दासोपंत चरित्र - पदे ४५१ ते ४७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


यापरी ऐकतां त्यांचे वचन । मनी स्मरुन पतिचरण । निर्मून षडस अन्न । बोले काय त्याप्रति ॥५१॥ आपण तरी विधिहरिहर । यांत संशय नसे आणुमात्र । आतां उठावें सत्वर । स्वयंपाक सिध्द पै असे ॥५२॥ इतुके बोलोनि त्यासि । उदक आणिले स्नानासि । स्नान करितां परिधानासि । पीतांबर देतसे मनोहर ॥५३॥ मग गंध पुष्प आदिकरुन । सर्व साहित्य देतसे आणून । मनीं होऊन हर्षायमान ताट मांडिली मणिमये ॥५४॥ अंत:करणी स्मरुन पतिचरण । घेऊन आली षडस अन्न । ते पाहतांच ते तिघे जण । बोले काय पै तीसि ॥५५॥ आह्मी इतरांसारखे नव्हे ब्राह्मण । आमुचा नेम तो अति कठिण । तैसे झाल्यावांचून । अन्न कांही न सेवूं ॥५६॥ तूं तरी पतिव्रताशिरोमणि । तुझी ख्याति असे त्रिभुवनी । तरी आमुचे वचन ऐकूनि । तद्वत आतां पै कीजे ॥५७॥ येरी ह्मणे आपुली आज्ञा प्रमाण । मी करीन जी सत्य पूर्ण । ज्यांत आपुले समाधान । तेणे तुष्टतील हरिहर ॥५८॥ ऐकतां तिचे निर्वाण वचन । हरिहारादिक मनी तोषून । पुनरपि बोलती तिजलागून । नग्न होऊन आह्मा वाढी ॥५९॥ जरी असे अभ्यागतपूजन । तरी तूं होऊन अतिनग्न । आह्मां देई षडस अन्न । तरीच तुज घरी पै जेऊ ॥६०॥ यापरी वचन पडतां श्रवणी । गजबजली निज अंत:करणी । मनी ह्मणे प्राण जावो निघूनि । यापरी कठीण हे दिसती ॥६१॥ यांचे न ऐकू जरी भाषण । हे विन्मुख जातील की ब्राह्मण । हे ब्राह्मण नव्हे विधिहरिगौरीरमणं । यापरी चित्ती पै चिंतिति ॥६२॥ मग क्षणैक होऊन विस्मित । पतीस आठवून ह्रदयांत । ह्मणती काय दीनानाथ । लज्जा राखी प्राणवल्लभा ॥६३॥ आजन्म तुजवाचूंन । इतर पुरुष जनमसमान । हे भावना सत्य असेल मज पूर्ण । तरी लज्जा राखिशील ॥६४॥ तुझे चरणा माझा विश्वास । जरी असेल निश्चयेस । तरी लज्जा राखिशी या समयास । प्राणनाथा दयाळा ॥६५॥ तुम्हीच माहे इष्ट गोत । तुह्मीच माझे कुलदैवत । तुम्हांवीण नेणे पर दैवत । तरेच धांक्शी या काळी ॥६६॥ पतिव्रताचे चरणगज । तेंच कुंकुम भाळी माझे । असेल जरी सहजी सहज । हे लज्जा रक्षिता या काळी ॥६७॥ यापरी स्मरुन महाराज अत्रि । त्यांचे कमंडलुजळ घेऊनि करी । प्रोक्षण करी तिघेवरी । बाळ होती ते तिघे ॥६८॥ बाळा पाहतां नेत्रकमळी । आनंदसागरी बुडाली ती वेल्हाळी । शिशुमुख न्याहाळी वेळोवेळी । मुख चुंबिती आल्हादे ॥६९॥ मनी ह्मणती हे बाळत्रय । उदय झालेती सूर्यत्रय । यांचे प्रकाश पाहतां निश्चये । रविशशी भासे खद्येतवत ॥७०॥ याचा प्रकाश ज्यापुढे । शशितेज काय बापुडे । माझे भाग्य येवढे । कांहो उदय पै झाला ॥७१॥ मी यावज्जन्म पुत्र निधान । नाही देखिले या नेत्रान । आतां या बाळांवरुन । निंबलोण काय करु ॥७२॥ धणी माझी लागली दृष्टी । ह्मणून बाळांस धरिती पोटी । अग्निष्टोमादि करिती ज्यासाठी । त्यांस हे दुर्लभ ॥७३॥ ज्यांचे सत्तेने उत्पत्त्यादि खेळ । ज्यांचे स्मरणे पळे कळिकाल । ते होऊन बाळ केवळ । खेळे अनुसूया दृष्टीपुढे ॥७४॥ धन्य अनुसूयाचे भाग्य होय । ब्रह्मादिक जे देवत्रय । बाळ होऊन निश्चये । स्वानंदे खेळे मातेपाशी ॥४७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP