दासोपंत चरित्र - पदे १५१ ते १७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


असो ते रुपये मोजल्यावर । पादशा म्हणे कोठे तो पाडेवार । रसीब द्यावी निर्धार । मोहरानिशी त्यालागी ॥५१॥ पाडेवार कोण ? कोठीला ? । जेथे प्रगटे तेथ गुप्त झाला । परि त्याचा वेध लागला । पादशासि त्या काळी ॥५२॥ म्हणतसे दावा रे दावा रे तो पाडेवार । त्यास्तव फुटतात की रे माझे नेत्र । नेत्रांचे तेज साचार । तो मजला ऐसा पै गमतो ॥५३॥ जळो जळो हे द्रव्यराशी । यास्तव संभाषण त्यासि । नाही केले की मी पापराशी । तो कैसा मजला भेटेल ॥५४॥ तो काय या सभास्थानी । गेला की मोह घालूनि । सर्वत्रांची दृष्टि चोरुनि । गेला कोठे कळेना ॥५५॥ त्यासि देऊनि फार इनाम । करुं त्यासि अति संभ्रम । या बाळासि पाठवूं त्यासमागम । ऐशी इच्छा पै होती ॥५६॥ हुडका हुडका रे चहूंकडे । गेला गेला तो कोणीकडे ? । सत्वर आणा रे दृष्टीपुढे । माझ्या आतां अविलंबे ॥५७॥ सेवक बोलती त्यावेळा । आतांच होता उभा ठाकला । सर्वत्रांचा चोरुनि डोळा । गेला कोठे कळेना ॥५८॥ जो ब्रह्मादिकांचे दृष्टीस न पडे । तो मानवांलांगी केवि सांपडे । ज्यासि सद्गुरुचे पद जोडे । त्यासिच घडे दर्शन ॥५९॥ तथापि तो पादशा पुण्यवंत । पुण्यवंतच तेथील लोक समस्त । तरिच श्रीअवधूत । दर्शन देतसे मनुजरुपे ॥६०॥ धन्यचि ते विदुरनगर । ज्यास म्हणती बेदर । तेथे प्रगटसे श्रीवर । निजभक्ताचे कैवारे ॥६१॥ आणखी दामाजीपंतासाठी । भक्तवत्सल श्रीजगजेठी । धांवा केला असे उठाउठी । पंढरीहूनि स्वानंदे ॥६२॥ असो पादशा त्या काळी । सर्वत्र असता ब्रह्ममंडळी । पाहूनि बाळकाकडे वेळोवेळी । बोले काय स्वानंदे ॥६३॥ धन्य याचे दैवबळ । धन्य असे हा बाळ । धन्य दिसे याचें कुळ । लज्जा राखिली देवे याची ॥६४॥ आतां या बाळासि । पाठवावें त्याचे पित्यासि । हा तो केवळ तेजोराशि । फारच मजला आवडतो ॥६५॥ तेव्हा पादशास बोलती सर्वत्र ब्राह्मण । यास घडली असती उपोषण । आपण दिल्हेले द्रव्य ब्राह्मणासिं वाटून । देवास ध्यात पै होता ॥६६॥ ते ध्यान त्याचे भोजन । ध्यानचि त्यास मुक्त करणे । ते ध्यानयोगे कृपा उपजणे । आपुले चित्ती याजवरी ॥६७॥ ऐकतां सर्वत्रांचे भाषण । बाळासि ह्र्दयी आलिंगून । बोले काय वस्त्रप्रावर्ण । देऊनि यासि पाठवूं ॥६८॥ मग आणवून नवरत्नहार । आणि हस्तबंदादि अळंकार । देऊनि वस्त्र नानाप्रकार । बाळासि शृंगार पै केले ॥६९॥ आणवून नूतन सुखासन । बोले काय हर्षायमान । आरुढ होई तूं पूर्ण । समक्ष माझ्या या काळी ॥७०॥ आणखी संतोषून बोले काय । अरे तूं मज होसि फार प्रिय । प्रतिवर्षा तूंच येत जाये । पित्यासि घरी ठेऊन ॥७१॥ यापरी अनेक प्रकार । बोलून मधुरोत्तर । तोषवून ते सुकुमार । पाठविता झाला देशाकडे ॥७२॥ इकडील काय वर्तमान । मातापिता रात्रंदिन । द्रव्य नाही पाठविले ह्मणून । पुत्रास्तव चिंता पै करिती ॥७३॥ माता ह्मणती, माझ्या तान्हया बाळा । न पाहतां फुटतात दोन्ही डोळे । केव्हा पाहीन भरुन डोळे । कैसा भेटेल मजलागी ॥७४॥ मी द्वादश वर्षपर्यंत देख । सोडून न राहिले क्षणैक । आतां कोण भेटवील मम बाळक । शरण कोणा पै जाऊ ॥१७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP