दासोपंत चरित्र - पदे १०१ ते १२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


ब्रह्मत्व माझे शुध्द मौक्तिका । तो बुडवूं पाहे यवनगर्ते देखा । तूं रक्षी गा दीनरक्षका । दुष्टशिक्षाकारणा ॥१॥ हें दुरित माझे दुर्धर । वारीं वारीं गा गा दिगंबर । दिगंबरा तुज वांचोनि साचार । कोणीच मजला नसे की ॥२॥ यापरी करितां ह्रदयीं ध्यान । नेत्री पात होतसे जीवन । दशदिशा पाहे म्लानवदन । कांहीच त्याला सुचेना ॥३॥ तेव्हा घटिका राहिला दिवस । हर्ष न माये पादशास । यवनदीक्षित काजीस । बोलावून काय आज्ञापी ? ॥४॥ आणखी हालीम वाली लोकां । बोलावून ब्राह्मण अनेकां । पुसतसे होऊन हरिखा । सर्वत्रांसि त्या काळी ॥५॥ याचे पित्याने मासाचा करार । करुन ठेविला हा कुमार । ते आजच्यास झाला निर्धार । पुढे काय करावे? ॥६॥ मासास न पाठवूं जरि द्रव्य । यास यवन करावा निश्चये । हा तो करार याचे बापाचा होय । हे तों तुम्हांस ठाऊक ॥७॥ शब्द नसे की आम्हावरि । स्वमती मेळवितां आजिचे रात्री । यास तुम्ही मिळोन सर्व नरनारी । काय उत्तर पै देता ? ॥८॥ यापरी निकरशब्द पडतां श्रवणी । अश्रुपात होतसे सर्वत्र नयनी । कंठ दाटलासे सर्वालागूनि । मुखी शब्द निघेचिना ॥९॥ ब्रह्ममंडळी मिळाले फार । कोणाचे मुखी न निघे उत्तर । म्लानवदन होऊन सर्वत्र । धांवा करिती देवासि ॥१०॥ ’ अरे देवा भक्तवत्सला । अरे देवा, ब्रह्मकुळप्रतिपाळा ! । अरे देवा करुणाकल्लोळा । काय तमाशा पाहतोसि ॥११॥ हा बाळ तो द्विजकुळभूषण । हा बाळ तो गुणसंपन्न । हा बाळ तो आमुचे प्राणांचा प्राण । रक्षी रक्षी गा दयाळा ॥१२॥ तेव्हा बाळ आणिलासे सभेभीतरी । तो नसे देहावरि । देहसाक्षी जो त्यास पाचारी । अनन्ययोगें त्याकाळी ॥१३॥ नेत्र झांकून एकसरीं । आळवीतसे निज कैवारी । कैवारी तो त्याचे अंतरी । स्वत:सिध्दच पै असे ॥१४॥ तेव्हा त्याचे दृष्टीस न पडे जन । जनी दिसे जनार्दन । जनार्दनी वृत्ति रंगली पूर्ण । देहभ्रांति सहज पै ॥१५॥ तेव्हा सद्गुरु श्रीदिंगबरु । दीनजनांचा कैवारु । काय केला चमत्कारु । तें ऐकावे स्वानंदे ॥१६॥ आपण होऊन पाडेवार । हाती काठी कांबळ खांदेवर । द्रव्य हुंड्या घेऊन निजकर । प्रगटले तेथे त्याकाळी ॥१७॥ मुखी म्हणतसे सलाम सलाम । चहूकडे पाहतसे अतिसंभ्रम । तो तरि प्रत्यक्ष पुरुषोत्तम । कोणी नोळखती मतिमंद ॥१८॥ हुंड्या घ्या घ्या ऐशी हांक । दीननाथ देतां नि:शंक । ते हांक नव्हे, बाळाचें द्विजत्व राख । कोणी त्यासि ओळखेचिना ॥१९॥ तेव्हां बोले श्रीदिगंबर । अरे मी आलों पाडेवार । कांही पुसा, जे समाचार । सांगेन आतां या काळी ॥२०॥ तेव्हां सेवक पुसती त्यालागून । अरे तूं कोठिला ? कोण ? । येरु म्हणे नारायणपेठाहून । हूंड्या घेऊन पै आलो ॥२१॥ हे ध्वनि पडतां कानीं । सर्वत्रांसि हर्ष न माये गगनी । आनंदपूर आला सकळांलागूनि । त्यांच्या चित्तसरितेसि ॥२२॥ काय हर्षाचा पूर फुटला । काय हर्षाचा वर्षाव झाला । काय स्वानंदाचा कूप सांपडला । स्वानंदेसि सर्वस्व ॥२३॥ जहाज बुडतां लागला कडेस, । किंवा मरत्या मिळे अमृतरस । तोंवि हर्ष सर्वत्रांस । झाला असे त्या काळी ॥२४॥ सर्वत्रांचे मुखचंद्रास । खेदकेतुग्रहण खग्रास । लागला असे नि:शेष । तो अवधूतजपें निवर्तला ॥१२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP