उपोद्धात

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


गेल्या सहाशें वर्षांत महाराष्ट्रभाषेमध्यें  अनेक कवि होऊन गेले. त्यांनीं निरनिराळ्या वेळीं आणि देशाच्या व समाजाच्या निरनिराळ्य़ा स्थितींत आपली बुद्धिमत्ता ग्रंथरचनेकडे खर्चून देशाला व भाषेला सर्व बाजूंनीं संपन्न करण्याचा यत्न केला आहे. यांपैकीं दरएकांनीं आपापल्या रुचीप्रमाणें वेदान्त, योग, साहित्य, वैद्यक, ज्योतिष, गणित वगैरे अनेक विषयांवर ग्रंथरचना केली आहे. आपल्या बंधूंनीं विपन्नावस्थेंत पडूं नये व आपल्या भाषेला जगांतील श्रेष्ठ भाषांमध्यें स्थल मिळावें, याकरितां ज्यांनीं ग्रंथरचनेंत आपला काळ घालविला, त्या थोर पुरुषांच्या कृतीचा आदर आपण सन्मानपूर्वक व अभिमानानें केला पाहिजे. या थोर पुरुषांची पुष्कळ कृति अजून अनुपलब्ध आहे. तिचा शोध लावून ती सर्वांना पहावयास सांपडेल अशी कांहीं तरी व्यवस्था होणें हें महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीला फार अवश्य आहे. कारण, ही कृति, म्हणजे हे जुन्या कवींचें ग्रंथ, हळूहळू नष्ट होत चालले आहेत; आणि कसर, हवा वगैरेच्या हतून आतांच योग्य वेळीं यांची सोडवणूक न केल्यास महाराष्ट्र या ग्रंथांना कायमचा आंचवेल यांत संशय नाहीं.
इतके वर्षांत अनेक राज्यक्रांत्या व उलाढाली झाल्यामुळें आधींच या ग्रंथांची दैना होऊन गेली आहे व आतां या काळांत तर त्यांचें पुरें दुर्दैव ओढावल्यासारखें झालें आहे. मुद्रणकलेच्या प्रसाराबरोबर हस्तलिखित ग्रंथांविषयीं असलेली पूज्यबुद्धि व आस्था समूळ नाहींशी होत चालली आहे. जवळ असलेले ग्रंथ हळूहळू नकोसे वाटूं लागले आहेत; मग नवीन ग्रंथसंपत्ति जमा करून आपल्या कुटुंबांतल्या इतर मौल्यवान् जिनसांप्रमाणें तिचें जतन प्रेमानें करण्याचें कोठून घडणार ? अशा वेळीं महाराष्ट्राच्या या नष्ट होत जाणार्‍या वडिलार्जित संपत्तीचें अवश्य रक्षण केलें पाहिजे. गमावलेलें द्रव्य कोणी मिळविणारा भेटला तर एखादे वेळेस मिळून जाईल; परंतु कोणताही नामशेष झालेला ग्रंथ कोणीही पुरुष पुन्हां पूर्ववत् निर्माण करूं शकणार नाहीं. यावरून या ग्रंथसंपत्तीची थोरवी कशी आहे, व हिचें आपण किती अदबीनें जतन केलें पाहिजे, हें उघड आहे.
याकरितां या आपल्या पडत्या काळांत आपल्या पूर्वजांच्या आचारविचारांची आपणांस ओळख व्हावी, त्यांचे शब्द सर्वकाळ आपल्या जवळ रहावे, त्यांच्या उपदेशाची जोड केव्हांही घडावी व त्यांनी श्रमपूर्वक रचलेले ग्रंथ अगदीं नष्ट होऊं नयेत अशा हेतूनें " महाराष्ट्रकवि '' या नांवाचें हें मासिकपुस्तक झाले होते..
या मासिकपुस्तकांत शके १७४० च्या पूर्वींचे, म्हणजे स्वराज्याच्या अमदानींतले व त्यापूर्वींचे, काव्यग्रंथ छापण्याचा विचार योजला आहे. यांत वेदान्त, पुराण, ज्योतिष, गणित, वैद्यक, चरित्र, पवाडे, लावण्या, कटाव, पदें, वगैरे सर्व तर्‍हेचे विषय हळूहळू येतील. हे ग्रंथ पूर्वीं प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांपेक्षां काव्य या दृष्टीनें कदाचित् जरा कमी योग्यतेचे वाटण्याचा संभव आहे. कदाचित् असें कोणास वाटलें, तरी देखील हें सर्व वाड्मय अनेक कारणांसाठीं फार उपयोगी आहे. य ग्रंथांनीं त्या त्या वेळचे आपले आचारविचार आपणांस चांगले कळूं लागतील. त्या वेळच्या शकुनवंत्या, व्यवहारनिर्णय, मायनेपत्रकें, संवत्सरफलें वगैरे कागद जगापुढें मांडतां आले तर आपल्या सामाजिक इतिहासावर नवीन प्रकाश पडेल. वास्तविक पाहतां यापेक्षां आणखीही निराळ्या तर्‍हेचे जुने ग्रंथ छापून निघणें अवश्य आहे. हल्लीं ज्यांचा ` इतिहास ' म्हणून संग्रह करण्यांत येतो, त्यांहून अगदीं भिन्न असे ग्रंथ महाराष्ट्रांत वारंवार आढळतात. वेताळपंचविशी, शुकबहात्तरी, सिंहासनबत्तिशी वगैरेसारिख्या कथा, जुन्या काळच्या कर्त्या पुरुषांच्या सोप्या शब्दांनीं सांगितलेल्या आख्यायिका, किंवा कहाण्या, विद्यार्थिदशेंतल्या होतकरू मुलांस वाचण्यासाठीं रचलेल्या बखरी, त्यावेळचीं नाटकें, कथानकें, तशाच आजोबांनीं नातवांना सांगितलेल्या कावळाचिमण्यांच्याच, परंतु अर्थपूर्ण, गोष्टी हीं सर्व एका दृष्टीनें पाहतां, आपल्या अत्यंत महत्वाच्या अशा काळच्या इतिहासाचीं उपांगें होत आणि या पूर्वकालीन स्थितीची कल्पना बांधण्याला या सर्वांचें प्रकाशन होणें फार अवश्य आहे. पश्चिमेकडे गाजलेल्या ग्रीक मुलांच्या कोंवळ्या मनाला वळण लागण्याकरितां जशी ` इसाबनीति ' रचली गेली तशीच आर्यावर्तांतल्या मुलांकरितां ` विष्णुशर्म्याची नीति ' लिहिली गेली. याच दृष्टीनें पहातां लहानसहान गोष्टीपासून तों भारतरामायणापर्यंतचे सर्व ग्रंथ हे एक तर्‍हेचे शिक्षक होत. लहान मुलांचीं मोठीं माणसें व मोठ्या माणसांचे कर्ते पुरुष बनविण्याच्या कामीं या सर्वांचें साहाय्य अवश्य आहे. हीं केवळ करमणुकीची साधनें नसून, यांची कामगिरी फार मोठी आणि फार महत्वाची आहे. ह्या ग्रंथांवरून तत्कालीन महाराष्ट्रसंस्कृतीचें स्वरूप ओळखण्यास फार साहाय्य होणार आहे. त्या त्या काळीं लोकांच्या आचारांचें व विचारांचें रूप काय काय होतें, कोणत्या कल्पना विशेष प्रचलित होत्या व कोणत्या महाकल्पनेच्या सिद्धीकडे राष्ट्राचें मन वेधलें गेलें होतें, हें ह्या ग्रंथांच्या प्रकाशनापासून समजणार आहे. तेव्हां असले हे ग्रंथ अवश्य प्रसिद्ध झाले पाहिजेत.
यांत कोणते ग्रंथ छापावयाचे हें सांगितले. परंतु, ते कसे छापावयाचे हें सांगणें अवश्य आहे. ग्रंथ छापतांना त्याची मूळ भाषा आहे तशीच ठेविली जाईल; व लेखकांचे अज्ञानामुळें झालेले हस्तदोष दुरुस्त करून ग्रंथ प्रतिशुद्ध करण्यापलीकडे छापण्यास घेतलेल्या ग्रंथांत कांहींही बदल केला जाणार नाहीं. ग्रंथाच्या एकापेक्षां अधिक प्रति मिळाल्या तर त्यांचे पाठभेद टीपांच्या रूपानें देऊं. ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला म्हणजे कवीची उपलब्ध असलेली चरित्रात्मक माहिती वगैरे बाबी थोडक्यांत सांगूं.
आम्हांस जे ग्रंथ अप्रसिद्ध आहेह्त असें वाटतें, त्यांची संगतवार यादी क्रमाक्रमानें प्रसिद्ध करूं, म्हणजे त्यांच्या आणखी प्रतींसंबंधानें शोध करण्यास व ते छापलेले आहेत किंवा नाहींत याचा निकाल करण्यास सवड होईल.
यापुढें '' स्फुटसंग्रह '' नावाचें एक सदर सुरू करण्याचा विचार आहे. यांत लहान लहान प्रकरणें, सुरस कटाव, संतमालिका, पवाडे, अष्टकें वगैरे देऊं व यांचें पुस्तक स्वतंत्र बांधतां यावें म्हणून यांचा अनुक्रम निरनिराळाच चालू ठेवूं.
या मासिकपुस्तकासंबंधानें आणखीही एक गोष्ट सांगणें फार अवश्य आहे. ती ही कीं, उपलब्ध असलेली सर्व मराठी कविता छापून झाली आहे व आतां छापावयाचें असें फारसें कांहीं राहिलें नाहीं, असा अजून पुष्कळांचा समज आहे. परंतु ही अगदीं चूक आहे. छापून काढावयाचा भाग छापलेल्या भागाच्या पुष्कळ पटीनें जास्त आहे. मानभावांसारख्या जुन्या पंथांतल्या वाड्मयापैकीं एक अक्षरही अजून छापलें गेलें नाहीं आणि आपल्या इकडचाच अप्रसिद्ध ग्रंथसंग्रह इतका आहे कीं, या लहानशा यत्नासारखे पांच चार यत्न एकदम सुरू केले तरी देखील त्यांची एकमेकांस बिलकुल अडचण होणार नाहीं. आत्यास्वामी, उद्धवचिद्धन, उद्बोधनाथ, एकनाथ, कान्हु पाठक, कृष्णदास, गोपाळ, गोविंद, चोखामेळा, चंद्रात्मज रुद्र, जगन्नाथ, जगजीवन, जनार्दन, जयराम, जीवाशिवा, तुकाविप्र, त्र्यंबक, दासोपंत, धुंडिराज, नागेश, नरहरि, नामा पाठक, नामा विष्णुदास, नारायण, नरहर धोंडी, निरंजन, निरंजनमाधव, पांडुरंग, पूर्णदास, पूर्णनाथ, पूर्णब्रह्म, बस्वलिंग, ब्रह्मदास, मध्वमुनि, महीपति, महालिंगदास, माधव, मोरेश्वर, मोरोपंत, मैनानाथ, रघुनाथ, रंगनाथ, राम, रामजोशी, रामकृष्ण, ललितानंद, विश्वनाथ, व्यंकट, वेणु, शामाराध्य, शिवकल्याण, शिवदिनकेसरी, सोपानदेव, संतुदास, हरि, हरिबोवा, हरिहरेंद्र, ज्ञानदेव वगैरे प्रत्येक कवीच्या कृतीचा काहींना कांहीं तरी अप्रसिद्ध भाग आमचे जवळ आहे. या सर्वांच्या ग्रंथांची यादी देऊं म्हटलें तर प्रस्तुतच्या अंकाएवढा एक नवा ग्रंथच लिहावा लागेल. अप्रसिद्ध काव्यांची एक संगतवार यादी आम्ही देणारच आहों, तेव्हां तूर्त आमचे वाचकांस एकढेंच कळविणें इष्ट दिसतें कीं, मजकुराच्या दृष्टीनें हें मासिकपुस्तक निदान दहा पंधरा वर्षें तरी चालण्यास बिलकुल हरकत नाहीं, एवढा संग्रह हल्लीं आम्हांस उपलब्ध आहे. तसेंच या यत्नानें कोनत्याही तर्‍हेनें ` काव्यसंग्रहा ' स व्यत्यय येईल, अशी दिशा केव्हांही आम्ही पतकरणार नाहीं, हेंही कळविणें इष्ट आहे. आमचे गुरुवर्य कै० रा० रा० जनार्दन बाळाजी मोडक यांनीं सुरू केलेला व आमचे स्नेही रा० रा० नारायणराव कळकर यांचे हातानें हल्लीं चालत असलेला हा स्तुत्य उद्योग आम्हांस फार प्रिय आहे. कव्यसंग्रहांत छापला जाणारा मजकूर या मासिकांत येऊं नये म्हणून आम्ही जे ग्रंथ छापणार, त्यांची यादी काव्यसंग्रहाकडे पाठवून कोणतें ग्रंथ यांत छापावे, हें त्यांचे सल्ल्यानेंच ठरवितों. सारांश, या यत्न कोणत्याही तर्‍हेनें विरोधी नसून केवळ साह्यकारी व्हावा व तो त्यांच्याच सल्ल्यानें आणि सह्यानें चालवावा असा आमचा पूर्ण संकल्प आहे.
आजपर्यंत मराठी भाषेंत प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही मासिकापेक्षां आमची कमी असलेली वर्गणी पाहून, इतक्या क्षुल्लक वर्गणींत हें मासिकपुस्तक चालवूं नये व हें चालणारही नाहीं, असा उपदेश आमच्या मित्रमंडळीकडून व इतर अनुभवशीर गृहस्थांकडून होत आहे. या उपदेशांत पुष्कळ तथ्यही आहे. याबद्दल आम्हांस इतकेंच सांगणें आहे कीं, ज्यांस परमेश्वरानें ऐपत दिली अहे अशा गृहस्थांनीं देणग्यांच्या रूपानें आम्हांस मदत करावी. वर्गणी अगदीं थोडी असल्यामुळें आम्ही हातीं घेतलेलें हें काम चालू राहण्यास अशा तर्‍हेच्या मदतीची फार गरज आहे. आरंहींच या कामास येथील वकील रा० रा० केशव आप्पाजी पाध्ये, बी. ए. एलएल., बी., यांनीं १०० रुपयांची देणगी दिली; तिचा आम्ही आनंदानें स्वीकर करितों. व या पुढेंही महाराष्ट्रांत अशा तर्‍हेची मदत मिळेल अशी आम्ही आशा करितों, व आतां सर्व विश्वाचा जनक आणि बुद्धीचा प्रेरक जो श्रीसूर्यनारायण त्याची आम्हांस उत्साह व बल देण्याविषयीं प्रार्थना करून या लहानशा कामास सुरवात करितों.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP