दासोपंत चरित्र - पदे ३२६ ते ३५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


गेल्यानंतर दुसरे दिनी । मातापिता हुडकिती घाबरुनि । चिंता करिती दिन - रंजनी । पुत्रास्तव सर्वस्व ॥२६॥ चहूंकडे धांवती दूत । दृष्टीस न पडे कोणाते । जवळून जातांही निश्चित । दृष्टी चुकती सर्वोची ॥२७॥ सर्वास न दिसे काय कारण । ऐसे ह्मणाल श्रोते सज्जन । तरी तो जातसे अवधूत होऊन । मानव्यालागी केवि भेटे ॥२८॥ मातापिता चिंता पुत्रास्तव । करिता बोलती लोक सर्व । कां खेद करितां त्यास्तव । भेटेल सहज तुह्मांसि ॥२९॥ त्यास कळिकाळांचेही नसे भय । तो कालत्रयी असतां निर्भय । ज्यास रक्षी योगिराय । त्यांची कांही पै चिंता ॥३०॥ ज्यास्तव होऊनि पाडेवार । पादशास देऊनि द्रव्य अपार । सोडवून आणिलासे श्रीदिगंबर । त्यांनचि याला संरक्षी ॥३१॥ यापरी सजाविता परोपरी । तेही संतोषूनि निज अंतरी । मनी करिती निर्धार । भेटेल आमुचा तान्हया ॥३२॥ असो इकडे दासोमहाराज । जो अवतार घेतलासे भक्तकाज । वाटेस चालता सहज । हिलालपुरास पै आले ॥३३॥ बेदर सुभा चिटगोपा परगणा । त्यांतील तो ग्राम जाणा । तेथे असतां सद्भक्तराणा । पातले त्यास्तव आवडीने ॥३४॥ हिलालपुर आणि डोकोलगी । तेथील कुळकर्णी तो भक्तयोगी । त्यास्तव पातले लागवेगी । नाम ज्याचें कृष्णाजीपंत ॥३५॥ शेताचे कांठी सरेटी वृक्षातळी । तो बसला असतां पाहूनि साउली । तेथे पातला गुरुराज माउली । दासोस्वामी समर्थ ॥३६॥ नेणो ते गृहस्थ जन्मजन्मांतरी । काय आराधिला श्रीहरि । किंवा गुरुभक्ति केली परोपरी । तरीच पावले त्यालागी ॥३७॥ त्यांनी पाहतां स्वामीप्रती । कांहीच न राहे देहभ्रांति । प्रत्यक्ष दिसे अवधूतमूर्ति । दृष्टीस त्यांच्या त्या काळी ॥३८॥ मिठी घाली चरणकमळी । मुख अवलोकित वेळोवेळी । मनी ह्मणत ते तये काळी । कांही अवधूत प्रकटले ॥३९॥ त्यांस पाहतां दृष्टी । सहजानंद होतसे पोटी । ब्रह्मानंद भरला सृष्टी । परब्रह्मच काय हे चिन्मूर्ति ॥४०॥ हे तरी दिसे प्रत्यक्ष देव । अवयव असतां निरावयव । काय प्रगटले दीनास्तव । दीनबंधु दयाळू ॥४१॥ त्यांचे दर्शने मनोरथ प्राप्ति । त्यांचे दर्शने हरे खंती । त्यांस पाहतां स्वानंद चित्ती । कां मज प्राप्त कळेना ॥४२॥ यापरी तोपून मनी । पुनरपि मस्तक ठेवून चरणी । काय विनवीतसे मंजुळवाणी । स्वामीप्रति ते भक्त ॥४३॥ अहो महाराज सद्गुरु । दीनवत्सला दीनोध्दारु । मी तों पामरांमाजी पामरु । दर्शने धन्य सहज झालो ॥४४॥ आतां येणे झाले कोठून । पुढे कोठे असे गमन । ते निरोपावें कृपा करुन । करुणाकरा  दयाळा ॥४५॥ आतां चलावें मम मंदिरा । पवित्र करावें जी दातारा । तव पायी करितां थारा । चुकले माझे जन्ममरण ॥४६॥ मी तापत्रयी बहु तापलो । विश्रांतीची सोय नाही देखिलो । आतां उदय होतां दैव पहिलो । प्रभुरायाची चरणकमळे ॥४७॥ करावी आतां हस्तमस्तक । आपण तो केवळ भक्तपाळक । भक्तवत्सल भक्तरक्षक । भवभय हरी रे सुखार्णवा ॥४८॥ मी भवसागरी चालिलो वाहत । तूं काढी रे धरोनि हात । तुजवांचून दीनानाथ । तारील कोण मजलागी ॥४९॥ तूंच अससी माझा सद्गुरु । तूंच अससां कुलगुरु । तुजवांचुनी श्रीदिगंबरु । मज कुतार्थ कोण करील ॥३५०॥

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.