आत्मसुख - अभंग २५१ ते २६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२५१
माता पिता बंधु कुळगुरु दैवत । सखा सर्व गोत केशिराजा ॥१॥
जन्मोनि पोसणा तुझा मी अंकिला । आणिकांचा पांगिला न करीं देवा ॥२॥
विष्णुदास नामा विनवितो केशवा । झणीं घालिसी देवा संसारासी ॥३॥

२५२
दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥
आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥
नामा म्हणे नाम विर्वाणीचें बीज । मजसाठीं गुज दावियेलें ॥३॥

२५३
काय आम्हापाशीं आहे धन वित्त । दान तें उचित देऊं काय ॥१॥
देतां घेतां आम्हां पुरे पुरे जालें । संगतीं त्यागिलें भिवोनियां ॥२॥
काय वाणूं गुण भिकरपणाची । होसी पंढरीची नामनौका ॥३॥
नामा म्हणे पुढें दाखवी मारग । आम्ही तुज मागें येऊं सुखें ॥४॥

२५४
देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥
ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥
ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥
ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥

२५५
माझे गुणदोष जरि विचारिसी । सर्व नारायण अपराधी ॥१॥
सेवाहीन  दीन पातकाची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥२॥
अंगुष्ठ  धरूनि मस्तकापर्यंत । अखंड दुष्कृत आचरलोंज ॥३॥
स्वप्नामाजी तुझी घडली नाहीं भक्ति । पुससी विरक्ति कोठोनियां ॥४॥
तूंचि माझा गुरु तुंचि माझा स्वामी । सकळ अंतर्यामीं वससी तूं ॥५॥
नामा म्हणे माझें चुकवी  जन्ममरण । न करीं मी सीण पांडुरंगा ॥६॥

२५६
काय करुं आतां देवा विश्वंभरा । मजलागीं थारा नाहीं कोठें ॥१॥
उबगति सोयरीं धायरीं समस्त । कय करुं अंत पाह्सी माझा ॥२॥
तूंचि मातापिता गुरुबंधू होसी । जाऊं मी कोणासी शरण आतां ॥३॥
पायीं थारा मागे नाम्याची विनंति । चित्त द्या श्रीपति आतां वेगे ॥४॥

२५७
आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । तुझे पाय दोन्ही दावी मज ॥१॥
संसार कल्मष समूळ छेदिसी । दावीं अहर्निशीं पाय मज ॥२॥
हरी ध्यानीं मनीं भक्तां तूं परेशा । अनाथ कोंवसा गोंवळियां ॥३॥
नामा म्हणे नाम ऐकों सर्वोत्तमा । संसारींच्या श्रमा वारीं देवा ॥४॥

२५८
नव्हे माझें कांहीं नेणे तुजविण । दुजे  वोझें घेऊनि जड बहु ॥१॥
रंग नानासूत्रिं अनेक पुतळे । तैसा तुझा खेळ नकळे कोण्हा ॥२॥
नामा  म्हणे तुझी नकळे करणी । जन्मोजन्मीं चरणीं ठेवीं मज ॥३॥

२५९
हस्तीच्या चरणावरी बैसे माशी । नमन तयासी करावया ॥१॥
तैसें कायसें मी केवढें वापुडें । लागे कोणीकडे देवराया ॥२॥
नामा म्हणे तैसें मी एक दुबळें । चरणावेगळें करूं नको ॥३॥

२६०
कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥
ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥
जेथें जेथें मन जाईल हें माझें  । तेथें तेथें  तुझें रूप भासे ॥३॥
नामा म्हणे मी सर्वांपरी अज्ञान । विनवी आस करून पांडुरंगा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP