आत्मसुख - अभंग १ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.



दिवस गेले वायांविण । देवा तुज न रिघतां शरण ।
बाळत्व गेलें अज्ञानपण । तैं आठवण नव्हेचि ॥१॥
आला तारुण्याचा अवसरु । सवेंचि विषयाचा पडिभरु ।
कामक्रोध मदमछरु । अति व्यापारु तृष्णेचाअ ॥२॥
सवेंचि वृद्धपण पातलें । सकळ इंद्रियें सोडिलें ।
देहन करीच म्हणितलें । आंतर पडलें भक्तीसी ॥३॥
कांही हित नव्हेची माझें । दास्य न घडेचि तुझें ।
आयुष्य वेचिलें वीण काजे । धरणी वोझें पैं जालोम ॥४॥
पुनरपि जन्मा येईन मागुता । कोण जाणे कैसी अवच्छा ।
तुज मी ध्याईन अनंता । ऐसा लहाना कैंज होईन ॥५॥
तुझ्या नामाचा वोरस । तेणें चुके गर्भवास ।
नामा म्हणे विष्णुदास । देई सौरस आपुलें नामीं ॥६॥


मज चालतां आयुष्यपंथें । तारुण्यवन पातलें तेथें ।
मदमछरादि श्वापदें बहुतें । आलीं कळकळीत मजपाशीं ॥१॥
तीं धांवती पाठोपाठीं । पाहे तंव विषयाचे घाटीं ।
काम क्रोध व्याघ्रांची दाटी । देखोनि पोटीम रिघालें भय ॥२॥
मगा स्वधर्ममार्गीं रिघालों । तंव अहंकारतस्करें आकळिलों ।
राहें राहें म्हणोनि उभा केलों । तेणें शिंतरलों स्वामिया ॥३॥
जंव क्षण एक उघडिले डोळे । पाहे तंव कंठ दाटला व्याळें ।
मायमोहसर्पीं डंखिलें । त्यांचिये गरळें झळंबलों ॥४॥
जंव न पवे शेवटील  लहरी । तंव धांव धांव उपाव करी ।
विष्णुदास नामा धांवा करी  । माझा कैवारी केशिराजु ॥५॥


तुज नेणों ग महेशा । म्हणुनि आलों गर्भवासा ।
अंध कूपीं पडिला जैसा । रात्रिदिवसा तो नेणों ॥१॥
तुझिया नामाची सांगडी । देई ते न खंडी ।
पावेन मी पैलथडी । त्या सांगडी आधारें ॥२॥
कामक्रोधादि जलचरीं । कासाविस जालों भारी ।
व्याकुळ होय चिंतालहरी । दुःखें भारी दाटलों ॥३॥
कल्पना वेली गुंडाळली पायीं । तेणें बुडें विषडोहीं ।
भंवतें पाहे तंव कोण्हे नाहीं । मग तुज ध्यायीं विश्वेशा ॥४॥
मज बांधुनी कर्मदोरी । घातलें संसारा दुर्धरीं ।
मायानदीचां महापुरीम । वाहावलों गा दातारा ॥५॥
ऐसा खेदखिन जालों बहुवस । न देखें विश्रांतीची वास ।
विनवी नामा विष्णुदास । गर्भवास पुरे आतां ॥६॥


अंतकाळीं  मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं ।
म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥
नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी ।
ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥
जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड ।
जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥
बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा ।
जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥
कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें ।
तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥
देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनीं ।
मी जळतसें स्मशानीं । अग्निसवें एकला ॥६॥
मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानीं परतले ।
शेवटीं टाकोनियां गेले । मज परता येमजाल ॥७॥
ऐसा जाणोनि निर्धार । मन मज आला गहिंवर ।
तंव दाहीं दिशा अंधःकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥
ऐसें जाणोनियां पाही । मनुष्य जन्म मागुता नाहीं ।
नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥९॥


परियेसी वासने संकल्प स्वरूपे । विश्वव त्वां आटोपें वश केलें ॥१॥
ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें । विषयाकारणें लोलिंगता ॥२॥
परि माझ्या मना सांडी वो समर्थें । देईं मज दीनातें कृपादान ॥३॥
वेदशास्त्रवक्ते वित्पन्न थोरले । तृणापरीस केले ह्ळुवट ॥४॥
कृपणाचे द्वारीं होऊनि याचक । विसरले सुख आत्महित ॥५॥
एके अभिमानें भ्रांत जालें चित्त । भजती इंद्रियातेम दीनरूपें ॥६॥
शब्द स्पर्श रूप रसगंधे फांसा । गुंतले दुराशा तळमळित ॥७॥
येकातें लाविला पुत्र कलत्र धंदा । नेणती ते कदा सुखगोष्टी ॥८॥
जन्म मरणांचे जुपियले पांतीं । आकल्प भोगिती नाना योनी ॥९॥
ऐसे तुझे संगें बहु जालो हिंपुटी । पाडिली तुटी संतसंगा ॥१०॥
नामा म्हणे पुढती गांजिसील मज । येईल केशिराज सोडवणें ॥११॥


वीतभर पोट लागलेंसे पाठी । साधुसंगें गोष्टी सांगूं न देई ॥१॥
पोट माझी माता पोट माझा पिता । पोटानें ही चिंता लाविलीसे ॥२॥
पोट माझा बंधु पोट माझी बहीण । पोटानें हें दैन्य मांडिलेंसे ॥३॥
विष्णुदास नामा पोटाकडे  पाहे । अजून किती ठाये हिंडविसी ॥४॥


मन माझें चोरटें लागलें कुसंगीं । बांधिलें षड्‌वर्गीं धरोनि त्यातें ।
केउता गेलासि माझ्या कृपावंता । ये गा पंढरिनाथा मायबापा ॥१॥
वासनेची बेडी घालोनि माझे पायीं । विषयवज्रघायीं त्रासिताती ।
आशा तृष्णा माया आणिक कल्पना । करिताति कामना नानाविध ॥२॥
कामक्रोध दंभ लाविताती कळा । ये माझ्या गोपाळा सोडवणें ।
नामा म्हणे माझें घेउनियां चित्त । करि बंधन मुक्त संसाराचें ॥३॥


विषयीं आसक्त जालें माझें मन । न करी तुझें ध्यान पंढरीराया ॥१॥
नाथिले संकल्प करी नानाविध । तेणें थोर खेद पावतसे ॥२॥
आयुष्य सरे परी न सरे कल्पना । भोगावी यातना नानाविध ॥३॥
जन्म मरण कष्ट भोगितां संकटीं । होतसे हिंपुटीं येरझारीं ॥४॥
ऐसा मी अपराधी दुराचारी देवा । भेटसी केशवा कवणेपरी ॥५॥
मायामोहें सदा भ्रांत माझें चित्त । चुकलें निजहित नारायणा ॥६॥
तूं अनाथा कैवारी ब्रीदावळी हरी । सोडवी मुरारी म्हणे नामा ॥७॥


मज गांजिल्याचा धांवा । सावधान परिसावा ॥१॥
विठो सुजाणाच्या राया । धांव माझया करुणालया ॥२॥
माझें मन हें पामर । भ्रांत हिंडे दारोदार ॥३॥
मोहोपाशीं मज बांधिलें । भेणें वैराग्य साधिलें ॥४॥
नामा म्हणे काय करूं । तुजविन भूमिभारू ॥५॥

१०
ममत तुटेना मज केशिराजा । अंगीं भाव दुजा लागे पाठीं ॥१॥
शरीरीं तितीक्षा नाहीं क्षमा शांति । यालागीं श्रीपति वायां गेलों ॥२॥
नामा म्हणे देवा तारिसी पतिता । म्हणोनियां सत्ता केली आम्हीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP