आत्मसुख - अभंग ५१ ते ६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५१
नापिकाचे परि वरी  बरी बोडी । परि अंतरींची वाढी उणी नव्हे ॥१॥
तैसें माझें मन न राहे समूळीं । प्रपंच कवळी दाही दिशा ॥२॥
भक्ति प्रेमभाव वरी वरी दावी । अंतरीं आटवी घराचार ॥३॥
मी लटिका जाण असे परोपरी । तारी भवसागरीं म्हणे नामा ॥४॥

५२
वासरूं भोवे खुंटियाभोवतें । आपआपणियातें गोवियेलें ॥१॥
तैसी परी मज जाली गा देवा । गुंफलोंसे भावा लटिकिया ॥२॥
नामा म्हणे केशवा तोडी कां बंधनें । मी एक पोसणें भक्त तुझें ॥३॥

५३
लोभियाचे घरीं लटिकेचि उपवास । न मरे ह्रषिकेश म्हणती जगीं ॥१॥
तूं तंव भावाचा अंकुर जी देवा । लटिका  मी पहावव दास तुझा ॥२॥
लटिकी पक्षियातें बोभाये कुंटणी । ते त्यां माझी म्हणोनि अंगिकारिली ॥३॥
लटिका अजामेळ पुत्राचेनि मोहें । सोडविला पाहे कैसा तुवां ॥४॥
त्या अवघ्याहुनि मी लटिका सहस्त्र गुणें । तारूनि कीर्ति करणें म्हणे नामा ॥५॥

५४
तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥
केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥
शोकमोहाचिया झळंबलों जाळीं । क्रोधाचे काजळीं पोळतसें ॥३॥
चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । प्राण होय व्याकुळा धांव देवा ॥४॥
धांवधांव  करुनाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो  माझा ॥५॥

५५
धांवुनि जाईन श्रीमुख पाहीन । इडापिडा घेईन विठोबाची ॥१॥
तया सुखा दृष्टि लागेल वो झणीं । मग मी साजणी काय करूं ॥२॥
म्हणोनि माझें चित्त व्यापिलें उद्वेगें । सिणलें मी उबगें जन्मोजन्मीं ॥३॥
धरोनियां घालीं जीवाचे अंतरीं । आंतोनि बाहेरी जाऊं नेदीं ॥४॥
वासना पापिणी करील पायरव । मग हा अनुभव कोठें पाहूं ॥५॥
वृत्तिसहित करीन मनाचें सांडणें । न विसंबें प्राणें म्हणे नामा ॥६॥

५६
जीव तूं प्राण तूं । आत्मा तूं गा विठ्ठला ॥१॥
जनक तूं जननी तूं । सोयरा तूं गग विठ्ठला ॥२॥
माझा गुरु तूं गुरुमंत्र तूं । सर्वस्व तूं माझें म्हणे नामा ॥३॥

५७
संसारसंकटें रिघालों  पाठिसी । आतां झणीं देसी त्यांचे हातीं ॥१॥
ब्रीदें बडिवार ऐकोनियां फार । रिघों आम्ही द्वार विठोबाचें ॥२॥
आणिकहि वार्ता सांगों काय आतां । पंढरिच्या नाथा परिसावें ॥३॥
अमृत पाजणें प्रीतीनें भक्तासी । सत्य ह्रषिकेशी नामा म्हणे ॥४॥

५८
कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां ॥१॥
परम पावना पवित्रा निर्मळा । भक्ताचा सांभाळ करीं देवा ॥२॥
देवा तूं दयाळा जिवलगा मूर्ति । पुराणें गर्जाती वेदशास्त्रें ॥३॥
नामा म्हणे आतां नको भागाभाग । सखा पांडुरंग स्वामी माझा ॥४॥

५९
देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण । पाहें हें वचन शोधूनियां ॥१॥
नसतां पतित कोण पुसे तूतें । सांदीस पडतें नाम तुझेंज ॥२॥
पतित अमंगळ जालों तुज साह्य । खरें खोटें पाहे विचारोनी ॥३॥
रोग व्याधि पीडा  जनांसी  नसती । तरि कोण पुसती विद्यालागीं  ॥४॥
कल्पनेची बाधा झडपे संसारीं । म्हणुनि पंचाक्षरी श्रेष्ठ जगीं ॥५॥
नामा म्हणे विठो दैवें आलों घरा । नको लावूं दारा आम्हालागीं ॥६॥

६०
जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे ॥१॥
अच्युता केशवा ये गा दीनानाथा । सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥
चिद्‌घना चिद्‌रूपा विरंचीच्या बापा । करावी जी कृपा सर्वांभूतीं ॥३॥
तुझें म्हणविलें उपेक्षिसी जरी । नामा म्हणे हरी ब्रीद काय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP