मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री साधु महाराज कंधारकर

श्री साधु महाराज कंधारकर

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


मुळ नाव: हनुमंत
जन्म: कानडखेड (पूर्णा स्टेशन वरील)
आई/वडिल: रमा/रामाजीपंत
समाधी: चैत्र शुद्ध ११, इ. स. १८१२
साधुमहाराज कंधारकार श्री साधु महाराज कंधारकर

मराठवाड्यातील कंधारचे साधुमहाराज हे एक मोठे दत्तोपासक अठराव्या शतकात होऊन गेले. परभणी जिल्ह्यात पूर्णा स्टेशनजवळील कानडखेड या गावी एक अश्वलायन शाखेचा ब्राह्मण राहात असे. त्याचे नाव रामाजीपंत व त्याच्या पत्नीचे नाव रमा असे होते. प्रपंच आणि परमार्थ यांत दोघांची गती चांगली होती. हरिभजनात दोघांना प्रीती होती. पण पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे उभयता कष्टी असत. काही कृपा संपादन करावी म्हणून रामाजीपंत रमाबाईसह माहुरास येण्यास निघाले. मनात दत्ताचे ध्यान सतत होते. तीर्थावर स्नान करून दोघांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. मनोभावे प्रार्थना करून मध्यरात्रीच्या वेळी दत्तात्रेय बटुवेषाने प्रगटले आणि त्यांनी रमाबाईस श्रीफलाचा प्रसाद दिला आणि

‘या प्रसादें होईल सुत । तो माझा परम भक्त ।’ असा आशीर्वाद दिला.

‘भजनमार्ग वाढवील । मुक्तीची गवादी घालील ॥
मुमुक्षु पांथीक येतील । धावुनी तृप्त व्हावया ॥
एकनाथ भक्तजेठी । अवतरेल तुम्हां पोटीं ॥’ असे सांगून दत्तप्रभू गुप्त झाले.

या कृपाप्रसादेकरून रमाबाई गर्भवती होऊन तिला यथासमयी पुत्र झाला. त्याचे नाव हनुमंत ठेवण्यात आले. त्या काळास अनुसरून विद्यार्जनास प्रारंभ झाला. घराण्यातील दत्तभक्तीच छंद त्याला लहानपणापासूनच होता. दत्तभेटीसाठी तो उत्सुक बनला.

‘कै हें संसारबिरडें फिटेल । कैं तो स्वामी मज भेटेल । युगाहुनीया वडील । निमिषोन्निमिष मानीतसे ॥’

अशी दत्तभेटीची मनात तळमळ असताना तो आपल्या आईवडिलांची सेवा मात्र चुकत नसे. त्याच्या या सेवारत वृत्तीने दत्तप्रभू संतुष्ट झाले आणि यतिवेष धारण करून ते त्याच्या अंगणी एकदा आले. यतीने हनुमंताची विचारपूस केली आणि त्याला गोदातटाकी सिद्धेश्वर लिंगापाशी येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हनुमंताची व दत्तात्रेयांची भेट झाली. हनुमंताने दत्तप्रभूंना साष्टांग नमस्कार करून विनविले,

‘आतां योगीवर्ये कृपावंते अनसुयात्मजे माझी माते। भावें शरण आलों तूंते। सनाथ पंथें मिरवी का?’ यतिरूपधारी दत्तात्रेयांनी त्याला कृपाशीर्वाद दिला आणि स्वरूप प्रकट केले.

‘तीन शिरें सहा कर । माथां मिरवे जटाभार । अंगी शोभे भस्म सुंदर । काषाय वस्त्र मेखला ॥
अरिदर कमंडलू माला । त्रिशूल डमरू करीं धरिला । ऐसिया देखतां स्वरूपाला आनंदला हनुमंत ॥’
या दत्तभेटीने हनुमंताचे जीवित कृतार्थ होऊन गेले.

यानंतर हनुमंतास माहुरास येण्याची इच्छा झाली. श्रीदत्तचरणांशी एकांत करून ‘जैसी दत्तमूर्ती पाहिली । तैसीच ह्र्दयी आठविली.’ येथे तप करीत असतानाच शेषफणीच्या सावलीत ध्यानस्थ बसलेली याची मूर्ती जोतसिंह नृपनाथाने पाहून त्याला आपल्या नगरीत नेले. पांचाळपुराहून हनुमंत तथा साधुराज पंढरपुरास गेले. काशी, प्रयाग, गया, नागपूर, पंढरी इत्यादी क्षेत्रांच्या त्यांनी यात्रा केल्या. नामस्मरण, हरिकीर्तन, भजनपूजन यांत रंगून गेलेल्या साधुमहाराजांनी संताचार्यासारखे शिष्य तयार केले. नामस्मरणाचा सुकाळ केला. अनेक जीवांचा उद्धार करून साधुमहाराजांनी दत्त व विठ्ठल यांच्या ऐक्यावर आधारलेला आपला एक विशिष्ट संप्रदाय उभा केला. भास्कर – रूक्मांगद – यशवंत – हनुमंत – धुंडिराज – सीताराम – शंकरमहाराज आणि श्रीसंताचार्य बापूमहाराज – बाबूमहाराज अशी विचारसरणीची परंपरा साधुमहाराजांची आहे. साधुमहाराजांना नाथांचा अवतार मानतात. त्यांना दत्तादर्शनाची ओढ नेहमीच असे. असेच एकदा माहुरास जाण्यास ते निघाले. पत्नीला बरोबर घ्यावे असे त्यांना वाटले. पण
‘गर्भवती कन्या ठेवुनी घरीं । आपण कैसें जाये माहुरीं। तरी प्राणेश्वरा अवधारीं । जावें तुम्हांसी न वर्जी’ असे तिने सांगितले.

साधुमहाराज शिष्यांना बरोबर घेऊन माहुरास निघाले. अरुणावतीस म्हणजे वाढवण्यास येऊन त्यांनी हरिहरात्मक परमेश्वराचे दर्शन घेतले. नंतर ते उंबरखेड म्हणजे उमरखेडास आले. तेथे त्यांना बरे वाटेनासे झाले. संताचार्यास ते म्हणाले,
‘आम्हांस दर्शन दत्तात्रेय। देईल ऐसें दिसेना ॥’

ना पंढरी ना माहुर अशी स्थिती असताना त्यांना तेथील आईनाथांनी दृष्टांत दिला की,
‘माझिया वामभागीं । निश्चित । सखया समाधिस्थ पैं व्हावें॥’ .

साधुराजांनी दत्तप्रभूंची प्रार्थना केली. पांडुरंगाला आळविले. वत्सासाठी धेनू धावत येते तसे साधुमहाराजांसाठी दत्त व पांडुरंग धावत आले. श्रीदत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी संन्यास घेतला आणि ‘चैत्र शुद्ध एकादशीस, शके सतराशी चौतीस’ या मुहूर्तावर साधुमहाराजांनी समाधी घेतली.

दत्त व पांडुरंग यांची ऐक्यभावाने उपासना करणाऱ्या साधुमहाराजांचे ओवीबद्ध चरित्र दासमारुतींनी लिहिलेले प्रसिद्ध आहे.
गुरुपरंपरा

भास्कर
    ।
रुखमांगद
    ।
यशवंत
    ।
हनुमंत
    ।
धुंडिराज
    ।
सीताराम
    ।
शंकर महाराज
    ।
संताचार्य बापू महाराज
    ।
बाबू महाराज
    ।
साधुमहाराज कंधारकार

|| द्विजाच्या घरी घेवडा वेल ज्याने || || मुळापासुनी तोडिला तो तयाने || || दिली संतती संपदा दुःखहारी || || तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||७||
|| श्री दत्तस्तुती ||

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP