दासोपंत चरित्र - पदे ७२६ ते ७५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


स्वानंदे अर्पूनि पुष्पांजळी । मस्तक ठेवूनि चरणकमळी । मूर्ति पाहूनि वेळोवेळी । स्तवन करितसे अति हर्षे ॥२६॥ जय जय अत्रिवरदा अविनाशा । दत्तत्रेया त्रयमूर्तिवेशा । कालाग्निशमना स्वप्रकाशा । योगीजनवल्लभा ॥२७॥ लीलाविश्वंभरा, सिध्दराजा । ज्ञानसागरा, विश्वबीजा । मायामुक्ता, अवधूतराजा । मायासहिता नमोस्तु ते ॥२८॥ जय जय आदिगुरु शिवमूर्ति । देवदेवा तुझी अतर्क्य कीर्ति । निगमागमां न कळे गति । करुणार्णवा दिगंबरा ॥२९॥ कृष्णश्यामा, कमलनयना । कलिकल्मषभंजना करुणाघना । कारुण्यसिंधु भक्ततारणा । भक्तकल्याणकारका ॥७३०॥ कल्याणाचें कल्याण । विश्रांतीचे विश्रांतिस्थान । मंगलाचे मंगल पूर्ण । चरणचि आपुले अवधूता ॥३१॥ मी तो पामरांमाजी पामर । पतितांमाजी पतिततर । पतितपावन निर्धार । तुजलाच साजे सर्वेशा ॥३२॥ मी नेणे कांही जप तप । मी तों अत्यंत पापरुप । तरी मजला पाहणे चिद्रूप । चरण प्रभूचे हे नवल ॥३३॥ रंकासि रायपण । पाप्यासि इंद्रसिंहासन । तैसे मजला देणे चरणदर्शन। हे महिमा प्रभूची अगम्य ॥३४॥ मी नेणे करावी कैशी भक्ति । मजमाजी नसे वैराग्यस्थिति । धारणाध्यानाची कोण रीति । तेंही कांही कळेचिना ॥३५॥ ऐसे माझे अधिकार । आपण तरि कृपासागर । भक्तकैवारी श्रीदिगंबर । म्हणूनि चरणी लागतसे ॥३६॥ मग स्वकरे उठवूनि मी अवधूते । पंतांस धरी निजपोटाते । हस्त फिरवूनि मुखावरुते । बोले काय स्वानंद ॥३७॥ अरे बाळा प्राणसखया । अति सुकुमार की रे तुझी काया । मात्प्राप्तीस्तव भक्तराया । श्रम फार पावलास की ॥३८॥ आतां मी असे सुप्रसन्न । वर माग इच्छित मन । ते करीन मनोरथ पूर्ण । अविलंब योग या काळी ॥३९॥ यापरी ऐकतां वरदवाणी । पुनरपि पंत मस्तक ठेवूनि चरणी । बोले काय स्वानंद होऊनि । अवधूतासि त्याकाळी ॥७४०॥ " जय जय जी दत्तात्रेया । भक्तवत्सला स्वानंदनिलया । हेंच मागणे आपुले पायां । पायींच थारा पै द्यावा ॥४१॥ आपुले चरणी जे सुख । ते ब्रह्मांडी नसे देख । मजला जाणूनि पाईक । पादुका करुनि ठेविजे ॥४२॥ मी तों पामर मतिमंद दीन । मज कोणीच नसे चरणांवांचून । माझें द्विजत्व रक्षिले स्वये प्रगटून । मनुजरुपे सर्वस्वे ॥४३॥ किती आठवूं उपकारां ? । उत्तीर्ण नव्हे जी दातारा । मज नको संसारवारा । श्रीदिगंबरा दयाळा ॥४४॥ कामक्रोधादि वैरी । मज जाच करिती परोपरी । तूंच वारी वारी गा भवारि । भयनाशका दयाब्धे ॥४५॥ यापरी पंतांची वचनोक्ति । परिसतां श्रीअवधूतमूर्ति । अत्यंत आनंद होऊन चित्ती । केले काय तेधवां ॥४६॥ पंतांसि बैसवूनि सन्मुख । मस्तकी ठेवूनि अभयहस्तक । उपदेश करीतसे सम्यक । गुरुसंप्रदायक्रमेसी ॥४७॥ आपुले जीवीची जे खूण । तेचि महावाक्यउपदेश पूर्ण । पूर्ण कृपावंत होऊन जाण । पंतासि करिती दिगंबरु ॥४८॥ पंतासि होतां हस्ताभय । वृत्ति झाली तन्मय । तन्मय होतां वृत्ति निश्चये । सबाह्य अवधूत प्रकटले ॥४९॥ अवधूती रंगतां चित्तवृत्ति । कै त्याजला देहस्थिति । सर्वेद्रियद्वारा ब्रह्मानंद स्फुरती । स्फुरण होतसे सर्वस्व ॥७५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP