दासोपंत चरित्र - पदे १ ते २५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यै नम: । श्रीमदादिगुरुदत्तात्रेयाय नम: । ॐ नमो सद्गुरु दिगंबरा ! । सहजानंदा ! सौख्यसमुद्रा ! । अज्ञानतमहर दिवाकरा ! । गणेशरुपा, तुज नमो ! ॥१॥ सकृत म्हणतां गणपति । समूळ हरे देहभ्रांति. । तूंच प्रगटसी सर्वा भूती । सर्वातरात्मा दयाळा ॥२॥ जय जय आदिमाये जगदंबिके । स्वानंदवनीचे दिव्य कळिके । भक्तवत्सले ! विश्वव्यापिके ! । विश्वानंदे ! । श्रीशारदा ! ॥३॥ आतां वंदू कुलस्वामी । ऐसे म्हणतां सप्रेमी । स्वये प्रकटून ह्रदयपद्मी । प्रेम देतसे बाह्यांतर ॥४॥
प्रेमपुरनायक । ऐसे वाखाणिती व्यासादिक । ब्रह्मादिकांचे ध्येय देख । मार्तंड माझा कुलदैवत ॥५॥ त्यास ध्यातां ह्रत्कमळी । वृत्ति रंगली तत्पदकमळी । तेणे योगें पुष्टि चढली । निज वाचेसि निश्चये ॥६॥ सप्रेम वंदूनि मातापिता । जे सकळ देवतांचे स्थान तत्वता । त्यांचे अभयकर घेऊनि माथा । प्रेमास पात्र मी झालो ॥७॥ आतां वंदू संतसज्जन । जे वैराग्यसिंदूची दिव्य रत्ने । त्यांचे अभय होतांचि पूर्ण । पुढे चालेल ग्रंथरचना ॥८॥ त्रयमूर्तिरुप दत्तात्रेय । ब्रह्मादिकांचे निजध्येय । संपूर्ण उपनिषदांचे गर्भ होय । अतर्क्य महिमा निगमागमां ॥९॥ तो दत्तच माझा सद्गुरु । नाम जयाचे श्रीदिगंबर । सहजानंददायक चराचरु । अंतरात्मा सर्वेश ॥१०॥ त्यांचे अवतारचरित्र । जें सुखाचे सुखसार । युगायुगी जे झाले विचित्र । तें परिसावें स्वानंदे ॥११॥ जो आदिगुरु योगिराज । जो विश्वाचे मूळ बीज । जगदोध्दारास्तव सहज । अवतरले मनुजरुप ॥१२॥
ते मानवी दिसतांही निर्धार । ते मानवी नव्हे सर्वेश्वर; । त्यांचे जें चरित्र सार । बोलूं इच्छा निजचित्ती ॥१३॥ तरि चित्ताचें चेतकत्व । बुध्दीचें बोधकत्व । सदगुरु असतां सत्यत्व ! त्यावीण वदती कोण असे ? ॥१४॥ तेच वैखरी प्रवेशून । कथन करवीतसे स्वसत्तेन; । ते परिसावें स्वानंदमन । श्रोते तुम्ही दयाळू ॥१५॥ नारायणपेठचे देखपांडिये । नाम ज्यांचे दिगंबरराये, । पार्वती त्यांची भार्या निश्चये । पुण्यश्लोकांमाजी अग्रणी ॥१६॥ नेणो ते जन्मजन्मांतरी । काय आराधिले श्रीहरि । तरिच त्यांचे उदरीं । अवधूत अवतरले पुत्ररुपे ॥१७॥ नाम ज्यांचे दासो दिगंबर । जे स्वामीही असेत निर्धार । ज्यांचे मुखी गीतार्थगजर । सव्वालक्ष झाला असे ॥१८॥ तेच महाराज दासोपंत । श्रीदत्ताचि ते मूर्तिमंत । जगदोध्दारास्तव निश्चित । त्या गृहस्थाघरी अवतरले ॥१९॥ सुहास्यवदन, आकर्णनयन, । सरळनासिक गौरवर्ण । आजानुबाहु, सर्वलक्षणसंपन्न । अनुपम्य, जगी अवतरले ॥२०॥ माता पिता सौभाग्यसंपन्न । त्यांचे उपयन आणि लग्न । करिते झाले द्रव्य खर्चून । स्वानंदेसी त्या काळी ॥२१॥ यापरी त्यांचे मातापिता । पुत्रसहवर्तमान असतां । पुढे काय वर्तली कथा । ते परिसावी सप्रेम ॥२२॥ नारायणपेठादि पंच महाल । दिगंबरराय देशस्थ तेथील । ते फार योग्य असतां वहिल । तेथील अधिकारी तेच होते ॥२३॥ तेथील द्रव्य संपूर्ण । देशपांडियांचे विद्यमान । सरकारी पावते करुन । द्यावें ऐसा नेम असे. ॥२४॥ यापरी मर्यादा असतां ।एके वर्षी अवर्षण पडतां । सरकारपैका न पोहचतां । यांस नेलें बेदरासि. ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP