आत्मसुख - अभंग २२१ ते २३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२२१
कपटनाटका कल्लोळ करुणा । मजलागीं दीन होसी देवा ॥१॥
रात्रंदिवस मज ठेवुनि जवळ । घालसी कवळ मुखामाजीं ॥२॥
पेंद्या सुदाम्याचे करिसी कैवार । मजसी अंतर केलें आतां ॥३॥
नामा म्हणे आम्हीं करितों बोभाट । देऊं नको भेट पांडुरंगा ॥४॥

२२२
त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥
आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥
भलारे भला मज जालासि शहाणा । भेष पळविलें शास्त्रपुराणा ॥३॥
नामा म्हणे केशवा मज मारून दवडी । पुढती न धरावि सोय माझी पुढती फुडी ॥४॥

२२३
कटीं कर उभा ऐसा । पहा कैसा घरघेणा ॥१॥
माझा हिशेव करी हिशेव करी । हिशेब करी केशवा ॥२॥
चौर्‍याशीं लक्ष जन्म केली तुझी सेवा । माझें ठेवणें देईअ गा दिवा ॥३॥
नामा म्हणे मज खवळिसी वायां । पिसाळलों तरी झोंबेन तुझ्या पायां  ॥४॥

२२४
साचपणें ब्रीद सोडनिन तुझ्या । आतां केशिराजा पण हाचि ॥१॥
लबाड तूं देवा लबाड तूं देवा । लबाड तूं देवा ठावा आम्हां  ॥२॥
काय सूर्यपणें सांगशिल गोष्टी । थोरपणें मोठीं पुरे आताम ॥३॥
नामा म्हणे काय खवळिसि आम्हां । लाज नाहीं तुम्हां कवणेविसीं ॥४॥

२२५
काय थोरपणा मिरविसी व्यर्था । खोटेपणा स्वार्थ कळों ॥१॥
हिता अनहिता केले आपस्वार्थ । वचन यथार्थ बोल आतां ॥२॥
होसी कालिमाजीं कलिसारिखाची । भोळया भाविकाच्या भक्तिकाजा ॥३॥
नामा म्हणे माळ घातिली स्वहस्तें । करितोसि दंडवत निमित्यासी ॥४॥

२२६
काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥
संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥
काय काय तरी सांगों तुज गुण । भिल्लिणीची आण सत्य मनीं ॥३॥
सत्य मानी वाळी वशिष्ठासहित । नामा म्हणे मात ही पुरातन ॥४॥

२२७
काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें ॥१॥
पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळाभीतरीम खेळ मांडी ॥२॥
हलाहल शांत करी तत्क्षण । अमृतजीवन नाम तुझें ॥३॥
तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥४॥


२२८
निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना । तुन नारायणा शोधीं नामीं ॥१॥
काय तुझी भीड धरावी म्यां आतां । कृपाळु अनंता म्हणें ना मी ॥२॥
पुंढलिकासाठीं उभा राहिलासी । ठकडा तूं होसी म्हणे ना मी ॥३॥
नामा म्हणे नको मज चाळवण । लवकरी चरण दावींना का ॥४॥

२२९
कल्पतरुतळीं बैसलिया । कल्पिलें फळ न पविजे ॥१॥
कामधेनु जरी दुभती । तरी उपावासीं कां मरावें ॥२॥
उगे असा उगे असा । होणार तें होय जाणार तें जाय ॥३॥
नामा म्हणे केशवा काय तुझी भीड । संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड ॥४॥

२३०
मुळींच मी जाणें तुझा ठेंगेपणा । काय नारायणा बोलसील ॥१॥
पुरे पुरे आतां तुमचे आचार । मजशीं वेव्हा घालूं नको ॥२॥
लालुचाईसाठीं मागे भाजीपाना । लाज नारायणा तुज नाहींज ॥३॥
नामा म्हणे काय सांगों तुझी कीर्ती । वाउगी फजिती करूं तुज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP