आत्मसुख - अभंग ३१ ते ४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३१
रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी । ब्रीदें चक्रपाणि मिरविती ॥१॥
मेघदेहाकृति घनःश्याम मूर्ति । नटतसे भक्तीं भक्तजना ॥२॥
भाक देऊनियां गौळियाचे  घरीं । गाई निरंतरीं चारितसे ॥३॥
इंद्र वेडावला मुनि थोर थोर । न कळेचि पार नामा म्हणे ॥४॥

३२
पांचमुखीं रुद्र स्वयें करी स्तुति । चहू मुखी कीर्ति वर्णी ब्रह्मा ॥१॥
देवी देव सर्वा विस्मयो पावती । विठोबाची ख्याति कोण वानी ॥२॥
परीक्षितीसाठीं प्राण त्यजी सर्व । रावणाचा गर्व स्वयें हाणी ॥३॥
नामा म्हणे तुज सकळ समान । माझे दोष गुण मानी काय ॥४॥

३३
गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥
अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥
अंबऋषीसाठीं जन्म सोशियले । महत्त्वाचे केले हूड स्वयें ॥३॥
नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ । प्रसादें केवळ लाधलों मी ॥४॥

३४
मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडीं देवा ॥१॥
प्राण जावो परी नको करूं त्याग । करी अंगसंग अंगिकार ॥२॥
अंगीकारी आतां अजामेळ अंतीं । समान श्रीपती सम करी ॥३॥
नामा म्हणे ऐसें वर्णावें म्यां किती । नामें केली ख्याति चराचरीं ॥४॥

३५
वानारांच्या संगें स्वयें क्षेम देसी । मज ह्रषिकेशी न बोलावें ॥१॥
रिसांपाशीं सदा स्वाभावें तुम्ही खेळा । माझिया कपाळा नातुडसी ॥२॥
पक्षि जटायूचें लेंकरूऊं तूं होसी । माझ्या कां मनासि नातुडसी ॥३॥
लावोनि चरण तारियेली शिळा । कोळियाचा केला अंगिकार ॥४॥
नामा म्हणे तुम्हां सांगावें म्यां किती । राग माना चितीं काय  वाणुं ॥५॥

३६
पतितपावना धांवसी निर्वाणीं । ब्रीद चक्रपाणि सत्य केलें ॥१॥
काय अपराध कोणाचे पाहिले । नाहीं तुवां त्यागिलें नष्टखळां ॥२॥
अजामेळासाठीं आहार वर्जिले । बीज तें भाजिलें भवमूळ ॥३॥
नामा म्हणे नागवेंचि बरें । आतां उणें पुरें पाहूं नका ॥४॥

३७
विश्वंभर नाम तुझें कमळापती । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥
गौळियां घरींचें दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसी ना ॥२॥
आतां दीनानाथा तुझें ब्रीद साचें । तरी भूषण आमुचें जतन करीं ॥३॥
येर ठेवाठेवी कायसी आतां । तुम्हां विनवितो नामा केशिराजा ॥४॥

३८
शरीराचा भाव तुज नाहीं देवा । तेथें मी केशवा काय बोलूं ॥१॥
अंगदाचे अंगीं बळ देसी फार । बहु उपकार कळों आलें ॥२॥
तुम्हां नित्य न्याय नोव्हे साचपण । बळि तूतें दान देउनि ठके ॥३॥
नामा म्हणे सदा काय म्यां गार्‍हाणें । किती नारायणें देऊं आतां ॥४॥

३९
जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥
आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥
लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥
नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥

४०
दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥
आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥
जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गीं जाण ॥३॥
जाणती प्रेमळ कीर्तानासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा  ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP