मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री सद्गुरू मामा देशपांडे

श्री सद्गुरू मामा देशपांडे

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: २५ जून १९१४
आई/वडील: पार्वतीदेवी/दत्तोपंत देशपांडे
विशेष: प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामींचे समाधीचे दुसऱ्या दिवशी जन्म
कार्यकाळ: १९१४ ते १९९०
गुरू: योगीराज गुळवणी महाराज व स्वामी समर्थांच्या पूर्णकृपांकित शिष्या व मामांच्या माता पार्वती देवी

संतांची पावनभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अनेक संत माहात्मे होऊन गेले, त्यापैकीच एक अलौकिक संत व थोर स्वातंत्र्यसेनानी सद्गुरू योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे हे होत. ९ जुलै २०१३ ते २९ जून २०१४ हे वर्ष प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे समाधी शताब्दी वर्ष व प. पू. श्री मामामहाराजांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपन्न झाले. प्रत्यक्ष प.पू. श्री टेंब्ये स्वामी महाराजच पूर्णांशाने प.पू. मामा म्हणून जन्माला आले, अशीच भक्तात भावना आहे.

प. पू. मामांचा जन्म प. प. श्री टेंब्ये स्वामी महाराजांचेच एक अधिकारी शिष्य प. पू. श्री दत्तोपंत देशपांडे व राजाधिराज श्री अक्क्लकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित शिष्या प. पू. पार्वती देवी या भजनशील दांपत्याच्या पोटी २५ जून १९१४ रोजी झाला. प. पू. पार्वतीदेवींना लहानपणी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांनी मांडीवर घेऊन व मस्तकावर कृपाहस्त ठेवून ‘ही आमची पोर आहे’ असे उद्गार काढले होते.

या पुण्यशील दांपत्याला गोविंद, रघुनाथ ही दोन मुले व अनसुया नावाची एक मुलगी झाली. पण त्यानंतर संतती जगत नसल्याने त्यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली. प. पू. श्री टेंब्येस्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तीवर यथावकाश प्रसन्न होऊन, त्यांना ‘पतितोद्धारक पुत्र होईल’ असा आशीर्वाद दिला.
parvatidevi स्वामी समर्थांच्या पूर्णकृपांकित शिष्या व मामांच्या मातोश्री पार्वती देवी

कालांतराने पार्वतीदेवींना दिवस गेले. सतत देवांचे नामस्मरण करावे व ध्यान लावून बसावे असे अद्भुत डोहाळे पार्वतीदेवींना लागले. प्रसूती वेदना सुरू झाल्यावर पार्वतीदेवींनी प.पू. टेंब्येस्वामी महाराजांची करूणा भाकली. श्री स्वामी महाराजांनी दिव्यरूपात प्रकट होऊन “काळजी करू नये, परवा आमच्याच पूर्णांशाने तुम्हास पुत्र होईल, त्याचे नाव श्रीपाद ठेवा, आता आम्ही देह सोडत आहोत” असे सांगितले. गरूडेश्वरी श्री स्वामी महाराजांनी समाधी घेतली व शास्त्रानुसार देह नर्मदा नदीमध्ये विसर्जित केला आणि इकडे पुण्याला पार्वतीदेवींना आषाढ शुद्ध व्दितीयेला पुत्र झाला. श्री टेंब्येस्वामींनी सांगितल्याप्रमाणे बाळाचे नामकरण ‘श्रीपाद’ असे करण्यात आले.

श्रीपाद तीन वर्षाचा असताना दत्तुअण्णांनी आपले बिऱ्हाड नसरापूरला आणले. देशपांडे हे नसरापूरचे वतनदार होते. सद्गुरूकृपेने आई-वडील दोघेही परमार्थिक अधिकारी असल्याने श्रीपादाचे परमार्थाचे शिक्षण घरातच सुरू झाले. दत्तुअण्णा व सौ.पार्वतीदेवी दोघेही ज्योतिष आणि आयुर्वेद यांचे उत्तम जाणकार होते. त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. लहानगा श्रीपाद सगळे त्वरित आत्मसात करीत असे. श्रीपादाची वडिलांबरोबर वयाच्या आठव्या वर्षी हिमालय यात्रा व बाराव्या वर्षी अनवाणी अयाचितवृत्तीने नर्मदा परिक्रमाही झाली होती. यात्रांमध्ये दत्तुअण्णांकडून त्याला विविध औषधी प्रयोग, ज्योतिषातील आडाखे, विविध मंत्र इत्यादीचे ज्ञान मिळाले. नर्मदा परिक्रमेत तर प्रत्यक्ष नर्मदामातेने प्रकट होऊन भुकेलेल्या श्रीपादाला लोणी-भाकरी खायला दिली. तेथेच त्यांना अश्वत्थाम्याचेही दर्शन झाले होते. श्रीपाद पाच-सहा वर्षाचा असताना बेळगावला बहिणीच्या मंगळागौरीनिमित्त गेला होता. त्यांच्या घरी ध्यानाला बसला असता त्याला प्रत्यक्ष श्रीपंत बाळेकुंद्रीमहाराजांचे दर्शन झाले. एकदा बनेश्वरच्या जंगलात मित्रांबरोबर खेळताना रस्ता चुकल्यावर श्रीपाद घाबरून रडू लागला. तेवढयात तिथे पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेले, पांढरी दाढी असलेले व हातात काठी असलेले तेजस्वी बुवासाहेब नावाचे सिद्ध अद्भूतरित्या प्रकट झाले. त्यांनी त्याला भाजी भाकरी खायला दिली, घोंगडी अंथरून त्याला झोपविले व सकाळी घराजवळ आणून सोडले.
स्वावलंबी शिक्षण

श्रीपादाला पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या भारत हायस्कूलमध्ये दाखल करून जेमतेम एक वर्षही झाले नसेल तोच दत्तू अण्णांनी इहलोक यात्रा संपविली. थोरल्या दिरांनी सर्व संपत्तीवर आपला अधिकार दाखवून पार्वतीदेवींना घराबाहेर काढले ‘श्रीहरीची इच्छा’ म्हणून धीराने त्या घराबाहेर पडल्या व पुण्यात मंडईजवळील रानडे वाडयात भाडयाच्या घरात राहू लागल्या. त्याच वाडयात त्यांची मुलगी अनुसयाही राहात होती. तिच्या मुलांमुळे श्रीपादरावांना ‘मामा’ हे नाव पडले व तेच पुढे रूढ झाले. स्वत:चे शिक्षण सुरू ठेवऊन श्रीपाद चरितार्थासाठी शिकवण्या करू लागला. तो तेल, साबण, उदबत्या घरोघर जाऊन विकत असे. मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे श्रीपादाला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरोघरी जाऊन वस्तू विकण्याचा उद्योग चालू ठेवून त्याने एकीकडे कंपोझिंगचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणावर आधारित त्यांना ‘दैनिक त्रिकाल’ मध्ये मासिक पंधरा रूपये पगाराची नोकरी मिळाली. पण दुर्दैवाने खिळे जुळविताना शिशाची विषबाधा झाली व त्यामुळे ती नोकरी त्यांना सोडावी लागली. आजारातून उठल्यानंतर त्यांनी मुद्रणशाळेची परीक्षा दिली व परगावी नोकरी पत्करली. पण तेथील हवापाणी त्यांना मानवेना म्हणून पुन्हा पुण्याला येऊन खडकीच्या ऍम्युनिशन फॅक्टरीत नोकरी धरली.
श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री सद्गुरू मामा देशपांडे  
मातेकडून आध्यात्मिक मार्गदर्शन

‘समाज कार्यासाठी आधी भगवंतांचे अधिष्ठान हवे. स्वत: आत्मज्ञान प्राप्त करून ते ज्ञान इतरांना दिले पाहिजे,’ या पार्वतीमातेंच्या सांगण्यावरून त्यांनी अध्यात्ममार्गावर लक्ष केंद्रित केले. आईच्या सांगण्यावरून श्रीपादांनी दासबोध, श्री एकनाथी भागवत व नंतर ज्ञानेश्वरी या क्रमाने पारमार्थिक अभ्यास केला. ‘ज्ञानेश्वरी हा नुसता पारायणाचा ग्रंथ नाही तर त्यातील ऒवी आणि जगता आली पाहिजे. देहाची तीन चिमटया राख होईपर्यंत नेमाने व प्रेमाने, न चुकता साधना करीत राहायची’, असे पार्वतीदेवी सांगत असत. प.पू.पार्वती देवी अध्यात्मातील थोर अधिकारी होत्या. त्यांच्या मानसपूजेतील उपचार प्रत्यक्ष दिसत असत. ताकावरील लोणी काढताना तो लोण्याचा गोळा प्रत्यक्ष गोपालकृष्ण ग्रहण करीत असत. त्यांच्या जीवनातील एक अद्भुत चमत्कार म्हणजे त्यांनी शेवटची १२ वर्षे जमिनीला पाठ कधीच टेकवली नाही. संपूर्ण रात्र त्या ध्यानाला बसत किंवा जप करीत फेऱ्या मारत असत.

थोडे आर्थिक स्थैर्य लाभल्यावर वयाच्या पंचविसाव्या वर्षी मामांचा म्हणजे श्रीपादांचा बोपर्डीकरांच्या मुलीशी विवाह झाला. परंतु दोन वर्षातच बाळंतपणात मुलासह पत्नी देवाघरी गेली. मामांना संसारातून विरक्ती आली व ध्यानात, चिंतनात ते जास्त काळ रमू लागले. ते पाहून प.पू. मातृश्रीनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुज्ञेने प.पू. श्री मामांना शक्तिपात अनुग्रह करून परंपरेचे दीक्षाधिकारही प्रदान केले. त्यावेळी त्यांना प.पू. मामा जवळजवळ पाच तास प्रगाढ समाधी अवस्थेत होते. त्यावेळी मातृश्रींनी मामांना सांगितले की, ‘परंपरेसाठी लागणारा मंत्र देण्याचा अधिकार मला नाही. तुला १२ वर्षांनी मंत्र देणारे गुरू भेटतील. आज आला तसाच अनुभव त्यावेळी पुन्हा येईल. तेच तुझे मंत्रदाते सद्गुरू असतील.’

त्याच रात्री प.पू. मातृश्रींनी मामांना जवळ बोलावून ‘योगी देह कसा ठेवतात, हे गीतेत भगवंतांनी सांगितले आहे, त्याचे प्रात्यक्षिक पहा’ असे म्हणून योगमार्गाने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. भानावर आल्यावर प.पू. मामांना जाणीव झाली की, आपली सद्गुरू, मार्गदर्शक, प्रेमळ माता आता आपल्यामध्ये राहिलेली नाही.
Mama Deshpande श्री सद्गुरू मामासाहेब देशपांडे

प्रारब्ध भोग म्हणून व आईच्या इच्छेप्रमाणे प.पू. मामांनी शांता आपटीकर हिच्याशी व्दितीय विवाह केला पण बाळंतपणात तिचेही निधन झाले. तिसरा विवाह रूढीप्रमाणे रूईच्या झाडाशी व चौथा विवाह बाळेकुंद्रीच्या रंगोपंत हुद्दार यांची मुलगी शकुंतला हिच्याशी झाला. त्यांना एक मुलगाही झाला. त्याचे नाव श्रीनिवास असे ठेवले. पण दोन वर्षातच मंगळागौरीला फुगडी खेळताना पडून कंबरेचे हाड मोडले व त्या आजारपणातच पतिभक्त शकुंतलादेवींचा मृत्यु झाला. त्यांनी मृत्युपूर्वी मुलाला भावजयीच्या ओटीत घातले होते.

प.पू. मामांनी १५ जून १९४८ रोजी श्री स्वामी समर्थांच्या अनुज्ञेने एक तांब्या व दोन पंचे घेऊन गृहत्याग केला. आळंदी, पंढरपूर, व्दारका येथे यात्रा करून ते राजकोटला आले. तेथे हठयोग, अष्टांगयोग वगैरेचा अभ्यास केला. ध्यान-ध्यारणा, योगासने यामध्ये ते वेळ घालवू लागले. राजकोटला असताना प.पू.मामांनी गिरनार, व्दारका, हिमालय येथे यात्रा केल्या. पंढरीची आषाढीवारीसुद्धा केली. या सर्व यात्रांमध्ये त्यांना अनेक दिव्य अनुभव आले.

१९५३ च्या रामनवमीला राजकोट येथील राममंदिरात अचानक पहिले प्रवचन करण्याचा योग प.पू. मामांना आला व त्यानंतर हयातभर त्यांनी ही ज्ञानसत्रे करून लोकांना ज्ञानेश्वरीची व संतवाङ्मयाची गोडी लावली. प. पू. मामांनी १९३६चे १९४८ अशी सलग १२ वर्षे पंढरीची वारी केली. पुढे ३२ वर्षे देशमुख महाराजांच्या दिंडीतून पायी वारी केली.

प. पू. टेंब्येस्वामी महाराजांनी दॄष्टांत देऊन सांगितल्याप्रमाणे प. पू. श्री गुळवणी महाराजांनी पू. मामांना कुरवपूरला तपश्चर्येसाठी जाण्याची आज्ञा केली. दोन महिन्यांच्या तेथील वास्तव्यात प. पू. श्री टेंब्येस्वामी महाराजांचे दोनदा दर्शन झाले. दसऱ्याच्या दिवशी कृष्णेवर भांडी घासत असताना पाय घसरून पू. मामा वाहात असताना नावाडयाच्या रूपाने प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी त्यांच्या पाठीला हाताने रेटून काठावर आणले. शेवटचा सप्ताह चालू असताना कृष्णेवर स्नानाला गेले की त्यांना अद्भुत बिल्वदलयुक्त तेजस्वी पादुकांचे दर्शन होत असे. श्रीगुरूव्दादशीच्या शुभदिनी गुरूचरित्राच्या पोथीत, नवव्या अध्यायातील भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या निजानंदगमनाच्या ओव्यांवरच बिल्वदलयुक्त दिव्य पादुका प्रसाद्र्रूपाने मिळाल्या.

कुरवपूरहून अष्टविनायक, काशी, गया, प्रयाग, जगन्नाथपुरी या ठिकाणी यात्रा करीत पुण्याला परत आल्यावर प.पू.श्री गुळवणीमहाराजांनी त्यांना आणखी १२ वर्षे प्रसाद-वार्ता गुप्त ठेवून साधनेवर अधिक भर देण्यास सांगितले.

प. पू. मामांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. ह. भ. प.केशवराव देशमुख महाराजांनी केलेले ज्ञानेश्वरीचे तीन खंडांतील सुलभ ग्रंथ रूपांतर प. पू. मामांनी छापून प्रसिद्ध केले. तसेच हरिपाठ, अभंगमालिका, नारद भक्तिसूत्र, विवरण इत्यादी ग्रंथ प्रकाशित केले. ‘संतकृपा’ नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले. १९८३ मध्ये श्रीवामनराज प्रकाशन व श्री वामनराज त्रैमासिकाची सुरूवात केली. अनेक वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली व ‘श्री ज्ञानेश्वरी वाड्.मय अभ्यास मंडळ’ स्थापन करून ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. त्यांनी प. पू. श्री गुळवणी महाराजांच्या संमतीने इंग्लंडलाही ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली होती.
मामांचा पूर्णाकृती पुतळा मामांचा पूर्णाकृती पुतळा

त्यांनी १९७३ मध्ये ‘संप्रदाय सेवाकार्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करावे’ या प.पू. श्री गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार सिंहगड रस्त्यावरील हिंगंणे खुर्द येथे ‘माऊली’ आश्रमाची स्थापना केली. प.पू.मामांचा शक्तिपात योग संप्रदायाच्या सर्व १६४ प्रकारांचा सखोल अभ्यास व अधिकार होता. पुढे प.पू. मामांनी श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने कोयनानगरजवळील हेळवाक या गावी डोंगरावर भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. या समारंभानंतर मात्र प.पू.मामा निरवानिरवीची भाषी बोलू लागले. मंगळवार २१ मार्च १९९० रोजी त्यांनी योगमार्गाने देह सोडला. श्री स्वामी समर्थ व सद्गुरू मातृ:श्रीही त्यावेळी प्रकट झाले होते, अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे.

प. पू. मामांनी लावलेल्या या संप्रदायाच्या रोपटयाचे आता मोठया वृक्षात रूपांतर झाले आहे. ‘श्रीपाद सेवा मंडळ’ या ट्स्टच्या अंतर्गत अनेक प्रकल्प राबविले जातात. पुण्यात ‘श्रीसंत मामासाहेब देशपांडे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय’ व वामनराज प्रकाशन कार्यालये आहेत.
गुरुपरंपरा

श्री सद्गुरू मामासाहेब देशपांडे महाराजांपाशी दिव्य व श्रेष्ठ अशा अवतारी सद्गुरुंच्या चार शाखांचा सुरेख संगम होता.

प. पू . श्री ममांपर्यंत श्रीदत्त संप्रदायाच्या दोन शाखा येतात.  त्यापैकी श्रीदत्त संप्रदायाचा एक प्रवाह असा आहे;

भगवान श्रीदत्तात्रेय
  ।
भगवान श्रीमनृसिह सरस्वती स्वामी महाराज
  ।
प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज
  ।
प. पू . श्री दत्तोपंत देशपांडे महाराज, व प. पू . श्री गुळवणी महाराज
  ।
प. पू . श्री मामा देशपांडे
  ।
प. पू . सौ. शकुंतलाताई आगटे व प. पू . श्री शिरीषदादा कवडे

श्री दत्तसंप्रदायाकडून येणारा दुसरा प्रवाह असा आहे;

भगवान श्रीदत्तात्रेय
  ।
श्री अक्कलकोटस्वामी महाराज
  ।
प. पू . श्री नारायणभट्ट सोनटक्के महाराज
  ।
प. पू . मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे
  ।
प. पू . श्री मामा देशपांडे
  ।
प. पू . सौ. शकुंतलाताई आगटे व प. पू . श्री शिरीषदादा कवडे

प. पू . श्री मामांकडे श्री नाथ संप्रदायाची परंपरा आलेली होती. ती पुढीलप्रमाणे;

भगवान श्री आदिनाथ
  ।
श्री मत्स्येंद्रनाथ  महाराज
  ।
श्री गोरक्षनाथ महाराज
  ।
श्री गहिनीनाथ महाराज
  ।
श्री निवृत्तिनाथ महाराज
  ।
श्री ज्ञानेश्वर महाराज
  ।
प. पू . श्री मामा देशपांडे
  ।
प. पू . सौ. शकुंतलाताई आगटे व प. पू . श्री शिरीषदादा कवडे

प. पू . श्री मामांकडे शक्तिपात योग संप्रदायाचीही परंपरा आलेली होती. ती पुढीलप्रमाणे;

भगवान श्री आदिनाथ
  ।
प. प. श्री परमानंदतीर्थ स्वामी महाराज
  ।
प. प. श्री मुकुंदतीर्थ स्वामी महाराज
  ।
प. प. श्री गंगाधरतीर्थ स्वामी महाराज
  ।
प. प. श्री नारायणदेव तीर्थ स्वामी महाराज
  ।
प. प. श्री शंकर पुरुषोत्तमतीर्थ स्वामी महाराज
  ।
प. प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज
  ।
प. पू . श्री गुळवणी महाराज
  ।
प. पू . श्री मामा देशपांडे
  ।
प. पू . सौ. शकुंतलाताई आगटे व प. पू . श्री शिरीषदादा कवडे
प. पू. सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वाङ्मयातून संकलित केलेली काही बोधवचने.

१) मनुष्यजन्माला येऊन जर परमात्मतत्त्वाची ओळख झाली नाही, तर तो जन्म व्यर्थच होय. म्हणूनच लाभलेला हा जन्म व्यर्थ जाऊ नये यास्तव श्रीगुरुंची कृपा संपादन करावी व त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करावी. म्हणजे मनुष्यजन्माचे सार्थक झालेच म्हणून समजावे*

२) प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते?
सर्व सतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग, "संसार दु:खाचा असून तो सुखाचा आहे," असे वाटते हा आहे. रोग कळून आला पण औषध घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते, ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल ? संसार ज्याला दु:खाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग! एखादा दारु पिणारा मनुष्य दारुपायी आपले सर्वस्व घालवतो. दारुचा अंमल नसतो त्या वेळी तो शुध्दीवर येतो. आणि त्याला आपल्या बायको-मुलाची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुध्दीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन: इतकी दारु पितो की त्यात त्याला स्वत:चा विसर पडतो; आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वत:चा नाश करुन घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन: जोराने प्रपंच करु लागतो, आणि शेवटी हीन अवस्थेत मरुन जातो.

३) जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल; पण जो स्वत:चा घात करुन घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असूनसुध्दा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच! असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये ? याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे ; आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे, ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला. तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे.

४) जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.
श्री मामा देशपांडे व श्री गुळवणी महाराज श्री मामा देशपांडे,  प. पू. सद्गुरु श्री गुळवणी महाराज यांचे सोबत  
अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प. पू. श्री मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प. पू. श्री मामांचे मानसपुत्र श्री. नारायणराव पानसे यांनी आपल्या 'ब्रह्मानंद ओवरी' या ग्रंथात सांगितल्या आहेत. अतिशय भावपूर्ण आणि मनोहर हकिकतींनी सजलेला हा ग्रंथ सर्व सद्गुरुभक्तांसाठी अवश्यमेव वाचनीय व मननीय आहे. उदाहरण महणून त्यातली ही छोटीशीच हकिकत पाहा किती विचार करण्यासारखी व अनुकरणीय आहे.

महोत्सवाची आठवण सांगताना श्री. पानसे एका ठिकाणी लिहितात, "सत्कारासाठी व्यासपीठावर चढताना, प. पू. सद्गुरु श्री मामांनी व्यासपीठाला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केला. नंतर केव्हातरी प. पू. श्री मामांना मी त्यासंबंधी विचारले; तेव्हा ते म्हणाले, "अरे, त्याच व्यासपीठावर काही वर्षांपूर्वी प. पू. सद्गुरु श्री गुळवणी महाराज यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता!". वास्तविक पाहता ते नाट्यगृह होते आणि त्याचे व्यासपीठ हे काही आदराचे स्थान नाही. परंतु आपल्या श्रीगुरूंचा पावन पदस्पर्श ज्या व्यासपीठाला झालेला आहे, ते त्या स्पर्शाने पुण्यपावनच झालेले आहे; शिष्य म्हणून आपल्यासाठी ते सदैव वंदनीयच आहे; अशीच प. पू. श्री मामांची दृढ मनोधारणा होती. हृदयी वसणा-या त्या स्वाभाविक गुरुप्रेमानेच त्यांचे हात आपसूक जोडले गेले. किती दृढ आणि अलौकिक गुरुभक्ती आहे पाहा! तुम्हां आम्हां साधकांसाठी प. पू. श्री मामांनी फार मोठा आदर्शच येथे स्वत: आचरण करून घालून दिलेला आहे.

संदर्भग्रंथ: ब्रह्मानंद ओवरी, लेखक- नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे.
मामांचा अमृतबोध काय आहे ?

सामान्यपणे ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा म्हणतात. पण कानांच्या अकार्यक्षमतेपुरतेच हे बहिरेपण संतांना मात्र मान्य नाही. म्हणूनच संतांना अभिप्रेत असलेले व परमार्थाच्या दृष्टीने पाहिल्यावर जाणवणारे खरे बहिरेपण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "श्रीभगवंतांविषयी काहीही ऐकले की, या कानातून घेऊन त्या कानाने जे सोडून देतात, पण प्रपंचाविषयी गोष्ट आली की मात्र पक्की लक्षात ठेवतात, त्यांनाच संत 'बहिरे' म्हणतात."

प्रपंचाची तीव्र आवड व परमार्थाविषयी अनास्था असणाऱ्या बद्ध जीवांचे सगळे वागणे, प. पू. श्री. मामा इथे सांगतात त्या बहिरेपणामध्येच मोडते. लहान मूल जसे जेवायला-खायला, शिस्तीने वागायला कंटाळा करते; पण खेळायला मात्र केव्हाही एका पायावर तयार असते. तसेच या बहिऱ्यांचेही असते. कोणी परमार्थाचे काही सांगितले तर त्याकडे साफ दुर्लक्ष करतात, ऐकायचाही कंटाळा करतात, पण प्रपंचाची कोणतीही गोष्ट पक्की लक्षात ठेवतात, कितीही कष्ट पडले तरी जिवाच्या आकांताने धडपडून ती पूर्ण करतात.

अशाच बहिऱ्या लोकांची कीव येऊन दयाळू संत त्यांना सतत बोधामृत पाजून पाजून त्यांचे ते अयोग्य बहिरेपण नष्ट करीत असतात. कनवाळू संतांच्या त्याच जगावेगळ्या तळमळीचे एक साकार रूप म्हणजेच प. पू. श्री. मामांचा हा 'अमृतबोध' उपक्रम होय !
श्रीपाद सेवा मंडळ

श्रीगुरुकृपा, श्रीसंत मामासाहेब देशपांडे पथ, आनंदनगर, हिंगणे खुर्द, पुणे - ४११ ०५१.
फोन: ०२० २४३५३२७१ / २४३५१८४० / २४३५६९१९

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP