दासोपंत चरित्र - पदे ३५१ ते ३७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


तूंच असे माझे जगद्गुरु । तूंच असे जी कुलगुरु । तुजवांचून श्रीदिगंबरु । मज कृतार्थ कोण करील ॥५१॥ यापरी बोलतां सद्भक्त । काय बोले महाराज दासोपंत । हे पुढे होईल मनोरथ । सत्य सत्य जाणावा ॥५२॥ आतां मी जातों कार्यास्तव ॥। कार्याअंती येईन स्वभाव । तेव्हा तुमचे मनोभाव । पूर्ण करील दिगंबरु ॥५३॥ यापरी बोलोनि त्यासि । पुढे निघाले स्वानंदाशी । पातले जेथे दक्षिण काशी । प्रेमपूर ते प्रसिध्द ॥५४॥ आधी घेऊनि धूळदर्शन । मग लक्ष्मीतीर्थी केले स्नान । उरकून आपुले अनुष्ठान । पूजा करीतसे यथाविधि ॥५५॥ मूळलिंगाची पूजा करुन । घृतनारीसि पूजिले जाण । नंतर पातले देउळी पूर्ण । प्रेममूर्तिच्या पूजास्तव ॥५६॥ मधुपर्कविधि करुन पूजा । जोडून्न दोन्ही हस्तांबुजा । स्तवन करीतसे सहजी सहजा ।  सहजानंदे देवासि ॥५७॥ जयजयाजी मार्तडराया । भक्तवत्सला स्वानंदनिलया । अगाध की रे तुझी माया । ब्रह्मादिकासिं अगम्य ॥५८॥ अगम्य आगोचर तुझी लीला । भक्तकैवारी श्रीमैराळा । करुणाकरा करुणकल्लोळा । ह्माळसारमणा दयाब्धे ॥५९॥ निजजनाचे घेऊन कैवार । संहारिसि अहंमल्लासुर । दंभमणी निवटून निर्धार । सुखी करिसि स्वभक्ता ॥६०॥ श्रीप्रेमपूरनायक । ऐसे वाखाणिती व्यासादिक । ब्रह्मादिकांचा ध्येय देख । तूंच की रे मल्हारी ॥६१॥ स्वबोधे चढून तरंग । शांतिह्माळसा वामांग । होऊन राही मम अंतरंग । अंतरात्मा दयाळा ॥६२॥ ज्ञानभांडार लावूनि भाळी । उचलीन देहत्रयाची तळी । अनुह्रतध्वनीच्या गदारोळी । नाचेन सहज तव छंद ॥६३॥ नवविध भजन कवडीमाळा । स्वानंदे घालीन निजगळां । मी राहीन चरणकमळा । हेंच मजला वर देई ॥६४॥ तुझे होतां वरप्रद । कैचा मजला भेदाभेद । भेदातीत सच्चिदानंद । तेंच देई रे दिगंबरा ॥६५॥ यापरी वाहतां स्तवनपुष्प । नेत्री चालिले प्रेमबाष्प । तेव्हां प्रसाद मिळतां सोप । श्रीदेवाचा पंतासि ॥६६॥ तें वरभूषण लेवून सर्वांगी । तेथून निघाले लागवेगी । जनां उध्दार करितां मार्गोमार्गी । पातले नंदिग्रामासि ॥६७॥ नांदेडही नाम ग्रामास निर्धार । जेथे गौतमी वाहे निरंतर । ते पाहून क्षेत्र मनोहर । राहिले तेथे दासोस्वामी ॥६८॥ नित्य गंगेचे करुन स्नान । वाळवंटी उरकावे कर्मानुष्ठान । परइच्छे घडतां भोजन । करावें तेव्ह स्वानंद ॥६९॥ आपण स्वमुखेकरुन । कोणा करुं नये याचना पूर्ण । यावरि अन्न मिळाले किंवा उपोषण । हेंही भान नसेचि ॥७०॥ ज्यांची वृत्ति रंगली अवधूती । त्यांस कैचि देहस्थिति । देहभान नसे ज्यांप्रती । त्या क्षुधा तृषा करील काय ॥७१॥ त्या क्षुधा तृषा हे प्राणधर्म । प्राणासाक्षी जो पुरोषत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम । तो दासोस्वामी समर्थ ॥७२॥ त्यांचे पूर्ण अन्नपान । अवधूतमूर्तिचे चिंतन । ते ध्यानामृत करुन पान । सदा तृप्त पै असति ॥७३॥ ज्यास अवस्थात्रयी तेंच ध्यान । ध्यानावांचून न राहे एक क्षण । तेणेयोगे दैदीप्यमान । मुखचंद्रप्रकाश सर्वासि ॥७४॥ तेव्हां तेथील नारी नर । पाहतां हे बाळयोगेश्वर । ह्मणती हे काय पुरुष अवतार । कां हो येथे पातले ॥३७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP