मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १२१ ते १२३

क्रीडा खंड - अध्याय १२१ ते १२३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

पुनरपि युद्धासाठीं, सिंधू येतो म्हणून गणपतिनें ।

समरीं समस्त सेना, आणिलि सत्वर समागमें त्यानें ॥१॥

सेनेचा अधिकारी, झाला कार्तिक करावया समर ।

नंदी भृंगी शृंगी, वीर तसा पुष्पदंत अनिवार ॥२॥

संहारुन असुरांना, केला निःपात तेधवां त्यांनीं ।

पाहुन सिंधू गर्जे, येत रणीं तो त्वरीत चालूनी ॥३॥

अग्न्यस्त्राचा त्यानें, झडकरि केला प्रयोग समरांत ।

तेव्हां गणपतिपशीं, शिवगण येती म्हणून ते त्वरित ॥४॥

म्हणती रक्षण करणें, गोंधळ करिती तयापुढें फार ।

ऐकुन गणपति तेव्हां, शिवनामासी स्मरुन परशुवर ॥५॥

केला प्रयोग योजित, निर्मित झाला कृतान्त त्यावरती ।

भीषण पुरुष तेव्हां, अग्नि गिळि नी असूर वधि हातीं ॥६॥

त्याच्यापुढती सिंधू, हरला झाला तसाच हतवीर्य ।

शिरला पुरांत मग तो, वसनाविरहित हरुन बलवीर्य ॥७॥

सिंधूचा वध करण्या, दुसरे दिवशीं न हो तरी उशिर ।

गणपतीकडून म्हणुनी, बोले नारद कटू असें उपर ॥८॥

ऐकुन नारदवाणी, केली निश्चित सुपूर्ण ती वाणी ।

नंदी भृंगी भद्र नि, पाठवि भुतराज सिंधुसी आणी ॥९॥

नगरीं जाउन त्यांनीं, भीषणरुपी नटून कल्लोळ ।

केला ऐकून वार्ता, दुर्गा बोले पतीस ती सरळ ॥१०॥

पूर्वीं सांगत होत्यें, तें आपण ऐकतां तरी वेळ ।

आली नसती नाथा, यास्तव जावें अतां प्रभूजवळ ॥११॥

ऐसें बोलत असतां, तों एकाकीं उडे त्वरें भृंगी ।

आघातें अपुल्या तो, राजसभामंडपास तो भंगी ॥१२॥

पाहे प्रकार सिंधू, कोपानें युद्ध्योग्य तो नटला ।

सिंधू निघता झाला, कळविति चौघे त्वरीत गणपतिला ॥१३॥

गणपति सिंधू लढले, तुंबळ ते फार फार आवेशें ।

कंटाळे सिंधू तो, गणपतिवरि धांवलाच आवेशें ॥१४॥

गणपति विराटरुपी, नटला शिर लागलें निराळास ।

चरण तयाचे गेले, भेदुन पाताळ पाहती खास ॥१५॥

पाहुन विराटरुपा, सिंधू मूर्च्छित पडे क्षितीं व्यासा ।

झाला सावध नंतर, ज्याची गगनास लागली शिरसा ॥१६॥

ऐसा पुरुष तुजसी, मुक्त करी हा रवी वदे वर तो ।

झाला आठव त्यातें, निश्चय समरास तेधवां करितो ॥१७॥

नंतर गणेश पाहे, तों दिसलें रुप तें जसें पूर्वी ।

होतें तसेंच झालें, गणपति मोरावरुन ये ऊर्वी ॥१८॥

मंत्राया अस्त्रासी, करितो मयुरेशवीर आचमन ।

जपला परशू वर तो, सोडी परशू करीतसे गमन ॥१९॥

पाहुन सिंधू सोडी, सायक तों परशुनें चिरी नाभी ।

श्रवलें अमृत मग तो, ओकी पिशितास मुक्तिला लागीं ॥२०॥

सिंधूचा वध होतां, गणपतिवरि करिति पुष्पवृष्टीस ।

गणगंधर्वमुनी ते, करिते झाले त्वरीत ते स्तुतिस ॥२१॥

(ओवी)

नमो परब्रह्म परेश ईशा । नमो गुणातीत गुणेश ईशा ।

नमो चिदानंद सुरेश ईशा । सिद्धि दाता श्रीगणेशा ॥२२॥

नमो मयूरेश गुणाब्धि ईशा । नमो आद्यपरमात्मा गणेशा ।

नमो सर्वमनीषा पूरकेशा । बुद्धिदाता श्रीगणेशा ॥२३॥

नमो सेव्य शिवसुरादि ईशा । नमो शत्रुदलनिक्रंतनेशा ।

नमो भक्तजनरक्षार्थ ईशा । विद्यादाता गणेशा ॥२४॥

नमो इच्छित्‌ स्वरुपधारणेशा । नमो सर्वजगताधार ईशा ।

नमो सर्वजगताक्षमहेशा । सर्वदाता गणेशा ॥२५॥

(गीति)

सर्वत्र विघ्ननाशक, आशीर्वाद प्रभू वदे स्तोत्रा ।

देवादि सर्व गेले, अपुल्या स्थानीं निघून ते मित्रा ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP