दासोपंत चरित्र - पदे ७५१ ते ७७८

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


श्रवणी ऐकावें वचन । तरि वाचेंचेचि जे अधिष्ठान । तें अधिष्ठानच होतां आपण । श्रवणेंद्रियधर्म मग कैचे ॥५१॥ त्वचेंद्रियी करावा स्पर्श । स्पर्शामाजी भरतां जगदीश । सहज तो होय नि:शेष । स्पर्श करणे त्या कैचे ॥५२॥ चक्षूंपासूनि रुप पाहवें अनेक । अनेकी उघडितां दृष्टि एक । एक तरि सच्चिदानंद निष्कळंक । मग अनेकत्वदृष्टि सहज हारपे ॥५३॥ ब्रह्मरर्सी सौकतां जिव्हा । आन रसाचा काय हेवा । अर्थार्थी न राहे आन रसाची परवा । ब्रह्मरसाय निमग्न ते ॥५४॥ सुष्टदुष्टगंधग्रहण । ग्रहणेंद्रियाच धर्म जाण । गंधग्रहण ज्याचे सत्तेन । तोचि होतां मग ते कैचे ॥५५॥ यापरी ज्ञानेंद्रियगति । ब्रह्मानंदी हारपती । मग कमेंद्रियांसि कोण पुसती । सहजच मुकती निजकार्या ॥५६॥ अवस्थात्रयी जेथे अवधूत । मग तुर्यास कोण पुसत । उन्मनी म्हणायाची ही मात । सहजानंदी सहज राहे ॥५७॥ ऐसे सहजसमाधिसुख । पंत सेवितां सम्यक । वृत्ति व्हावी जी बहिर्मुख । ते स्वानंदसागरी बुडतसे ॥५८॥ यापरी निर्विकल्प स्थिति । पंताची पाहतां निगुती । स्वानंद होऊन अवधूतमूर्ति । सावध करीत आल्हादे ॥५९॥ पुढे त्याचेनि मिषे । उध्दीर करणे जगास । ऐसे जाणूनि जगदीश । सावध करीतसे स्वानंद ॥७६०॥ जो सच्चिदानंद अवधूत । तोच मूर्तिमंत दासोपंत । परी लीला दाविती अद्भुत । गुरु आणि भक्त होऊनि ॥६१॥ असो तेव्हा दासोपंत महाराज । वंदूनि देशिकचरणांबुज । देशिक जो अनुसूयात्मज । त्या बोले काय स्वानंद ॥६२॥ जय जय सद्गुरु श्रीदिगंबरा । विश्वव्यापका विश्वंभरा । आपल्या उपकारांपासून दातारा । उत्तीर्ण कदापि नव्हे कीं ॥६३॥ आपण होतां कृपावंत । त्याचे सुख जे मजला प्राप्त । तें सुख ब्रह्मादिकां अप्राप्त । ऐसे सहज गमतसे ॥६४॥ तारि ते सुख सदोदित । मजला असावें प्राप्त । नको नको त्याविरहीत । विषयसुख मजलांगी ॥६५॥ मी तापत्रयी बहु तापलो । कामक्रोधादि वैर्‍या करी सांपडलो । आतां हे चरण विसांवलो । पुनरपि नको तें दु:ख ॥६६॥ ऐसे ऐकतां पंतवचन । बोले काय सद्गुरु आपण । तूं असतां सच्चिदानंद परिपूर्ण । हे बोलणे तुजला केविं साजे ॥६७॥ तूं तरि निर्गुण निर्विकार । तूं तरि नि:संग निर्विकार । तुजला कैचां रे संसार । संसार म्हणिजे ते काय ॥६८॥ तूं अज अव्यय अविनाशी । तुज कैचे रे हे दु:खराशी । तूं स्वयंज्योति स्वप्रकाशी । मायापसारा तुज कैचा ॥६९॥ ऐसे म्हणतां श्रीअवधूत । पुनरपि वंदूनि चरणांते । काय विनंति करी दासोपंत । सद्गुरुसि त्या काळी ॥७७०॥ " जय जय सद्गुरु अवधूता । आदिमध्यांतरहिता । तूं निर्गुण निर्विकार असतां । तुजमाजी गुणात्रय कां झाले ॥७१॥ ऐकतां शिष्याचा प्रश्न । आनंद न सांठवे अवधूताकारण । बोले काय संतोषून । पंतालागी त्या काळी ॥७२॥ " अरे पंता ज्ञानखाणी । अरे भक्तराजशिरोमणी । स्वसुखाची पारणा तुझे प्रश्नी । मजला सहज होतसे ॥७३॥ ऐक करुन एकाग्र मन । असतां निर्विकार निर्गुण । ब्रह्मी कां झाले स्फुरण । हा प्रश्न तुझा असे कीं ॥७४॥ तरि स्वसुखी असतां केवळ ब्रह्म । अहं ब्रह्मास्मि ऐसे शब्द परम । उठते झाले संभ्रम । स्वरुपी सहज त्याकाळी ॥७५॥ जैसा पुरुष निजला । आपुले आपण जागा झाला । यापरी स्वरुपी वहिला । शब्द उठतसे पै सहज ॥७६॥ स्वरुपी उठली जे ध्वनी । तिजला म्हणतां महामाया ज्ञानखाणी । जितुके स्वरुप तितुके आपण होवूनि । राहिलीसे सर्वस्व ॥७७॥ परमपुरुषापासूनि जाली निगुती । यास्तव तिजला नांव मूळप्रकृति । तथापि तें नाम प्रकृति । ऐसे सहज गमतसे ॥७७८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP