मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
कृपा कर

पद - कृपा कर

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : वसंति बघुनि. )
कृपा कर श्रीअंबाबाई, ।
माहुरगडवासिनी दयाळे, दर्शन मज देई ॥ध्रु०॥
दयाळे, अंत नको पाहूं ।
ये लवकर, करि करुणा, मजवरि निष्ठुर नको होऊं ॥
धीर कुठवरी धरुनि राहूं ॥
काळ मला लागला गिळाया चंद्र जसा राहू ॥
सोसेना विविध यातना ही ॥
अझुनी माझी दया बये ! तुज कशी येत नाहीं ? ॥ कृपा कर० ॥१॥
सोडुनी ब्रह्मस्वरुपासी ।
मी जिव झालों पहावयास्तव तुझिया रुपासी ॥
सोडुनी गृह - धन - धान्यासी ।
तुजसाठीं आली साठी, शेवटीं झालों संन्यासी ॥
वासना जडलि तुझ्या पायीं ।
म्हणुनि येवढ्या खटकर्माच्या पडलों अपायीं ॥ कृपा कर० ॥२॥
मज नको दाउं माय दुसरी ।
दीनजननि तूं म्हणुनि दीन मी बसलों तुझ्या वसरीं ॥
अवघे दोष, रोष विसरी ।
अवगुण पोटीं घालुनि ओटिंत घेइ; पदर पसरी ॥
तुझी किती वर्णूं चतुराई ? ।
करिसि राइचा पर्वत मेरु पर्वताचि राई ॥ कृपा कर० ॥३॥
तू मूळपिंठिंची वेल्हाळा ।
अखंड तुझिया आनंद - भुवनीं उदंड सुखसोहळा ॥
दाखवी सुंदर रुप डोळां ।
सकळभूषणालंकृत नादर पीतांबर पिवळा ॥
तूचि जगताई रामाई ।
तूं पार्वति - शिव, राम - सिताबाई, विठ्ठल - रुखमाइ ॥ कृपा कर० ॥४॥
तूंचि गुरु बाप माय आजी ।
यज्ञ दान व्रत जप तप तर्पण, संध्या तूंच माझी ॥
अवडिनें सुपारि घे माझी ।
जशि विदुराची कणी भक्षिली, द्रौपदिची भाजी ॥
अक्षरें तीन ‘ रेणुका ’ ही ।
वदनीं स्मरतों मंत्र तंत्र जप, नये आणिक कांहीं ॥ कृपा कर० ॥५॥
भयंकर मोहज्वर हटवी ।
पार्थापरि मी भ्रमलों पडलों, धरुनि हात उठवी ॥
महाभव रणसागर आटवी ॥
खुंटवि विधिचें कल आपुलें, जननीपण आठवी ॥
चिंतितो तुला शेषशाई ।
मजविषयीं नको लावूं श्रुतिच्या, अक्षरांस शाई ॥ कृपा कर० ॥६॥
भ्रमरवत्‍ भवकाननिं भ्रमलों ।
श्रमलों दमलों म्हणुनि भवाश्रमिं विश्रांतिस आलों ॥
लागला तुझा ह्रदयिं लोलो ।
विष्णुदास म्हणे सदगुरुकृपेनें “ पुरुषोत्तम ” झालों ॥
अतां पद नमुनि प्रार्थना ही ।
दे दर्शन मज, याविण दुसरा स्वार्थ सत्य नाहीं ॥ कृपा कर० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP