होणाऱ्या वृष्टीमुळे फळ व फुले खुप येतात तसाच आनंद श्रीकृष्ण दर्शनाने होतो असे माऊली सांगतात.

९१३
नवाहुनि परतें तेंराहुनि आरुते ।
अंबरहुनि परतें काळे दिसे ॥
तेथें सातही मावळलीं पांचांहूनि परतें ।
बाहुकाळे निरुते देखिले डोळा ॥
तेथे सत्रावी दुभते योगिया पुरते ।
बहुकाळ निरुते सारासार देखा ॥
बापरखुमादेविवरू अभोक्ता भोगिला ।
काळेपणे जाला अमोलिक ॥
अर्थ:-
पाच ज्ञानेंद्रिये व मन बुध्दी चित्त व अहंकार मिळुन नऊ व दहा इंद्रिय मन बुध्दी व चित्त असे तेरा अशा नऊ व तेरा ह्याऊन वेगळे असलेले हे रुप आकाशाच्या पेक्षा काळे आहे. सप्त धातु व पंच प्राण ह्या पेक्षा निराळे असलेले असे बहु काळे असलेले वेगळे असणारे रुप मी पाहिले आहे. सतरा परमानंदाच्या कळा असलेले योगियांच्या पुरते असलेले सारासाराचे सार असलेले ते स्वरुप आहे. मी त्याच्या काळेपणा अनमोल मानुन अभोक्ता अ़सलेल्या रखुमाईच्या पतीला भोगला असे माऊली सांगतात.

९१४
आजि देखिलें रे आजि देखिले रे ॥
सबाह्य अभ्यंतरी ।
अवघा व्यापकु मुरारी ॥
दृढ विटे मन मुळी ।
विराजीत वनमाळी ॥
आजि सोनियाचा दिनु ।
वरी अमृतातें वरिषे धनु ॥
बरवा संतसमागमु ।
प्रकटला आत्मारामु ॥
बाप रखुमादेविवरू ।
कृपासिंधु करुणाकरू ॥
अर्थ:-
अंतर्बाह्य व्यापुन असलेला तो मुरारी आज मी पाहिला.त्या विटेवर दृढ उभा असलेला तो वनमाळी आहे. आज माझ्यासाठी त्यामुळे सोन्याचा दिवस आहे. तो मेघ स्वरुप होऊन आमच्यावर अमृताचा वर्षाव करतो. त्या संतसमागमालाठी तो आत्माराम प्रगट झाला आहे. तो कृपा करणारा कृपासिंधु रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.

९१५
एक तत्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
अर्थ:-
एकतत्व असणारे नाम सतत दृढतेने घेतले तर हरिला त्या जीवाची करुणा येते. ते नाम घेणे हे सहज सोपे आहे परंतु जिव्हेवर सतत ते घेतले पाहिजे. नामाशिवाय अन्य दुसरे तत्व नाही दुसरा पंथ दुसरे तत्व नाहीच. मी सतत मौनात जपमाळ अंतरात श्रीहरीचे नाम जपत असतो असे माऊली सांगतात.

९१६
सोनियाचा दिवस आजि अमृते पाहाला ।
नाम आठविता रूपी प्रकट पै झाला ॥
गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना ।
आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥
तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायीं ।
बापरखुमादेविवरावाचूनि आनु नेणें कांहीं ॥
अर्थ:-
आजचा दिवस सोन्याचा आहे कारण नुसते नामस्मरण करायचे आठवले तर तो परमात्मा नामरुपानेच प्रगट झाला. हे गोपाळा तुझे ध्यान सतत माझ्या मनाला लागो तसे झाले तर हे जगजीवना मी क्षणभर ही नामस्मरण करताना विसंबणार नाही. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाखेरीज मी अन्य ठिकाणी काय वाचा मनाने विनटलो नाही असे माऊली सांगतात.

९१७
समाधि धन्य रामनामें ।
आम्हां सर्व कर्मे समे ।
कृष्ण वाचे नित्य नेमें ।
जिव्हे पाठ हरिगोविंद ॥
हेची तारक पाठांतर ।
नित्य समाधीचें घर ।
शिव शंभुसी निरंतर ।
जपमाळ सर्वथा ॥
जीवाचे जीवन श्रीहरि ।
चिंता प्राणीयाची हरी ।
अंती चतुर्भुज करी ।
सर्व श्रीहरि माझा तो ॥
ज्ञानदेव सर्वोपरी ।
यंत्र साधिलें श्रीहरि ।
वैकुंठीचा विहारी ।
हदयातरी घातला ॥
अर्थ:-
जिभेने हरिगोविंद नामाचा पाठ केल्याने त्याचा नित्यनेम लाभला व त्या रामनामाने समाधी ही लाभली. तेच पाठांतर, तेच समाधीचे घर असुन ती जपमाळ सतत शिवजी जपत होते. तो माझा हरि जीवाचे जीवन आहे तो प्राण्यांच्या चिंतेच हरण करतो व शेवटी त्याच्या सारखे चतुर्भुज करतो. त्याच हरिनामाचे यंत्र करुन ते हृदयात जपले त्यामुळे वैकुंठात विहार केला असे माऊली सांगतात.

९१८
सकळ संप्रदाय श्रीहरि ।
जो बैसोनि जप करी ।
जिव्हे महादेवाचे अंतरी ।
सर्वकाळ वसतसे ॥ रामनामें जप करी ।
तोचि तरे भवसागरीं ।
पितरांसहित निर्धारी ।
वैकुंठपुरीं पावले ॥ नित्य सत्य समाधान ।
निर्मळ करावें मन ।
नित्य तयासीे नारायण ।
वैकुंठवास करील ॥ बापरखुमादेविवर सिद्धि ।
तरुणोपाय हेचि बुद्धि ।
कृपा करील कृपानिधी ।
ऐसिया भक्तांशी जाणावें ॥
अर्थ:-
महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो. जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते.तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.

९१९
धर्म वसे जेथें ।
सर्व कार्य होय तेथें ।
पित्यासहित मनोरथे ।
सिद्धि पावेल सर्वथा ॥
धन्य धन्य पितृवत ।
धन्य धन्य धर्मकृतार्थ ।
धन्य धन्य वेदाचा मतितार्थ ।
रामकृष्ण मुखींनाम ॥
जंववरी आयुष्य आहे ।
तंववरी हरीची सोये ।
हरि हरि मुख राहे ।
तो सुखी होय अंती देखा ॥
ज्ञान ध्याने निवे संध्या ।
ज्ञान विज्ञान हाचि धंदा ।
रामकृष्ण हरि मुकुंदा ।
परमानंदा जगद्गुरू ॥
ज्ञानदेवें सुकाळ केला ।
हरि हृदयी साठविला ।
हरिपाठ हाचि साधिला ।
अनंत अनंत परवडी ॥
अर्थ:-
ज्या ठिकाणी धर्माचरण असते तेथे सर्व कार्य निर्वेध होतात पितरांच्या इच्छा पूर्ण होतात व सिध्दी ही प्राप्त होते. ज्या मुखी रामकृष्ण नाम आहे त्या पितृव्रत धर्मकार्य धन्य होते व तोच खरा वेदांचा मतितार्थ जाणतो. ज्या मुखात सतत हरि आहे असे आयुष्य जगणारा तो अंती ही सुखीच राहतो. रामकृष्ण हरि मुकुंद ह्या नामोच्चरणा बरोबर त्याची संध्यादी कर्म संपुन जातात. अशा पध्दतीने हरिपाठ करणारे हरिला हृदयात साठवतात व त्यांच्या साठी ब्रह्मविज्ञेचा सुकाळ होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९२०
पतीतपावन श्रीहरि ।
रामकृष्ण मुरारी ।
या वाहे चराचरीं ।
तो एक स्वामी जी आमुचा ॥
धन्य धन्य आमुचे जन्म ।
मुखीं रामराम उत्तम ।
जया रामनामें प्रेम ।
तोचि तरेल सर्वथा ॥
आयुष्य जाऊं नेदी व्यर्थ ।
हरिनामी जो आर्त ।
हरिवीण नेणें आणिक पंथ ।
धन्य जन्म तयाचा ॥
ज्ञानदेवें नेम केला ।
श्रीहरि हृदय सांठविला ।
त्यांनी संसारा अबोलाआला ।
देह खचला संत संगे ॥
अर्थ:-
पतितपावन असणारा त्या श्रीहरिला रामकृष्ण ह्या नांवाने संबोधतात तेच हा चराचराचे व आमचे स्वामी आहेत. ज्याला रामानामाविषयी प्रिती आहे सतत ते रामनाम तो जपतो तोच तरुन जातो त्याचा जन्म धन्य होतो. हरिनाम सोडुन अन्य पंथात तो जात नाही त्या हरिचे नाम आयुष्याचा क्षण वाया न घालवता आर्ततेने घेतो त्याचा जन्म धन्यतेला पावतो. ज्याने हा हरिनाम नेम हृदयापासुन केला त्याचा संसाराशी अबोला झाला व त्याचा देह संतसंगात पडला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP