मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री दत्तनाथ उज्जयिनीकर

श्री दत्तनाथ उज्जयिनीकर

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


मूळ गाव: मुळचे राक्षसभुवनचे, उपनाव कापसे
जन्म: इ.स.१७१३
आई/वडिल: लक्ष्मीबाई / नारायण
कार्यकाळ:  १७१३-१८४९
गुरु: अनंतनाथ
समाधी: १८४९, उजैनी येथे देहविसर्जन

अनेक मठ, मंदिरे, गुंफा, घाट यांसाठी उज्जयिनी क्षेत्र प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहे. येथे सिंहपुरीत श्रीदत्तात्रेयांचे मंदिर असून तोच दत्तनाथांचा मठ म्हणून समजला जातो. हे दत्तनाथ मोठे योगी व सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध असून ग्वाल्हेरचे ढोलीबुवा श्रीमहिपतीनाथ यांचे मित्र होत. दत्तनाथ हे मूळचे राक्षसभुवनाचे असून यांचे उपनाव कापसे. वडिलांचे नाव नारायण व आईचे लक्ष्मीबाई. अनंतनाथ हे यांचे गुरू. निरंजन – विष्णू – हंस कमलासन अत्री – दत्त – गोपाळ नागनाथ – निंबराज – नरहरी – गिरीधारी – जनार्दन एकनाथ – दत्तभाऊ – केशबाबा – अंतोबाबाबा – दत्तात्रेय; अशी यांची गुरुपरंपरा आहे. हे दत्तनाथ महादजी शिंदे यांच्याबरोबर उत्तर हिंदुस्थानात आले. पाथरगडच्या लढाईत यांनी शिंद्यांच्या बरोबर भागही घेतला. यांना ज्योतिषशास्त्रही चांगले येत होते. पुढे हे उज्जयिनीस आल्यावर यांना योगधारणा, परमार्थ, वैराग्य इत्यादींची गोडी लागली. यांनी तीर्थयात्राही केली. यांनी शके १७७१ मध्ये देह ठेविला. त्यांच्या पादुकांची पूजा नित्य उज्जयिनीच्या मठात होत असून तेथेच दत्तमंदिरही आहे.

यांची स्फुट काव्यरचना विविध प्रकारची आहे. पदे, पोवाडे, लावण्या, गौळणी, धावे, आरत्या, अष्टके, श्लोक इत्यादींतून त्यांची गुरुभक्ती व वैराग्यवृत्ती प्रकट होते. ‘धनानंद वृत्ती’ व ‘आनंदवृत्तकथासार’ अशी यांची काही प्रकरणे आहेत. यांच्या संग्रहात असलेल्या हस्तलिखित पोथ्याही पुष्कळ आहेत. यांची काही पदे येथे देण्यासारखी आहेत.

(१)   
पहिले गुरु रूप ऐसें ॥धृ.॥
तनमनधन सर्वही आर्पून ।
जालों शरणागत ऐसें ॥१॥
आभय हस्तें बैसुनि सन्मुखि ।
मावळित शशि सूर्यनभा ऐसें ॥२॥
कोटी भानुप्रभा फांकली त्या काळीं ।
मी तूं पण हारलें ऐसें ॥३॥
आनंतोंकित षड्कर्मातित ।
दत्तस्वरूपचि ऐसें ॥४॥

(२)  
नका पाहूं मागें पुढें ।
सावळें रूपी दृष्टी गडे ॥१॥
शास्त्र पुराणाचें बीज ।
तुझे हातीं आसे निज ॥२॥
लक्ष लावि त्या स्मरणिं ।
आनुभव हो तेचि क्षणिं ॥३॥
नको पाहूं मतांतरें ।
सर्वठायी येक विचार ॥४॥
विचार विवेकसिंधु प्राप्ती ।
दत्त म्हणे गुरु प्रतिती ॥५॥

(३)  
नको पुसो वारंवार ।
करि नामाचा उचार ॥१॥
न करि आणिक कांहीं ।
भ्रुकुटिमध्यें लक्ष लावि ॥२॥
करूं नको खटपटी ।
आद्यस्फुरण हें घोटी ॥३॥
नको आन्य साधन पाहि ।
गगनीं रव ब्रह्ममनीं ध्याई ॥४॥
आणुरेणु अंतर गर्भ ।
आनंत ब्रह्मांडें व्याप्त नभ ॥५॥
सर्व आसतां सर्व नाहिं ।
दत्त आलक्षि लक्ष तेंही ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP