आत्मसुख - अभंग १४१ ते १५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१४१
कां हो मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें चित्त तुझें ॥१॥
करुणाकल्लोळणी अमृत संजीवनी । चिंतल्या निर्वाणीं पावें वेगीं ॥२॥
अपराधी अनाथ जरी जालें अमंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥३॥
नामा म्हणे विठ्ठले आलों मी तुजपाशीं । केधवां भेटसी अनाथनाथा ॥४॥

१४२
कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळीं । तेणें ते शोभली मूर्ति बरी ॥१॥
बरवा बरवा विठ्ठल  गे बाई । वर्णावया साही शिनताती ॥२॥
श्रीवत्सलांच्छन वैजयंती गळां । नेसला पाटोळा तेजःपुंज ॥३॥
पाऊलें समान विटेवरी नीट । नामा म्हणे भेट घ्यावी त्याची ॥४॥

१४३
नको गा मोकलूं दीना पंढरिनाथा । तुजविण आतां कोण पावे ॥१॥
अपराधाच्या पोटीं पाहूं नको कांहीं । ये गे विठाबाई झडकरी ॥२॥
माझ्या दोषासाठीं पाठमोरा होसी । पावन ब्रीदासी लागे बोल ॥३॥
नामा म्हणे जननी तूंचि चराचर । तारिले अपार जड जीव ॥४॥

१४४
वेदपरायण मनीं तो  ब्राम्हण । चित्त समाधान संतुष्ट सदा ॥१॥
येरा माझें नमन सर्वसाधारण । ग्रंथाचें राखण म्हणोनियां ॥२॥
शास्त्रपंडित तोचि मी बहुमानी । जो आपणातेम जाणोनि तन्मय जाला ॥३॥
पुराणिक ऐसा मानितो कृतार्थ । विषयीं विरक्त विधीपाळी ॥४॥
मानीं तो हरिदास ज्या नामीं विश्वास । मी त्याचा दास देहभावें ॥५॥
नामा म्हणे ऐसें कईं भेटविसी विठ्ठला । त्यालागीं फुटला प्राण माझा ॥६॥

१४५
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥
जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥
संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदाअ ॥३॥
सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥
नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥

१४६
संसाराचे सोये चुकले बापुडे । केशव मागें पुढें सांभाळित ॥१॥
आळीकर नामें खेळे महाद्वारीं । आंतून बाहेरी नवजे कांहीं ॥२॥
संतांसी देखोनी मिठी घाली चरणीं । कुरवंडी करूनी देह टाकी ॥३॥
ऐसें निज बोधें राहिले निवांत । नामा एकुलते केशवचरणीं ॥४॥

१४७
तळियाचे पाळीं वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाइतो रे ।
ताहाना फुटे परी उद्क नेघे । मेघाची वाट पाही रे ॥१॥
तैसा येईं बा कान्हया येईं बा कान्हया । जीवींच्या जीवना केशीराजा रे ॥धृ०॥
टाळघोळ कल्लोळ नानापरीचीं वाद्यें । वाजती वोजा रे ।
रानींच्या मयुरा नृत्या पैं नये । तुजविण मेघराजा रे ॥२॥
जळाविण जळचर पक्षीविण पिलियासी  । तैसे जालें नामयासी रे ।
शंखचक्र गदा पद्म पितांबरधारी । अझुनि कां न पावशी रे ॥३॥

१४८
तुझा विष्णुदास म्हणतात जगीं । नाहीं माझें अंगीं प्रेमभाव ॥१॥
तेणें थोर लाज वाटे पंढरिराया । ये माझ्य ह्रदया एक वेळां ॥२॥
द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायीं । अनुभव नाहीं स्वरूपाचा ॥३॥
देखावेखीं बैसें संतांचे संगतीं । नाहीं माझे चित्तीं ध्यान तुझें ॥४॥
साकारलें रूप तैं दिसे चर्मचक्षु । परी नाहीं वोळखी केवळ मनें ॥५॥
नामा म्हणे माझा उजळ करींज माथा । भेटी देउनी संतां निरवीं मज ॥६॥

१४९
गरुडावरी हरि बैसोनियां यावें । आम्हांसि रक्षावें दीनबंधू ॥१॥
अच्युता केशवा मुकुंदा मुरारी । येई लवकरी नारायणा ॥२॥
ऐकोनियां धांवा धांवला अनंत । उभा गरुडासहित मागें पुढें ॥३॥
वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें लिंबलोण ॥४॥

१५०
नेत्र माझे रोडले आठवे माहेर । कैं भेटेन निरंतर बाईयांनो ॥१॥
चतुर्भुज विठ्ठलु कैं देखेने डोळां । भक्तांचा जिव्हाळा जीव माझा ॥२॥
येणें शोकें रे वाळलों शरीरीं । आठवतों हरि मी काय सांगूं ॥३॥
चारी भुजा उचलोनि क्षेम देईल । कैं मज नेईल पंढरपुरा ॥४॥
काम चित्तीं न लगे आतां कांहीं मज । कैं भेटेल राजा पंढरीचा ॥५॥
त्यासि आठवितां ह्रदय वो फुटे । तो कैं मज भेटे बाप माझा ॥६॥
येणें देह न पवती मग काय येउनि करिती । सांगा काकुळती रखुमाईसी ॥७॥
वामांगीं रुक्मिणी कैं देखेन दोन्ही नयनीं । फेडीन पारणीं डोळियांची ॥८॥
जंव जंव आठवती तंव तंव उभड येती । कोणी न सांगती विठ्ठलासी ॥९॥
ऐसें श्रवणीचें सुख कैचें नवो देखे । येथें येऊनि बहुतेकें काय करिती ॥१०॥
गरुडटके अवघे आकाशीं ओळले । येवोनि सांगितलें विष्णुलोकीं ॥११॥
मग जावोनियां तया ठायां पाहें पंढरिराय । लागेन मी पायां तयाचिये ॥१२॥
याचि लागोनियां आलों लवडसवडी । सांडियेली थड मग रोखिलासी ॥१३॥
गरुडावरी आरूढ बाप माझा जाला । मज न्यावया आला बाईयांनों ॥१४॥
येणें हर्षें संतोष कोठेंच न माये । भेटला विठ्ठल माय रुक्मिणीसहित ॥१५॥
नामा जातसे माहेरा एकला पंढरपुरा । हरी दातारा संसारा वेगळा करीं ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP