मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज

श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज

दत्त संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे.


जन्म: अंदाजे १८४०, वाजपेयी ब्राम्हण, अयोध्या निवासी
आई/वडील: ज्ञात नाही
कार्यकाळ: १८४० -१९०८
गुरु: नारायण तिर्थ स्वामी
अवतार समाप्ती: १९०८
गंगाधर तीर्थ स्वामी प. प. श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराज
शक्तीपात दिक्षेचा नंदादीप

श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज म्हणजे शक्तीपात योगपरंपरेचा अगदी अलिकडचा अत्यंत दैदिप्यमान, नंदादीप. या नंदादीपाने एकच ज्योत पेटवली नि दिव्य परंपरा प्रकर्षाने प्रकाशित होण्याचा समर्थ आशीर्वाद दिला.

स्वामींचे सारेच जीवन नंदादीपासारखे होते. अखंड प्रकाश, शांतता व प्रसन्नता देणारे होते. त्यांच्या जीवनात कुठेही धावपळ, ये जा किंवा तीर्थयात्रा नाही. उग्र तप:साधनेचा खळखळाट नाही. जीवनाला प्रसिद्धीचा वारा लागला नाही. अहंकाराची झुळूकही स्पर्श न झालेले स्वामींचे जीवन होते. स्वामींच्या या उदात्त जीवनाचा काहीच पत्ता लागू शकत नाही. एवढ्या उत्तुंग जीवनाचे अल्पसे दर्शनही लौकिक अर्थाने घडू शकत नाही. असे असले तरी शिष्याला काही कृतज्ञतेचे कर्तव्य राहतच असते. भले भगवंतांनी स्वत:ला अदृश्य ठेवले, म्हणून भक्ताला आपली वाणी बंद ठेवता येत नाही. कृतज्ञतेची जाणीव व्यक्त केल्याशिवाय त्याला समाधान होतच नाही. भगवंताच्या जेवढ्या स्वरूपाचे त्याला आकलन झाले असेल त्या स्वरूपाची पूजा करणे अनिवार्य आहे, अटळ आहे. कदाचित ती पूजा पूर्ण स्वरूपाची असू शकणार नाही. पण भावपूर्ण असल्याशिवाय राहणार नाही. अशा भावपूर्ण मनाने आपण श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांच्या जीवनाचे मनन करुया.

स्वामीमहाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव आणि जीवन बिलकूल उपलब्ध नाही. जीवनकाल म्हणाल तर साधारणपणे इ.स. १८४० ते १९०८ हा आहे. इतक्या अलिकडच्या काळात विज्ञान युगात व्यक्ती स्वत:ला पूर्णपणे झोकून घेऊ शकते आणि समाज त्यांना ओळखू शकत नाही हे आश्र्चर्य आहे. प्राचीन काळी तर असंख्य महापुरूष अज्ञात राहिले असतील यात नवल कसले ! स्वामींचे मूळचे घराणे वाजपेयी ब्राह्मण शाखेचे होते. प्रभु रामचंद्रांच्या पुण्यपावन अयोध्या नगरीचे ते निवासी होते. स्वामींचे पूर्वाश्रमीय जीवन पूर्णपणे अज्ञात आहे. ते विवाहबद्ध झाले किंवा नाही ? व्यवसाय केला असेल तर कोणता ? नसेल केला तर काय केले असेल ? कौटुंबिक स्थिती कशी असेल ? ज्या कुळात या महापुरूषाचा जन्म झाला त्या कुळाची परंपरा, त्या कुळाचे दैवत-उपासना कोणती असेल ? यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ मौनानेच देणे शक्य आहे.

एवढे मात्र खरे की, स्वामीजींनी तरुणपणामध्ये घर सोडले, संसार सोडला आणि हिमालयाचा आश्रय घेतला. संन्यास घेण्यापूर्वीच हे घडले होते. विरक्त जीवनाची ओढ त्यांना संसारात ठेवू शकली नाही. यामध्ये व्यावहारिक संघर्ष काय झाले असतील ते न जाणे. पण स्वामींच्या निश्र्चयी आणि शांत मनात मात्र संघर्ष झाला नसावा. हे असे करावयाचे हा सहज ठरविलेला निर्धार होता आणि तोसुद्धा एकट्या स्वत:च्या मनाशीच. विरक्त वृत्ती इतकी पराकोटीची होती की त्यांना इच्छा अशी कसलीच नव्हती. साधनसंपन्न राहण्याने सतत स्वरुपानुसंधान अखंड राहते म्हणून साधरत असत. हिमालयाची सिद्धभूमी त्यांच्या विरक्त अंत:करणाला आकर्षून घेत होती. कुटुंबियांचे मायाममतेचे पाश स्वामींना रोखून धरू शकत नव्हते. विचलितही करू शकत नव्हते.

श्रीस्वामी कोणालाही न सांगता हिमालयात निघून गेले. तेथे काही काळ ते होते. हिमालयात त्यांना संन्यास वेषधारी विभूति भेटली. यासंबंधी श्रीस्वामींनी एवढेच सांगितले की, ‘माझ्या श्रीगुरुदेवांनी शक्तिपात करून दीक्षा दिली. अचानक भेटले मला श्रीगुरुदेव. मला दिव्य विद्या दिली. साधनमग्न राहण्यास सांगितले. मंगल आशीर्वाद दिला. देणारा दत्त असतो. घेणारा भक्त असतो.’ त्या विभूतीने दिव्य विद्या देऊन या भक्ताला कृतार्थ केले. योग्य मार्गदर्शन करून ती विभूती निघून गेली ती पुन: स्थूल रूपाने कधीही भेटली नाही. ही घटना अलौकिक होती. पण याचा उल्लेख यापेक्षा अधिक त्यांनी कधी केला नाही. आपला हिमालयातील उद्देश सफल झालेला पाहून गंगाधरतीर्थांनी परत फिरण्याचा बेत केला. ते परत घराकडे अयोध्येला न जाता जगन्नाथपुरीस गेले. संन्यास घेण्यासाठी ते गोवर्धन पीठात गेले. त्या ठिकाणी काही काळ मुक्काम करून त्यांनी विधिवत संन्यास ग्रहण केला.
गंगाधरतीर्थ स्वामी महाराज प. प. श्रीगंगाधरतीर्थस्वामीमहाराज

प. प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज हे नाव या आश्रमाचा स्वीकार केल्यानंतर प्राप्त झालेले आहे. या एकाच नावाचा परिचय आपणास झाला आहे. स्वामीमहाराज मितभाषी होते. गप्पागोष्टी, बोलणे, शास्त्रचर्चा इ. त्यांना पसंत नसत. ते अत्यंत एकांतप्रिय होते. त्यांनी आपल्याभोवती शिष्यपरिवार वाढविला नाही. गोवर्धनपीठाच्या आश्रमातील गर्दीसुद्धा त्यांना नकोशी वाटे आणि त्यासाठीच त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये चंदन तलावाच्या काठावर एक छोटीशी झोपडी बांधून तेथे आपले वास्तव्य केले. ते आपल्या झोपडीच्या बाहेर फारसे पडत नसत. भिक्षेसाठी स्वत: जात नसत. त्यांचेजवळ १-२ ब्रह्मचारी शिष्य होते. ते भिक्षा मागून आणीत आणि स्वामींची भिक्षा त्यातून होत असे. ते सतत साधनेत रमलेले असत. त्यांनी आपला व्यक्तिगत परिचय कोणालाही करून दिला नाही व आपल्या अध्यात्मसंपन्न जीवनाची जाणीव कोणालाही होऊ दिली नाही. लोक त्यांना अत्यंत साधा साधू म्हणून समजत. त्यामुळे त्यांचेकडे लौकिक अपेक्षेने कोणी गेलेच नाही.

प. प. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज म्हणजे परमशांतीचे नि सदाचार संपन्नतेचे मूर्तिमंत प्रतिक होते. त्याग, ज्ञान आणि साधना यांनी त्यांच्या शरीराचा आश्रय घेतला होता तर प्रसिद्धीने आपले चंबूगबाळे त्यांच्यापासून दूर ठेवले होते. बिचारी कीर्ति आयुष्यभर त्यांना वरण्यासाठी हातात माला घेऊन त्यांच्या झोपडीच्या फाटकाशी रात्रंदिवस तिष्ठत होती. परंतु स्वामी कधी आपल्या कुटीच्या बाहेर पडलेच नाहीत. कीर्ति अगदी कोमेजून गेली. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मार्फत काही जमेल या आशेने बिचाऱ्या कीर्तीने काही बेत रचले पण त्यालाही यश येईना. कारण त्या झोपडीत ये-जा अशी कोणाचीच नव्हती. एकदा मात्र तिने ठरविले आणि जो कोणी बाहेर येईल त्याच्याशी संधान बांधण्याचा निश्र्चय केला. त्यावेळी श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांचे एकमेव शिष्य श्री नारायण तीर्थ स्वामी महाराज त्या झोपडीतून कृतार्थ होऊन बाहेर पडत होते. कीर्ति त्यांचे मागे निघून गेली आणि श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज आपल्या या एकमेव शिष्यामुळे थोडेसे प्रकाशात आले.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP