दासोपंत चरित्र - पदे १२६ ते १५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


तेव्हां बाळास बोलती ब्रह्मवृंद । धन्य धन्य रे तुझे प्रारब्ध । तुज साह्य असतां अद्वयानंद । कुलस्वामी भय कैचे ? ॥२६॥ आतां उघडी रे, कमलानयन । द्रव्य पाठविले तुझ्या पित्यान् । तो सन्मुख असे मनुष्य पूर्ण । पूर्णानदें तूं पाही ॥२७॥ मात ऐकतां श्रवणद्वार । चहूंकडे पाहे उघडून नेत्र । तरि तो उभा असे समोर । मनुजरुपें कुलस्वामी ॥२८॥ तेव्हा नेत्री चालिले सप्रेम जीवन । सभेस घालितसे लोटांगण । आनंदे मुखी न निघे वचन । सहजानंदसागरीं बुडतसे ॥२९॥ तेव्हा जे सुख झाले त्याप्रति । वर्णिता भुकेली होती तृप्ति । मग इतरांची काय गति ? । कोण वर्णू शकेल तें सुख ? ॥३०॥ षोडशकलायुक्त सुधाकर । उदया पावला पौर्णिमेच्या रात्र । तेंवि त्या मुलाचा मुखचंद्र । शोभतसे त्या काळी ॥३१॥ किंवा त्याचें मुखांबुज । खेदरात्रौ पावले संकोच । दिगंबररविउदय होतां सहज । विकसित पै होय ॥३२॥ त्याचा मुखांबुजभवानंदमकरंद । घेऊन तेथील ब्रह्ममिलिंद । होऊनि तेव्हां ब्रह्मानंद । ब्रह्मानंदसागरी बुडतसे ॥३३॥ त्या काळी पादशा आपण । पुसतसे त्य मनुष्यालागून । अरे तूं कोठील ? कोण ? । कोणी तुजला धाडिले ? ॥३४॥ येरु म्हणे दिगंबराचे सेवक । जाणून आम्हांस फार विश्वासुक । हुंड्या देऊन आमचे हस्तक । पाठविला असे सर्वस्व ॥३५॥ पादशा म्हणे तूं चाकर । किती दिवसांचा निर्धार । आणि नामही सत्वर । सांग आतां या काळी ॥३६॥ नाम तों दत्ताजी जाण । चाकर सप्त पिढ्यांपासून । मुशारा पुसतां पूर्ण । बोले अन्नार्थी मी असे ॥३७॥ त्यांनी मजला टाकून । कदापि न राहती एक क्षण । जागृती सुषुप्ती आणि स्वप्न । त्यांचे सन्निध मी असे ॥३८॥ मज त्यांस सोडून एक क्षण । राहतां, तें युगासमान; । आतां या बाळाकारणें । पाठविलें असतां, मी आलों. ॥३९॥ आपुला जो बाकीपैका । त्याच्या हुंड्या असे देखा । हे दर्शनी हुंड्या अति चोखा । यांस उधार नसेचि ॥४०॥ हुंड्यांच्या विश्वास नसे तुम्हांसि । तरी द्रव्य रोकडे असे मजपाशी । तें देईन संपूर्ण निश्चयेसि । घ्यावें आतां या काळी ॥४१॥ यापरी बोलोनि त्यासि । पुढे वोतिले द्रव्यराशि । ते पाहतां सर्वत्रांसि । आश्चर्यकर दिसतसे ॥४२॥ रुपये मोजिजेपर्यंत । मनुष्य होता तेथे निश्चित । तो मनुष्य काय ? श्रीअवधूत । स्वामी माझा श्रीदिगंबरु ॥४३॥ धन्य तेथील सभाग्य लोक । धन्य पादशा पुण्यश्लोक ! । धन्य तें महाराज बाळक ! अवतारपुरुष भूतळी ॥४४॥ जे योगयागादि कर्मी शिणती । तीर्थयात्रा करितां वय नाशिती । दुर्लभ दुर्लभ तयांप्रति । यापरी दर्शन होईल ? ॥४५॥ धन्य माझा श्रीदिगंबर । दूर ठेवूनि प्रभुत्वबडिवार । स्वआंगे होऊनि पाडेवार । धांवा घेतसे भक्तास्तव ॥४६॥ ज्याचे अंगी असे लहान थोर । ज्यासि वर्णितां भागले वेद चार । सहा शास्त्री नव्हे निर्धार । अठरांची गति सहज खुटे ॥४७॥ उत्पत्त्यादि व्यवहार । ज्याचे मायेचे बडिवार । तीसही न कळे कळा निर्धार । ऐसा तो प्रभुराणा ॥४८॥ ज्यास नसे येणे जाणे । तो संपूर्ण जगी परिपूर्ण । त्यासि पाडेवार म्हणणे । हे अभिनव पै असे ॥४९॥ पाडेवार पादशा अंतरी । तोच भरला की चराचरी । परि निजभक्तांस्तव परोपरी । चरित्र सहज पै दाविती ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP