महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ३६ ते ४०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


सदासीदितिशद्बार्थभेदे वैगुण्यमापतेत् ॥
अभेदे पुनुरुक्ति: स्यान्मैवं लोके तथेक्षणात् ॥३६॥

शंका - असत बद्दल शंकित झाला ॥ तुम्ही व्याघात होतो बोलिला ॥
तरी सदासीत या बोला ॥ काय म्हणावें ॥१७३॥
सत आसीत या दोन शब्दीं ॥ अर्थ भेदाची लब्धी का नलब्धी ॥
लब्धी तरीं अद्वैत असिद्धी ॥ ना लब्धी तरी पुनरोक्ती ॥१७४॥
स० - अरे लोकीं याच रीती ॥ प्रयोगातें करिती ॥
तयाशी पुनरोक्ती ॥ न बोलावें ॥१७५॥

कर्तव्यं कुरुते वाक्यं ब्रूते धारयस्य धारणम् ॥
इत्यादिवासनाविष्टं प्रत्यासीत्सदितीरणम् ॥३७॥

कर्तव्य करितो ॥ वाक्यचि बोलतो ॥
धारणें धरितो ॥ येणें रीती ॥१७६॥
सत् आसीत या बोला ॥ पुनरोक्ती दोष नाहीं आला ॥
वासनाविष्ट लोकव्यवहाराला ॥ दर्शविलें ॥१७७॥
शं० - अस्तु अद्वैत वस्तुचे ठाईं ॥ कालाचा अभाव असे पाहीं ॥
तेथ अग्रे पद नाहीं ॥ यथायोग्य ॥१७८॥

कालाभावे पुरेत्युक्ति: कालवासनया यतम् ॥
शिष्यं प्रत्येव तेनात्र द्वितीयं न हि शंकते ॥३८॥

स० - “सदेव सौम्येदमग्र आसीत्” इति ॥ बोलिली प्रमाण श्रुति ॥
तेथ कालभाव निश्चिती ॥ नाहीं केला ॥१७९॥
कालवासनाविष्ट जगतीं ॥ द्वैतबोधपर लोक बहु असती ॥
तयांसी होवाया प्रचिती ॥ अग्रे ऐशी बोलली ॥१८०॥

चोद्यं वा परिहारो वा क्रियतां द्वैतभाषया ॥
अद्वैतभाषया चोद्यं नास्ति नापि तदुत्तरम् ॥३९॥

शंका आणि समाधानी ॥ ही द्वैत भाषेंत आहे मीळणी ॥
अद्वैतीं नाहीं दोनी ॥ शंका समाधान ॥१८१॥
अद्वैत वस्तूचे ठाईं ॥ वादची मुळीं नाहीं ॥
सत्यची असे तें पाही ॥ सदा सर्वदा ॥१८२॥
एवं ऐसें झालें सिद्ध ॥ सद्वस्तु अभेद निर्विवाद ॥
तेथें कोणाचाही नाहीं संबंध ॥ नामरूपादिकांचा ॥१८३॥

तदास्तिमितगंभीरं न तेजो न तमस्ततम् ॥
अनाख्यमनभिव्यक्तं सत्किंचिदवशिष्यते ॥४०॥

वस्तुचें करावया वर्णन ॥ वेद ही मुकावला जाण ॥
तेथें कोणाचें आतां प्रमाण ॥ पुढें करावें ॥१८४॥
परि द्वैत निषेधा साठीं ॥ उगीच स्मृती हुटहुटी ॥
अज्ञ जनाची कणव मोठी ॥ आली म्हणोनी ॥१८५॥
सकळही असे चंचळ ॥ म्हणोनी वस्तुशी म्हणे निश्चळ ॥
परि तें निश्चळ ना चंचळ ॥ नामरूपातीत ॥१८६॥
जे वाचामनाशीं न हो विषय ॥ ते कैसेनी होय प्रतिपादनीय ॥
ऐसें गंभीर जें निरामय ॥ स्वयंप्रभ ॥१८७॥
सूर्यादिकांचीं तेजें ॥ खद्योत परिही न साजे ॥
तम विलक्षण विराजे ॥ अनावरण ॥१८८॥
तयाची व्याख्या कोण करी ॥ जे अनभिव्यक्त निरंतरी ॥
परि स्मृती बोलली चतुरी ॥ “किंचिदवशिष्यते” ॥१८९॥
बालें धरिला द्वैत छंदु ॥ तो मोडाया किंचित् विरोधु ॥
धरिला बागुलाचा संबंधु ॥ आला म्हणोनी ॥१९०॥
येर्‍हवीं स्मृती कां हें न जाणें ॥ परि करावें लागलें बोलणें ॥
अज्ञजन बोधावया कारणें ॥ किंचित् म्हणोनी ॥१९१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP