दासोपंत चरित्र - पदे २६ ते ५०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


तेव्हा संपूर्ण देशामाझारी । बहमनी पादशाह अधिकारी । ते राहत असता बेदरीं । तेथेच नेले त्यांलागी ॥२६॥ दोन लक्ष रुपये । बाकी असतां निश्चये । तेव्हा केले ते काय । परिसावें सविस्तर ॥२७॥ त्यांसपुसतां सरकारपैका । तुजकडे बाकी असतां निका । तो दिलेवांचूनि सुटका । तुजला कैसी होईल ? ॥२८॥येरु म्हणे, अवर्षणामुळे । सरकारपैका बाकी राहिले; । आपण दयाळू केवळ । क्षमा आतां करावी ॥२९॥ आपुले अभय असल्यास जाण । द्रव्य देईन करोनि यत्न । ऐसे वचन ऐकतां जाण । बोले काय तें पादशा ॥३०॥ " तुझे सुटकेस पाहिजे धन । त्यास तूं देई लोकांसि जामीन । नातरि पुत्रास येथे ठेवून । जाऊन पाठवी द्रव्य कीं " ॥३१॥ ऐकतां ऐशी यजमानमात । तो गृहस्थ चिंता करी मनांत । या बाळास ठेवून येथ । कोण्यापरी मी जाऊ ? ॥३२॥ जेव्हां गृहस्था आणिलें बेदरास । तेव्हांच पुत्रही असे समागमेस; । पुत्र कोण अवतार पुरुष । दासोपंत महाराज ॥३३॥ त्याची सौदर्यता देखून । पादशा होतसे हर्षायमान । म्हणतसे, " सौंदर्य वोतून भववान । घडविली काय हो ही मूर्ति ? ॥३४॥ मज पाहतां या बाळा । धणी न पुरे वेळोवेळा । हा काय असे स्वानंदपुतळा । यापरी मनीं भावितसें ॥३५॥ ऐसा रत्न जरि असतां मम घरीं । होईल कीं राज्याधिकारी । संपूर्ण पाहतां या चराचरी । या समान कोणी नसेचि ॥३६॥ संपूर्ण बुडो माझें द्रव्य । परि हा बाळ मिळावा निश्चय. " । कीं त्यांस संतान नसतां हे उपाय । मनीं योजना करीतसे ॥३७॥ आणखी काय करी विचार ? । " हा तो दिसतो द्विजकुमार । परी राजचिन्ह साचार । याचे प्राप्त होतां निर्धार । राजसिंहासनी स्थापीन मी. " ॥३९॥ यापरी योजना करुनि मनीं, । बोले काय गृहस्थालागूनि । निजपुत्रासि येथे ठेवूनि । तूं जाय आतां देशाकडे ॥४०॥ एक मासाचा करुनि करार । तूं जाय येथूनि सत्वरे; । पैका पोहचतां नेमावर । पुत्र येईल ॥४१॥ पैका न येतां मासा अंती । तुझा पुत्र मिळेल मम याती । हें तरि जाण तूं निश्चिती । ऐसे पादशा सांगतसे ॥४२॥ यापरी त्याचेपासून । कागद घेतले लिहून । गृहस्थ लाचार होऊन । कागद लिहून देतसे ॥४३॥ कागद देऊन त्यांसि । प्रयाण केले देशासि । चिंता करितसे निजमानसी । पुनरपि हा पुत्र पाहीन काय ? ॥४४॥ कैसे दैव दुर्धर ! । सोडून कैसा जाऊं हा पुत्र ? । पुत्र नव्हे, हा प्राण माझा निर्धार । केंवि आतां ठेवूं मी? ॥४५॥ यापरी मनीं करुनि चिंता । ह्रदयी आठवूनि श्रीअवधूता । बोले काय पुत्रासि तत्वता । तें परिसावे भाविकहो ॥४६॥ ’ अरे पुत्रा तान्हया । अति सुकुमार कीं, रे तुझी काया । क्षणैक राहतां तुज सांडूनिया । तें युगवत् कीं रे मजलागीं ॥४७॥ जळो जळो माझे जिणे ! । कीं जळो जळो माझें प्रपंच करणे ! । तूं माझे पंचप्राण । टाकूनि आतां केविं जाऊं ? ॥४८॥ तेव्हा बोले काय पुत्रराज । ’ तोच ह्रदयस्थ असतां श्रीयोगिराज । त्यालाच असे आपली लाज । चिंता किनिमित्य पै करितां ? ॥४९॥ तोचि आमुचा कुलदैवते । तोच रक्षील माते । तो जगदात्मा निश्चिते । तो सन्मुख असतां भय काये? ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP