दासोपंत चरित्र - पदे ५२६ ते ५५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


आणखी बोलली काय हरिख । आपुले चरणी जडो मस्तक । शिरी असतां अभय हस्तक । माझे दैवास कोण वर्णी ॥२६॥ ह्र्दयीं पूजितां प्रभुचरणकमळ । याचें असे हे केवळ फळ । तुष्टूनि ब्रह्मादि होऊन बाळ । खेळती ह्रदयापाळणी ॥२७॥ आतां या बाळांवरुनि । जाऊं काय मी वोंवाळूनि । यांचे तेज न समाये सदनी । प्रत्यक्ष हरि हर हे असे ॥२८॥ मजला जाणूनि अत्यंत दीन । मजला जाणूनि अत्यंत सुतहीन । आपुली कृपा होता पूर्ण । हें शिशुरत्न मज प्राप्ति ॥२९॥ कांतेची ऐकतां प्रेमवाणी । मुनीस न समाये हर्ष गगनी । मग काय बोले त्रिवर्गासि पाहूनि । येणे किंनिमित्य हे मायहो ॥३०॥ ते तिघी होऊन अति सुलीन । विज्ञापना करिती मुनीकरण । या पतिव्रतेचा महिमा नेणोन । सत्व पाहिले सर्वस्व ॥३१॥ त्याचा हा प्रादुर्भाव । पति आमुचे देवाधिदेव । या पतिव्रतेचा पाहून भाव । बाळ झाले स्वलीळे ॥३२॥ आतां आपण कृपा करुन । आह्मां द्यावें पतिदान । या परी मुनीस बोलून । अनुसूयास मग स्तविती ॥३३॥ जय जय अनुसूया ज्ञानखाणी । तूं पतिव्रतांमाजी शिरोमणी । धन्य धन्य तूं त्रिभुवनी । तुज ऐसी न देखो पतिव्रता ॥३४॥ नेणतां तुमचे महत्म । आह्मां चढले अभिमान परम । तुझे पाहतां पादपद्म । हरली सर्व अहंवृत्ति ॥३५॥ तूंच कृपा करुन माये । पतिदान द्यावें निश्चये । यापरी पुनरपि बोलूनि पाय । अनुसूयाचे पै धरिती ॥३६॥ धन्य ते हरि हर ब्रह्मा । धन्य ए सावित्री उमा रमा । दूर ठेवूनि प्रभुत्वमहिमा । भक्तमहिमा पै वाढविती ॥३७॥ असो ते देवांगनाचे वचन । ऐकतांचि ऋषि तोषून । बोले काय अनुसूयाकारण । घेऊन येई कमंडलोदक ॥३८॥ तेव्हा पतिव्रता आणून जीवन । सप्रेम वंदी पतिचरण । मुनि प्रोक्षिले बाळांवरी जाण । तेणे प्रगटले पूर्वरुप ॥३९॥ चतुर्मुख कमलासन । चौभुज कमलारमण । पंचवदने उमारमण । प्रकट ते झाले ते काळी ॥४०॥ प्रत्यक्ष पाहतां विधि हरि हर । ऋषीस नावरे गर्हिवर । नेत्री चालिले प्रेमनीर । सर्वांगा दाटला अष्टभाव ॥४१॥ अष्टभाव दाटता ऋषीप्रती । देहाहंकार समूळ ग्रासिती । पुढे करावी स्तवन स्तुति । देही भान नसेचि ॥४२॥ काय आनंदाचा पूर आला । ब्रह्मानंदाचा वर्षाव झाला । सहजानंदकूप सांपडला । ऐसे गमतसे मुनीकारण ॥४३॥ जेथें प्रकटले विधि, हरि, हर । तेथील तेज न माये अंबर । काय उदय पावले कोटी दिनकर? । एक काळी ऐसे गमे ॥४४॥ मुनीची पाहतां निर्विकल्पवृत्ति । ब्रह्मादि होऊन आनंद चित्ती । " धन्य धन्य " ह्मणूनि उठविती । अत्रिऋषीसि स्वानंद ॥४५॥ सावध होतांच मुनि । दृढ लागतसे हरिहरचरणी । " मज कृपा करा " ह्मणूनि । वारंवार नमीतसे ॥४६॥ चरणी ठेवून मस्तक । संपुटिका करुन ह्स्तक । स्तोत्र करीतसे होऊन हरिख । हरिहारांसि सप्रेम ॥४७॥ " जय जय ब्रह्मा, ब्रह्मांडकारका । कृष्णीकुळभूषणा, विश्वपालका । विश्वेशा विश्वासि निजपददायका । दाक्षायणांपते नमोस्तु ते ॥४८॥ ब्रह्मा, विष्णु, महेश्वर । लोकां भेद दिसे नाममात्र । परी तुह्मी एकचि निर्धार । अनेक घटी जेवि एकचि रवि ॥४९॥ सुवर्ण एक, अलंकार नाना; । मृत्तिका घट भिन्नभिन्ना । तेवि तुह्मी सच्चिदानंद परिपूर्ण । तुह्मां त्रिवर्गी भेद कैचा ? ॥५५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP