मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
सतगुरु श्री आगाशे काका

सतगुरु श्री आगाशे काका

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म - १८ ऑगस्ट १९३१, श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) महाराष्ट्रातील हिंगणघाट या गावी
कार्यकाळ - सन १९३१ ते सन २००८  
मोक्षगुरु - परम पूज्य श्री नाना महाराज तराणेकर यांच्या कडून अनुग्रह
शक्तिपात दीक्षा - परम पूज्य श्री गुळवणी महाराज यांच्या कडून
समाधी - १५ सप्टेंबर २००८, भाद्रपद कृष्ण प्रतिपदा महाराष्ट्रातील खामगाव या गावी
विशेष - आजन्म सद्गुरू सेवेचा ध्यास, सद्गुरू सेवेचे मूर्तिमंत रूप , तरुणांना आध्यात्माकडे व विधायक कार्याकडे सहजपणे वळवणारे आध्यात्मिक गुरु
सतगुरु श्री आगाशे काका श्री कृष्णानंद सरस्वती काका महाराज
(अरविंद आगाशे काका)

जे सत्कीर्तीचे पुरुष । ते परमेश्वराचे अंश ।
धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेचि वसे ॥

भारत ही देवभूमी आहे, तर महाराष्ट्र ही देवांचे पृथ्वीवरील मनुष्य रूप मानल्या जाणाऱ्या संतांची कर्मभूमी म्हंटले आहे. अशा सत्पुरुषांपैकी एक म्हणजे अरविंद विष्णू आगाशे अर्थात पूज्य श्री आगाशे काका.

काकांचे पणजोबा भिकाजीपंत हे व्यवसायनिमित्त कोकण सोडून वऱ्हाडात स्थायिक झाले. १८८४ च्या सुमारास ते हिंगणघाट येथे राहू लागले. त्यांचे पुत्र मोरेश्वर आगाशे म्हणजे काकांचे आजोबा हे त्या काळात बी.ए., एल.एल.बी झाले होते. अनेक सार्वजनिक कामांमध्ये त्यांचा सहभाग असे. त्यांचे पुत्र विष्णुपंत (रावसाहेब) आगाशे यांच्या पत्नी कमला आगाशे उर्फ अक्का यांच्या पोटी तीन मुलींनंतर १८ ऑगस्ट १९३१ रोजी श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी)ला काकांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर वर्षभराने आगाशे कुटुंब वर्धा येथे राहायला आले.

रावसाहेबांचे हे घर म्हणजे तीनमजली वाडाच होता. घराच्या आजूबाजूस दत्ताचे, रामाचे व गणपतीचे मंदिर होते. रावसाहेबांच्या घरात गडीमाणसांचा राबता होता. परिसरातील सधन व सुखी कुटुंब म्हणून आगाशे कुटुंबाची ख्याती होती. मातोश्री अक्का यांनी काकांवर जाणीवपूर्वक संस्कार केले. उच्च- नीचतेचा भेद आगाशे यांच्या घरात पाळला जात नसे. काकांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथील प्राथमिक शाळेत झाले व त्यानंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले.

लहानपणापासूनच काकांच्या अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली होती. बहिणी गोफ किंवा नृत्य करत असताना रासक्रीडेचा प्रसंग आला की ते फेराच्या मध्यभागी जाऊन श्रीकृष्णाप्रमाणे एक पाय दुमडून हातात मुरली घेतल्याचा अविर्भाव करत उभे राहत असत. त्याच काळात त्यांना स्वप्नात श्रीकृष्ण दिसत असे, असे ते सांगत असत.

आवाज मुळातच गोड असल्याने लहानपणी त्यांना गाणे शिकवण्यासाठी भावोजी काळे नावाचे शिक्षक येत असत. स्नेहसंमेलनातील नाटिकांमध्येही ते भाग घेत असत. चित्रकलेतही त्यांना रुची होती. १९४७ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी बी. कॉम. साठी प्रवेश घेतला.
कठीण समय येता

वर्धायेथे एक्सट्रा असिस्टंट पदावर काकांच्या वडिलांची नेमणूक झाली. एका व्यक्तीने पद्धतशीर सापळा रचून त्यांना एका प्रकरणात गोवले व त्यामुळे त्यांची नोकरीही गेली व वकिलीची सनदही. कोर्ट केससाठी पैसा पाण्यासारखा वाहत होता. आप्तांनीही पाठ फिरवली. अशा बिकट परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून काकांना नोकरीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले. अशा रीतीने १९४८ पासून घरातील मोठा मुलगा म्हणून त्यांनी पूर्ण जवाबदारी घेतली. निराश होण्याचे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी जीवन संपविण्याचाही प्रयत्न केला, जो असफल ठरला.
जयासाठी धाडिले, ते कार्य सुरु झाले

काकांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणीच 'अजून प्रापंचिक जवाबदारी पूर्ण व्हायच्या असल्याने घरी परत जा' असा त्यांना आदेश मिळाला व दिव्य दत्तमंत्र प्राप्त झाला. ही घटना १९५२ सालची. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांना वर्ध्यातील घर विकावे लागले. त्यांची सनद परत मिळाली, ते निर्दोष सुटले, परंतु नाउमेद झाले होते. त्यामुळे १९५२ पासून वर्धा सोडून सर्वजण काकांजवळ ठाण्यास राहू लागले. सुरेश या भावाचे शिक्षण पूर्ण होत आले होते. बहिणींचे विवाहही झाले होते. अजित व विजय ह्या भावंडांचे शिक्षण मात्र सुरु होते.

'भव्य रूप अतिसुंदर साचे । दत्तनाम स्मरणे नितवाचे' अशी काकांची अवस्था होती. दत्तनामाचा जप अधिकाधिक होऊ लागला. त्याचप्रमाणे रामनामाचा जप, अन्य देवतांची व्रतवैकलेही ते करत होते.
संघटनशक्ती हीच खरी शक्ती

समाजासाठी काहीतरी करावे, ही इच्छा मनी बागळून काकांनी १९५५ ते १९६२ या काळात रा. स्व. संघाच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. पुणे येथे ओटीसीचे एक वर्ष पूर्ण केले व ठाण्यातील बजरंग शाखा नावाची बाल व तरुण शाखा सुरु करून एका वर्षाच्या आत त्या शाखेला ध्वज मिळवून दिला. १९५६ साली काका व १२५ स्वयंसेवक सायकलने रायगडला गेले. याच काळात भावांचे शिक्षण पूर्ण होऊन ते नोकऱ्या करू लागले. वडिल घरात संस्कृत व गणित विषयांचे शिकवण्या घेऊ लागले.

आता काकांच्या संसारातील पाश दूर होण्याची वेळ येऊन ठेपली होती. प्रापंचिक जवाबदाऱ्या पूर्ण करून आता आत्मचिंतनात रमण्याकडे कल वाढू लागला. १९६४ साली त्यांनी नोकरीचा राजीमाना दिला.
सुरु झाली संत दर्शने

काका नित्यानंद स्वामींच्या दर्शनाला नेहमीच जात असत. त्या वेळेसच त्यांना अनेक सत्पुरुषांच्या दर्शनाचा लाभ झाला. १० जानेवारी १९६५ रोजी पावसाच्या देसाई यांचे कडे गेले असता त्यांना स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन घडले. त्यांना 'सोSहं ' साधना शिकवली व उपास्य देवतेबद्दल मार्गदर्शनही केले.
त्यानंतर १९६७ साली पूज्य श्री गुळवणी महाराज यांच्याकडून काकांना शक्तिपात दीक्षा मिळाली. समाधीपर्यंतच्या विविध क्रिया त्यांना साध्य झाल्या. १९६९ मध्ये मुंबई येथे पूज्य श्री बाबामहाराज आर्वीकर (जोशी) यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या बरोबर दोन वर्षां साठी ते माचणूर येथे आश्रमात राहायला आले. येथील सहवासातच त्यांना अध्यात्मिक लेखनात गती प्राप्त झाली. १९७० साली काकांना अक्कलकोट येथील पूज्य श्री गजानन स्वामी यांचे दर्शन घडले व त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त झाला. अशा प्रकारे साधनेच्या शिदोरीत भर पडत होती व साधकावस्थाही पूर्ण होत आली होती. दरम्यानच्या काळात काका गाणगापूर येथे गेले असता त्यांना दत्तप्रभूंचे दर्शन घडले व उपदेश केला. १९७१ मध्ये काका आपल्या मित्रांसह नागपूर येथे पूज्य श्री बापूराव महाराज खातखेडकर यांच्या दर्शनासाठी गेले. बापूराव महाराजांनी त्यांच्यावर खूप प्रेम केले व मार्गदर्शनही केले. यांनीच काकांना त्यांच्या सद्गुरूंपर्यंत पोहोचविले.

१९७० च्या फेब्रुवारी महिन्यात मुंबईत काकांना परम पूज्य श्री नाना महाराज तराणेकर यांचे दर्शन घडले. तेथेच एकमेकांना एकमेकांची खूण पटली व काकांचा गुरुंसाठी चाललेला शोध थांबला. पूज्य नानांनी काकांचा अधिकार ओळखला व गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितले. १९७२ साली नागपूर येथील वास्तव्यात चैत्र कृष्ण एकादशीच्या दिवशी पूज्य नानांनी काकांना अनुग्रह दिला व त्यांची अध्यात्मिक वाटचाल नव्याने सुरु झाली. नानांनी त्यांना इंदूर येथे सेवेसाठी आणले. पहाटे साडेतीन वाजताच काकांचा दिवस सुरु होत असे व श्री गुरूंना चहा करून देण्या पासून ते स्नान घालणे, भाविकांना मार्गदर्शन करणे अशा सर्व प्रकारच्या सेवा ते करत असत. दरम्यान च्या काळात काकांना भीमा अमरजा दर्शनाचा, गरुडेश्वर येथे नर्मदा मातेच्या दर्शनाचा व परम पूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ झाला. तसेच त्यांनी गायत्री पुरश्चरणही केले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काकांचा अधिकार जाणून नानांनी त्यांना यती परंपरेत सामावून घेतले व 'कृष्णानंद सरस्वती' असे त्यांचे नामकरण केले. काकांचा अधिकार ओळखून झाडाखाली झाड वाढत नाही या न्यायाने नानांनी आगाशे काकांना इंदूर सोडण्याची आज्ञा केली. ऑगस्ट १९८५ मध्ये ते मलकापूर येथे आलॆ व तात्या दामले यांच्या वाड्यात राहू लागले. १९९० साली तब्येतीच्या कारणामुळे जिने  चढण्या - उतरण्यावर बंधने आली व ते खामगाव येथे राहू लागले. चातुर्मासानिमित्त अन्नशांती करून त्यांनी अन्नदानाचे महत्व विशद केले. त्या चातुर्मासानंतर ते मलकापूर ला काही दिवसांसाठी गेले व पुन्हा खामगावात परतले ते कायमसाठीच.
पूज्य श्री नानांच्या अखंड सेवेत पूज्य श्री आगाशे काका पूज्य श्री नानांच्या अखंड सेवेत पूज्य श्री आगाशे काका

पुढील काळात पूज्य आगाशे काकांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांचे साहित्य पुढील प्रमाणे –

१ - आपले पत्र पोहोचले
२ - गुरुचरित्र मला समजले तसे
३ - मना सर्वदा श्रीगुरुंसी भजावे
४ - दासतरंग
५ - दास अभंगगाथा
६ - स्वामी माझा लेकुरवाळा
७ - मार्तंड स्तवन
८ - मार्तंड वैभव
९ - मार्तंड उवाच
१० - मार्तंड उपनिषद
११ - उपासना विचार
१२ - संकटहरण स्तोत्रावरील विवरण
१३ - सहज संवाद
१४ - चैतन्याचा आनंद

आगाशे काका यांनी आपल्या जीवनात सेवेचा वसाच घेतला होता. म्हणूनच त्यांना सेवेचे मूर्तिमंत रूप असे म्हंटले आहे.
काकांकडे सर्व स्तरातील व सर्व प्रकारचे भक्त येत असत. त्यांच्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचा भेद केला नाही. त्यांच्या भक्तांमध्ये तरुणांची संख्या अधिक होती. उत्सव - यज्ञयागानिमित्त त्यांनी तरुणांचे संघटन केले. काकांनी व्यसनमुक्ती साठीही उल्लेखनीय कार्य केले. व्यसनींना समजावून व्यसनापासून दूर केले.

नामस्मरणाचे महत्व सांगत सर्वांपर्यंत त्यांनी नामाचा महिमा पोहोचविला. त्यांनी दत्त याग, गणेश याग, धन्वंतरी याग , विठ्ठल याग, हनुमंत याग असे अनेक याग केले. खामगाव, मलकापूर, नागपूर, अमरावती, डोंबिवली असे एकूण ४१ याग झाले. यज्ञ यागासह त्यांनी भक्तांना सामूहिक उपासनेची गोडी लावली. आपल्या गुरूंना पालखीत बसवून कारंजा, देऊळगावराजा, शेगाव, तुळजापूर अशा ठिकाणी पालखी ही काढली. उत्सवप्रसंगी मिळणाऱ्या भेटींचे त्यांनी गरजूंना सदिच्छापूर्वक दान केले. भक्तांच्या चांगल्या - वाईट प्रसंगी ते धावून जात असत.
उत्सव प्रसंगी पालखी सोहळा उत्सव प्रसंगी पालखी सोहळा

आगाशे काका दर वर्षी काही शाळांमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करत असत. तसेच त्यांना मोफत संगणक प्रशिक्षणचीही सोय करून देत असत. अनेक गरजूंना त्यांनी उद्योगधंदा सुरु करण्यासाठी मदत केली, तसेच गरिबांना दर महिन्याला किराणा व कपडे देत असत. हे सर्व समाजकार्य करताना त्यांनी घराकडे मात्र दुर्लक्ष केले नाही.

पूज्य काका हे उत्कृष्टतम गीतकार होते. त्यांनी विविध अभंगे, दासअभंग गाथा, राम गाथा, कृष्ण गाथा, विविध देव-देवतांवरील गीते लिहिली आहेत. अनेक नामवंत संगीतकारांनी त्याला संगीत दिले असून ख्यातनाम गायक - गायिकांनी ती गीते गायली आहेत. अनेक कॅसेट्स, सी. डी. मध्ये त्याचा समावेश केला आहे.

आगाशे काकांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी संपूर्ण तरुण पिढीला आध्यात्माकडे व विधायक कार्याकडे वळविले. म्हणूनच पूज्य काकांच्या अवतीभवती नेहमी तरुणांचा मेळाच असतो.

पूज्य काका १९९० मध्ये श्री अप्पा ताम्हण यांच्या कडे राहायला आले ते कायमचेच. ते त्यांच्या घरातीलच एक सदस्य म्हणून राहिलेत, वागलेत. २००५ साली सर्व भक्तांसाठी उपासना स्थान असावे या उद्देशाने त्यांनी एक स्थान निर्माण केले व त्याला 'बरसाना' हे नाव दिले. 'बरसाना' हे कृष्ण भक्तीचे प्रतीक असून समस्त भक्तांचे ते श्रद्धास्थान झाले आहे. तेथे पूज्य काकांची समाधी बांधण्यात आली असून ते समाधी स्थान आहे व तेथे विविध उत्सव संपन्न होतात.
पूज्य आगाशे काकांनी १५ सप्टेंबर २००८, भाद्रपद कृष्ण प्रतिपदा या दिवशी त्यांच्या मादन प्लॉट मधील वास्तव्यस्थानीच देह ठेवला. ते साधनास्थान व वास्तव्यस्थान म्हणून ओळखले जाते. तेथे देखील नित्य उपासना, वार्षिक कार्यक्रम, अन्नशांती संपन्न होत असते. पूज्य काकांनी सर्व सांप्रदायिक अनुग्रहित भक्तांचे सद्गुरू सेवा मंडळ स्थापन केले व त्या द्वारा विविध कार्यक्रम संपन्न होतात.

पूज्य काकांना श्री कृष्णाने दर्शन दिले असून त्यांचा सहवास लाभला आहे. श्री कृष्णाने प्रत्यक्ष काकांचे हातून भोजन केले आहे.
सर्व संतांनी पूज्य आगाशे काकांचा अधिकार ओळखला होता. काकांना नेहमीच तेथे अग्रस्थान लाभले आहे. या काळात पूज्य काकांच्या सारखे निस्पृह, अधिकारी व अवतारी संत होणे आता दुर्मिळच आहे.

पूज्य श्री आगाशे काकांचे समग्रजीवन दर्शन 'आनंदाचा कंद' या ग्रंथात घडते तसेच 'कृष्णानंद महिमा', 'कृष्णानंद सप्तशती चरित्र' आणि 'श्री कृष्णदास काका माऊली चरित्रामृत' या पोथी मध्ये घडते.
पूज्य श्री आगाशे काकांची गुरु परंपरा पूज्य श्री आगाशे काकांची गुरु परंपरा

 
परिपूर्ण अवस्थेतील श्री काकांचे दर्शन परिपूर्ण अवस्थेतील श्री काकांचे दर्शन
पूज्य श्री आगाशे काकांचे समाधिस्थान -श्री क्षेत्र 'बरसाना', अमृतनगर, खामगाव, जिल्हा बुलडाणा, महाराष्ट्र पूज्य श्री आगाशे काकांचे समाधिस्थान -
श्री क्षेत्र 'बरसाना', अमृतनगर, खामगाव, जिल्हा बुलडाणा, महाराष्ट्र

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP