आत्मसुख - अभंग ११ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११
आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा । जालेंसे व्याकुळ चित्त माझें ॥१॥
पावें गा विठोबा पावेंज गा विठोबा । पावें गा विठोबा मायबापा ॥२॥
तूं भक्तकैवारी कृपाळुवा हरि । येईं गा झडकरी देवराया ॥३॥
नामा म्हणे आन नाहीं तुजवांचोनि । जनक जननी केशिराजा ॥४॥

१२
माझे मनींज ऐसें होतें आतां देवा । भाव समर्पावा तुझे चरणीं ॥१॥
तंव मायामोहें मजसी केला हेवा । लोटियेलें भवजळामाजीं ॥२॥
आशानदी पुरीं वाहविलीं वेगीं । काढी मज हरी कृपाळुवा ॥३॥
सरितेमाजीं धारिलों या मदनमगरें । पुढारें माघारें जाऊं नेदी ॥४॥
थडिये उभाउभीं धांवगा श्रीहरी । मजा हानी थोरी सर्वस्वें गेलों ॥५॥
भक्ति नवरत्नांची बुडाली वाखोरी । काढी वेगीं हरी मायबापा ॥६॥
धीर आणि विचार ह्या दोन्ही सांगडी । श्रद्धा दोरी पुढील तुटोनि गेली ॥७॥
भावबळें सांपडलों दाटलों उभडीं । वेगीं घाली उडी कृपाळुवा ॥८॥
तुझे भक्तिविण कोरडा होय गळा । नेतो रसातळा क्रोध मीन ॥९॥
नामा म्हणे तुझा मी सकळ जीवा । तरी हा काढावा शरणांगत ॥१०॥

१३
नावडे प्रपंच तापत्रय माया । येईं धांवोनियां केशिराजा ॥१॥
भवभयें फार भ्यालों जन्मांतरा । चौर्‍यांशींचा फेरा बुडवितो ॥२॥
सत्कथा श्रवण नाम संकीर्तन । न घडे भजन मज देवा ॥३॥
नवविधा भक्ति कवणें केली कैसी । नामा म्हणे ऐसी दावी माते ॥४॥

१४
भक्तीची अपेक्षा धरोनि अंतरीं । राहे भीमातीरी पंढरीये ॥१॥
अठ्ठावीस युगें गेलींज विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देखा ॥२॥
कटीं कर उभा शिणलें शरीर । धरोनि निर्धार भक्तिभावें ॥३॥
नामा म्हणे आतां नको खटपट । आमुचे बोभाट नको पाहूं ॥४॥

१५
भावेंविण भक्ति कशानें हो करी । माया मोह वैरी देहामाजीं ॥१॥
तुझें नाम दिव्य रस जिव्हे स्वाद । नाश काम क्रोध करिती माझा ॥२॥
जे जे वस्तुसि नयनीं मी पाहे । त्या त्या धांवताहे विषयीं मन ॥३॥
नामा म्हणे  थोर उबगलों संसारीं । पुढा काळ वैरी ग्रासूं पाहे ॥४॥

१६
आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥
भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥
घेसी सोडुनियां पोहे मुठीभरा । हिडसावल्या करा नामा म्हणे ॥३॥

१७
दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना ॥१॥
तूतें वेद नेणें तूतें शास्त्र नेणें । तुझें नाम नेणें गातूं असे ॥२॥
त्रिविद्या तूं पारु दोहींचा वृत्तांतु । सत्त्व राहे तीतूं जयालागीं ॥३॥
निर्गुण निराकार केशव उदार । नामा म्हणे पार उतरतील ॥४॥

१८
इलुसाचि प्रपंच परि हा लटिकाअ । तेणें तुज व्यापका झांकियलें ॥१॥
ऐसियाचा मज घालोनियां खेवा । स्वामिद्रोहि देवा करिसी मज ॥२॥
मेरुचिया गळा बांधोनि मशक । पाहसि कौतुक अनाथनाथा ॥३॥
नामा म्हणे देवा कळली तुझी माव । माझा मी उपाव करीन आतां ॥४॥

१९
श्रीहरि श्रीहरि ऐसें वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी श्रवणें ऐकेन ॥१॥
श्रावणीं दाटसी तरी मी नयनीं पाहिन । ध्यानीं मी ध्याईन जेथें तेथें ॥२॥
जेथें जाये तेथें लागलासी आम्हां । न संडी म्हणे नामा वर्म तुझें ॥३॥

२०
आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥
अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥
अरे हा भावाचाअ लंपट । सांडुनि आलासे बैकुंठ ॥३॥
संतसंगतीं साधावा । धरूनि ह्रदयीं बांधावा ॥४॥
नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP