दासोपंत चरित्र - पदे ५७६ ते ६००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


जय जय ब्रह्मा, हरि शंकरा । कारुण्यसिंधु करुणाकारा । पार नसे आपुल्या उपकारां । उत्तीर्ण कदापि नव्हेचि ॥७६॥ मी तों केवळ अति दीन । आजन्म नसतां संतान । तुह्मीच कृपा करुन पूर्ण । दाविले मजला पुत्रमुख ॥७७॥ हें पुत्रत्रय षडगुणसंपन्न । माझे नेत्रांचे अनर्घ्य ज्योति जाण ॥ ते केवळ अनर्घ्य रत्न । मम ह्रदयपदकी पै जडले ॥७८॥ तेंच पाहीन वेळोवेळां । खेळवीन ते स्वानंदपुतळा । यास्तव शरणांगत चरणकमळा । आपुल्या सहज मी असे ॥७९॥ तरी ते मनोरथ करावे पूर्ण । मजला द्यावें त्रयसुतदान । आपण केवळ दयाळू पूर्ण । हीच इच्छा पुरवावी ॥८०॥ ज्या बाळास मी पाहिले नयनी । ज्यास पहुडविले हत्पाळणी । तेज जडून गेलें अत:करणी । तेंच मज असो बाळत्रय ॥८१॥ त्या बाळाची बाळलीला । पाहीन मी निज डोळा । हीच इच्छा असे मजला । पूर्ण करावी स्वामिया ॥८२॥ पतिव्रतेची ऐकतां गोष्टी । हरिहरांसि आनंद न माये पोटी । एकमेकां बोलती इजसाठी । प्रगटणे आह्मां सहज प्राप्त ॥८३॥ यापरी करुनि विचार । तोषून तेव्हां विधि, हरि, हर । अनुसूयाप्रती ह्मणती घेई वर । आदिमाये पतिव्रता ॥८४॥ तुजसाठी त्रिगुणात्मक । आह्मी त्रिवर्ग मिळून एक । होऊन तुझे सर्वस्व बाळक । पाही वो आतां शुभानने ॥८५॥ ऐसे बोलोनि वरदोत्तर । प्रकट केला अवतार । प्रत्यक्ष विधि, हरि, श्रीशंकर । अनसूयाचे दृष्टीपुढे ॥८६॥ कोण दिन कोण वार । दत्तात्रेयाचा अवतार । तें ऐकावें अत्यादर । कृपा करुनि संतहो ॥८७॥ कार्तिक वद्य द्वितीया सौम्यवासर । कृत्तिका नक्षत्र, निर्धार । तद्विनी श्रीदिगंबर । अनुसूयागृही अवतरले ॥८८॥ समचरणीचे शोभे पोटी । कोटिसूर्याचा प्रकाश आटी । पिंवळा पीतांबर सुकटी । कंठी शोभे सुमनमाळा ॥८९॥ शुध्द श्यामवर्ण कोमलगात्र । मंदस्मित वदन अति सुंदर । किरीट कुंडले मकराकार । तळपती श्रवणी प्रभूच्या ॥९०॥ षडबाही शोभे आयुध । एक एक करीं विविध विविध । यापरी महाराज अत्रिवरद । मूर्ति प्रगटली सांवळी ॥९१॥ अधोकरद्वयी माला कमंडलू । मधील दोहस्ती डमरु त्रिशूळ । ऊर्ध्व हस्तकमळी तेजागळु । शोभे दिव्य शंख चक्र ॥९२॥ ऐसे पाहतां बाळ दिगंबर । अनसूयेस नावरे गर्हिवर । नेत्री चालिले असे स्वानंदनीर । स्वानंदसमुद्री पै बुडती ॥९३॥ मुखे बोलावें बोल । बोलामाजी ब्रह्मानंद भरल । ब्रह्मानंद दाटता वहिल । वृत्ति विराली अनुसूयेची ॥९४॥ वृत्ति ब्रह्मानंद रंगता । समूळ हरे देहअहंता । देहाहंता समूळ ग्रासितां । तन्मय झाली ते माये ॥९५॥ धन्य ती अनुसूया नारी । ती पतिव्रता नसे देहावरी । अष्टभाव दाटला शरीरी । स्तंभस्वेदादि सर्वस्व ॥९६॥ निर्विकल्प वृक्षातळी । समाधिस्त अनुसूया वेल्हाळी । अत्रिऋषीची त्या काळी । स्थिति काय झाली असे ॥९७॥ नेत्री पाहतां ते स्वानंदमूर्ति । सर्वेद्रियद्वारा ब्रह्मानंद स्फुरती । स्फुरण होतां ऋषीप्रती । वृत्ति रंगती अवधूती ॥९८॥ अवधूती वृत्ति रंगता । अवधूतचि दिसे आतौता । अवधूतावांचून रिता । ठावही नसे अणुमात्र ॥९९॥ यापरी ते उभयतां । ऋषि आणि ऋषिकांता । सहजानंदसागरी बुडी देता । देवचि करिती सावध ॥६००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP