दासोपंत चरित्र - पदे ३७६ ते ४००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


पाहतां यांचे मुखचंद्र । धणी न पुरे नेत्रचकोर । धन्य माता याची. ऐसे सुंदर । पुत्र प्रसवली ॥७६॥ कोणी ह्मणती धन्य भार्या सुंदरी । काय तिने आराधिला श्रीहरि । तरीच याची अर्धीगी निर्धारी । झाली असे सत्य सत्व ॥७७॥ कोणी ह्मणती हा योगभ्रष्ट । कोणी ह्मणती हा पुरुष वरिष्ठ । कोणी म्हणे याचे सर्वोत्कृष्ट । तप दिसतसे याकाळी ॥७८॥ कोणी ह्मणती मातापिता यालागी । असतील काय या लागी । जरी असते येत होते लागवेगी । धुंडीत यास्तव या स्थळा ॥७९॥ कित्येक प्रत्यक्ष पुसती त्यासि । पिता तुमचे कोण देशी । येरु ह्मणे मातापिता आह्मासि । अवधूत असे सर्वा ठायी ॥८०॥ तोच माझा तातमाउली । तोच मजला प्रतिपाळी । तोच रक्षितो मज वेळोवेळी । त्याविण कोणी नसेचि ॥८१॥ यापरी ऐकतां त्याचे बोल । सर्वत्रासि येति सुखाचे डोल । ह्मणती हा बाळ नव्हे कर्पूरधवळ । प्रकटले सहज मनुजरुप ॥८२॥ पुढे याचेनियोग । तरतील संपूर्ण जग । हे मानवी दिसती चांग । मानवी कांही नसेचि ॥८३॥ याची गोष्ट पडतां श्रवणी । वैराग्य उपजते अंत:करणी । हा वैराग्यसिंधु चिद्रात्नखाणी । लोक बोलती वृध्दा वृध्दा ॥८४॥ असो तेव्हा दासोस्वामी । विचार करी निजह्रत्पद्मी । सत्वर भेटावे सद्गुरु स्वामी । ह्म उपावो करावा ॥८५॥ तरी जावे मातापुरा । तेथे श्रीदिगंबरा । जो भक्त कैवारी दीनोध्दारा । दीनकामकल्पद्रुम ॥८६॥ आधी न जातां मातापुरा । कैचा भेटेल योगेश्वर । ते त्याचे विश्रांतिमंदिर । विश्रांतिकारक ते मूर्ति ॥८७॥ आधी प्राप्त न होतां तुर्यावृत्ति । कैशी होईल स्वरुपप्राप्ति । तरी तुर्याचे की हें निश्विति । मातापूर मूळ पीठ ॥८८॥ यापरी विचार मनांत । करुन निघाले दासोपंत । ज्यास अवधूत वेळाइत । सप्रेमेसि त्यांलागी ॥८९॥ धन्य ते महाराज समर्थ । ज्याचे नाम घेता कृतार्थ । सहज होतसे जन समस्त । जगदोध्दारास्तव अवतरले ॥९०॥ जेव्हा झाले गंगापार । त्यांचे दृष्टीस संपूर्ण चराचर । दिसतसे श्रीदिगंबर । दिगंबरमय आपण पै भविती ॥९१॥ तरी मी आहे कोण । जातो कोण्या ठिकाण । हे भान ग्रासूनि जाण । पुढे पाऊल पै ठेविती ॥९२॥ ज्यांची वृत्ति दत्तमय । ज्यांनी ध्यातसे योगिराय । ते दत्त होऊन निश्चये । पुढे पुढे पै जाती ॥९३॥ आधी पातले मातापुर । मूळ पीठ तें साचार । जेथे वसती योगेश्वर । स्वरुपप्राप्तीकारण ॥९४॥ चढून पर्वतशिखरी । प्रवेशले देउळामाझारी । सप्रेम पाहून त्रिपुरसुंदरी । पूजिती तेव्हां षोडशोपचार ॥९५॥ षोडशोपचार करुन पूजा । सद्भावे जोडून हस्तांबुजां । स्तवन करिती सहजी सहजा । जगदंबेसि त्या काळी ॥९६॥ जय जय जगदंबे प्रणवरुपिणी । सच्चिदानंदे सौभाग्यदायिनी । सौभाग्यकारके आदिभवानी । कल्याणदाते नमोस्तु ते ॥९७॥ नमो अंबे अंबुजदलनेत्रे । नमो अंबे अखिलश्रुनिसारे । नमो अंबे आदिकुमारे । करुणाकरे दयाळे ॥९८॥ अंबे तव चरणाविंद । ब्रह्मादिक होऊनि मिलिंद । सदा सेविती इच्छूनि मकरंद । तव कृपाचि सर्वस्व ॥९९॥ तयांही दुर्लभ तुझी प्राप्ति । मी तों केवळ मंदमति । जरी पावसी तूं मजप्रति । हे अभिनव जगी होईल ॥४००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP