दासोपंत चरित्र - पदे ६०१ ते ६२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


तेव्हां तेथें इंद्रादि देव । सहज प्रगटले स्वभाव । स्वानंदे सुमनवर्षाव । करिते झाले आल्हादें ॥१॥ धिमधिम करिती दुंदुभीगजर । ब्रह्मानंदे गाती नारद तुंबर । संपूर्ण मिळाले ऋषीश्वर । वसिष्ठादि महामुनि ॥२॥ सलोकतादि चार्‍ही मुक्ति । अत्रिआश्रमी सदा राबती । ऋध्दि सिध्दि हिंडती । द्वारापुढे संभ्रमे ॥३॥ शमदमादिक सेवकवृंद । तेथे तिष्ठती स्वानंद । कामक्रोधादिकां करिती निषेध । तुमचे नव्हे येथे कार्य ॥४॥ उपरति तितिक्षा विवेक । कोणी न वारिती ऐशियां लोक । सुलीनतादि सकळिक । तेथे राहती अति हर्षे ॥५॥ गंगायमुनादि अनेक सरितां । इच्छूनि आपुली पतिव्रता । धांवती अत्रिआश्रमास तत्त्वतां । लागवेगी त्या काळी ॥६॥ असो सहजानंदगजर । ऋषिआश्रमी करिती सुरवर । गुण वर्णिता अपार । अत्रिअनुसूयाचे आनंदे ॥७॥ तेव्हां ते बाळ दिगंबर । अनुसूया घेऊनि कडेवर । मुख चुंबूनि वारंवार । ह्रदयी धरिती सप्रेमे ॥८॥ वर दिधले दत्त त्रय । यास्तव नांव दत्तात्रेय । अनुसूयाचे तपास्तव निश्चये । प्रगटले स्वामी दिगंबरु ॥९॥ सहज ह्मणतां श्रीदिगंबर । त्यांला नलगे संसारवार । तो राहे सदां विश्रांतिमंदिर । विश्रांतिकारक स्वामी माझा ॥१०॥ असो तेव्हां ब्रह्मादिक । स्वस्त्रियांसहित होऊन हरिख । जाते झाले स्वस्थळासि देख । अनुसूयाचे गुण वर्णित ॥११॥ स्वामी माझा श्रीदिगंबरु । राहतसे अनुसूया ह्र्दयमंदिरु । यापरी हे चरित्र सुखकरु । सुखमय करी सर्वासि ॥१२॥ हे कथा पुराणोक्त । ह्मणाल कां वर्णिलीस निश्चित । तरी आपणीच श्रीअवधूत । वदवित असे सत्यत्व ॥१३॥ हे चरित्र दासोपंत । ते मूर्तिमंतच श्रीअवधूत । ऐसे वारंवार सांगूनि स्वप्नांत । स्वचरित्र सहज बोलवीतसे ॥१४॥ दिगंबरचि जिव्हाग्री राहून । करवीतसे स्वचरित्रकथन । यावांचून जिव्हा जाण । हलेल काय निश्चये ॥१५॥ हे अनुसूयाख्यान निश्चिती । ऐकती आणि ऐकविती । त्यांजला संतती आणि संपत्ती । प्राप्ती ऐसा वर असे ॥१६॥ ते पर्वतच आनंदवन । सलोकतादि तेथील वृक्ष जाण । त्यांचे साउली योगी जन । विश्रामती योगबळे ॥१७॥ सद्भक्तीच्या अनेक लता । श्रध्देची पुष्पे सुगंधता । बोध वारा सुटतां । निर्विकार अमोद दुमदुमी ॥१८॥ तेथील माळी तो विवेक । आळे बांधून वृत्ति अनेक । त्यामाजी फिरवितां निर्मलोदक । मोड फुटती विचाराचे ॥१९॥ स्थळोस्थळी वैराग्य कारंजा मनोहर । शांति जळ उडतसे इंद्रियद्वार । सद्बासना दुर्वाकुर । शोभती त्यांच्या समंतात ॥२०॥ अक्रोधकूपी सोज्वळ । पूर्ण भरले अलोभजळ । त्यांत शोभती सद्भावकमळे । अर्पणास्तव श्रीदेशिका ॥२१॥ तेथील स्वानंदवृक्षांवरी । मुमुक्षुपक्षी निरंतरी । शब्द करिती अद्वयस्वरी । आल्हादेसि सर्वस्व ॥२२॥ त्या वनींचे ब्रह्मफळ । इंद्रायांसि करुन वेगळ । सेवून गुरुभक्त केवळ । अजरामर पै होती ॥२३॥ कित्येक साधनचतुष्टयासन । यावरी सहज बैसून । तेथे करिती अनुष्ठान । अत्रिवरदाकारणे ॥२४॥ कित्येक करिती अष्टांगयोग । कित्येक सांडूनि हटयोग । अखंड करिती राजयोग । योगिराजकारणे ॥६२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP