आत्मसुख - अभंग १६१ ते १७०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६१
नेत्र तान्हेले पाजीं पाणी । पंढरिचे मायबहिणी ॥१॥
बाळ पालकीं करी सोर । माते आला निद्राभर ॥२॥
जागी न होसी गे माये । प्राण जातो करुं काये ॥३॥
नामा म्हणे चक्रपाणि । चरणीं घातली लोळणी ॥४॥

१६२
पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी ॥१॥
तैसें माझें मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥
तान्हें वत्स घरीं बांधलेंसे दावा । तया ह्रदयीं धांवा माउलीचा ॥३॥
नामा म्हणे केशवा तूं माझा सोईरा । झणें मज अव्हेरा अनाथनाथा ॥४॥

१६३
रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवीं । अनुदिनीं आठवीं चरण तुझे ॥१॥
ने रे पांडुरंगा आपुलिया गांवा । तूं माझा विसावा जिवलग ॥२॥
मी येक येकट रंकाहूनि रंक । त्रिभुवननायक कीर्ति तुझी ॥३॥
मी तुझें पोसणें दास पैं दुर्बळ । तूं दिनदयाळ स्वामी माझा ॥४॥
तुझें मी अनाथ चरणीं ठेवीं माथा । सांभाळीं सर्वथा ब्रीद तुझें ॥५॥
नामा म्हणे विठो जालों कासावीस । पुरवीं माझी आस मायबापा ॥६॥

१६३
बाळका स्तनपान करविते माता । टाळितां परता चरणीं लोळे ॥१॥
हातीं घेऊनि शिपटीं माय लागे पाठीं । चरणीं घाली मिठी परते नोहें ॥२॥
तैसें माझें मन तुजलागीं देवा । न विसंबे केशवा क्षनभरी ॥३॥
चातक तेथें पाणी तृषाक्रान्त वनीं । वाट पाहे गगनीं जीवनाची ॥४॥
निराळेंचि पीयुष  वर्षे तयालागीं । आळवितां वेगीं मेघराया ॥५॥
वाललें हें तृन नसंडी हो क्षीर । तैसें भक्तीं स्थिर मन राहे ॥६॥
नामा म्हणे या जन्माचिया साठीं । चरणीं घाली मिठी परता नोहे ॥७॥

१६४
युक्तिप्रयुक्तीचें प्रमाण मी नेणें । केशवचरणें ध्यातों मनीं ॥१॥
आणिक साधन काय म्यां करावें । ब्रह्मादिक देव मौन ठेले ॥२॥
आतां मी कायसा करावा आधार । चरण विर्धार देवपूजा ॥३॥
नामा म्हणे तुझा  अंत नाहीं पार । काय म्यां पामर जाणों आतां ॥४॥

१६५
जाणीव शाहणीव बाहियेलें वोझें । तेणें चरण तुझे अंतरले ॥१॥
मज नेणतेंचि करी मज हरी । या लौकिकाबाहेरी काढी मज ॥२॥
तुझिया नामाचें मज लागो पिसें । देहीं देहन दिसे  ऐसें करी ॥३॥
नामा म्हणे तुज  जाणसी तरी येकचि जाण । रहित कारण कल्पनेचें ॥४॥

१६६
तुझें प्रेम माझ्या दाखवीं मनातें । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥१॥
कासया शिणविसी थोडिया कारणें । काय तुझें उणें होईल देवा ॥२॥
चातकाची तहान पुरवी जळधर । काय त्याची थोरी जाऊ पाहे ॥३॥
चंद्र चकोराचा पुरवी सोहोळा । काय त्याच्या कळा न्य़ून होती ॥४॥
कूर्मीं अवलोकीं आपुलिया बाळा । काय तिच्या डोळां दृष्टि नासे ॥५॥
नामा म्हणे देवा तुझाचि  भरंवसा । अनाथा कुंवसा होसी तूंचि ॥६॥

१६७
देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
वदनीं तुझें मंगळनाम । अखंड सदोदित प्रेम ॥३॥
जैसा तैसा असेल भाग । तैसा तैसा घडेल योग ॥४॥
नामा म्हणे केशवराजा । केला पण चालवी माझा ॥५॥

१६८
माथां मोरपिसा वेठी । श्रवणीं कुंडलें पदक कंठीं ।
हातीं घेऊनी वेताटी । गोधना पाठीं लागले ॥१॥
तुझीं पाउलें अनंता । न विसंबे गा सर्वथा ।
गोविंदा माधवा अच्युता । श्री विठ्ठला ॥२॥
गाई गोवळी पावला । येक म्हणती वळावळा ।
विष्णुदास नामा चरणाजवळा । अखंड वळत्या देतसे ॥३॥

१६९
ऐसें माझें मना येतें पंढरीनाथा । न सोडी सर्बथा चरण तुझे ॥१॥
यासि काय करूं सांगा जी गोपाळा । कां स्नेह लावियेला पूर्वींहुनी ॥२॥
ह्रदयीं चित्तवृत्ति मनेंसि मिळोनी । अवघीं तुझ्या चरणीं सुरवाडिलीं ॥३॥
नामा म्हणे केशवा धरिली तूझी सेवा । सुखा अनुभवा अनुभविलें ॥४॥

१७०
कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥
मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥
होईल सिद्धीचा साधक । त्यासी देई स्वर्गसुखा ॥३॥
कोण होईल देहातीत । त्यासी करी संगरहित ॥४॥
नामा  म्हणे जीवें साठीं । तुज मज जन्में पडिली गांठी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP