मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री गोपालदास महंत महाराज

श्री गोपालदास महंत महाराज

दत्त संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे.


श्री गोपालदास महंत महाराज श्री गोपालदास महंत महाराज

श्री गजानन महाराजांप्रमाणे श्री गोपालदास महंत कोठे जन्मले, कोठून आले ह्या विषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या बद्दल ही काही माहिती कोठेच सापडत नाही. नाशिक येथे गोदावरीच्या काठावरील भाटे ह्यांच्या धर्मशाळेच्या मागे अळवाची मोठी खाच होती. त्या खाचेतील चिखलात गोपालदास रात्रंदिवस पडलेले असत. त्या वेळेस लोकांना हे श्रेष्ठ योगी आहेत ही कल्पना नव्हती. तरी पण लोक त्यांना चिखलातून बाहेर काढीत असत. परंतु ते परत चिखलात जाऊन पडत रहात. असा प्रकार खूप दिवस चालला होता. ते काही खात पीत नसत व त्यांचा कोणत्याही प्रकारे कोणास त्रास नसे. त्यांना देहभान नव्हते व चिखलात पडलेले असतं. कधी त्यांच्या अंगाभोवती सर्प वेटोळे घालून बसलेले असत. ह्यामुळे लोक घाबरून त्यांच्या जवळ जात नसत. असे ३ वर्षे ते चिखलात पडून होते. त्यांचे श्रेष्ठत्व व हे सामान्य माणसांचे काम नाही हे लोकांना कळायला लागले होते. शेवटी नांदगावकर, दत्तोपंत चाफेकर व इतर काही लोकांनी त्यांना तेथून काढून काळाराम मंदिरात आणायचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे सर्वानी त्यांना त्या चिखलातून बाहेर काढले, गोदावरीच्या पाण्यानी त्यांना स्नान घातले व काळाराम मंदिरातील ओवरीत आणले. ते तेथे जे उभे राहिले ते तब्बल दीड वर्षे तसेच उभे राहिले. भक्तजन त्यांना नैवेद्य आणून देत पण त्याचा  काही उपयोग होत नसे. कारण ते काही खात पीत नसत. एवढेच काय पण त्या कडे बघत पण नसत. कोणी तोंडात घास घातल्यास ते तो थुंकून टाकत किंवा थोडासाच खात. दीड वर्षानंतर त्यांनी मंदिराच्या ओवरीतच बैठक मारली व धुनी ठेवली.

ऐकिले भक्तांचे वचन ।  गोपाळे  केले आसन ।
पेटविले धुनी साधन । निज सन्मुख ।
सदा  राहे अफाट वृत्ती ।  दिगंबर नग्न मूर्ती ।
परी कोणाही कष्ट ।  न देती योगेश्वर ।
सर्व तेथेच करती विधी । परी न सुटे दुर्गंधी ।
जे स्वयेंचि असे सुगन्धी ।  तेथे घाण केवी येई ।

गोपाळदासांचे इष्ट दैवत नृसिंह होते व ते सतत ह्याच नावाचा मंत्रोच्चार करीत असत. त्यामुळे लोक त्यांना नरसिंह महाराज म्हणीत. ह्या नावानेच ते नाशिक मध्ये ओळखले जातात. त्यांच्या ध्यान देवतेचे अधिष्ठान ते जेथे बसत असत तेथील खांबातच त्यांनी निश्चित केले होते व  ते त्या खांबास कोणास स्पर्श पण करून देत नसत. ह्यांना एक सवय होती ती म्हणजे गांजा ओढण्याची पण हे व्यसन नव्हते व ते त्याच्या आधीन नव्हते. ह्याबद्दल ते म्हणत ‘ये तो माप मापना है’ नंतर ते थोडे थोडे बोलू लागले. पण ते बोलणे सर्वांसाठी नसून ठराविक भक्तांसाठी असे. विशेष व्यक्तींशी ते रात्री बाराचे पुढे वेदांत धर्म इत्यादी विषयांवर चर्चा करत तेंव्हा त्यांचे ज्ञानाची लोकांस कल्पना येई. श्री माधवनाथ महाराज, श्री रामानंद बीडकर महाराज व साई चरित्र इत्यादी संतांच्या चरित्रात गोपाळदासांचा उल्लेख आहे. तसेच गजानन विजय ग्रंथात पण ह्यांचा उल्लेख आहे.

श्री साई चरित्रात ३३ व्या अध्यायात अशी गोष्ट आहे की कर्णिक नावाचा, डहाणू येथील एक भक्त, गुरुपौर्णिमा सन१९१७ रोजी शिर्डीस गेला श्री साई बाबांचे दर्शन घेऊन तो बाहेर पडला. तेंव्हा त्याचे मनात आले की आणखीन एक रुपया बाबांस अर्पण करावा. तो न करता तो भक्त आपल्या घरी डहाणू येथे जाताना नाशिकला काळाराम मंदिरात गेला व गोपालदास महाराजांचे दर्शन घेताच महाराज म्हणाले माझा राहिलेला रुपया दे. असा रीतीने श्री साई बाबानी तो रुपया घेऊन भक्ताची इच्छा पूर्ण केली. ह्या वरून हे कळते की सर्व संतांचा आपापसात कसा संवाद होता.

वाटले आणिक एक रुपया ।  वरती जाऊन बाबांशी द्यावा ।
तोच तो विचार लागला त्यागावा ।  रुपया ठेवावा तैसाच ।
ज्या गृहस्थे आज्ञा देवविली ।  त्यानेच वरून खूण केली ।
आता एकदा आज्ञा जाहली ।  पुढील पाऊली मार्गक्रमा ।
विश्वास ठेऊनिया सांकेति ।  कर्णिक तैसेचि पुढे निघती ।
उतरते झाले नाशिकवरती ।  मित्रसामवेति मार्गात ।
काळ्यारामाचे देवळात ।  कर्णिक जाती दर्शनास ।
नरसिंगमहाराज संत ।  दर्शन अवचित जाहले ।
भक्तपरिवार असता भोवती ।  महाराज अकस्मात उठती ।
कर्णिकांस मणिबंधी धरिती ।  रुपया म्हणती दे माझा ।
- साई चरित्र अध्याय ३३

एकदा श्री माधवनाथ महाराज श्री गोपालदास महंतांकडे गेले तेथे गेल्यावर त्यांनी त्यांच्याकडे पाहून आपले दंड थोपटले. ते पाहून गोपाळदासांनी आपल्या मांडीवर थाप मारली .त्यावर माधवनाथांनी तोंडाशी हात घेऊन मोठा ध्वनी  केला. तसेच गोपाळदासनी पण केले. अशा खुणा सामान्य माणसांच्या बुद्धीला समजणे शक्यच नाही ते फक्त संतच जाणतात. ह्याचे वर्णन श्री माधवनाथ महाराज चरित्रात असे वर्णन केले आहे

नाथ येता देखे दुरून ।  केले परमहंस हास्यवदन ।
हसतचि उभा राहून । मांडीवरी थाप ठोकली ।
नाथे ठोकिले निजदंड ।  केले एक निनाद ।
गोपालानेही तैसा स्वरभेद । केला  निजमुखे ।
झाला हाचि संवाद ।  हेचि ह्या संतांचे शब्द ।
ह्याचा अर्थ बहू गोड ।  संतचि जाणती ।
- श्री माधवनाथ चरित्र

साकोरी येथील हंसराज नावाचा एक भक्त दम्याच्या विकारांनी हैराण झाला होता व निपुत्रिक पण होता. तो महाराजांच्या दर्शनास काळाराम मंदिरात गेला तेंव्हा महाराज म्हणाले की तुला बाधा आहे व त्यासाठी तू शिर्डी येथे जा. श्री साई बाबा तुला दोन थोबाडीत मारतील व तुझे काम होईल. त्याप्रमाने हंसराज हे १९१६ मध्ये शिर्डीस गेले. श्री बाबास नमस्कार करताच श्री बाबानी ह्यास दोन थोबाडीत मारल्या व भूतास म्हणाले निघून जा. त्या दिवसापासून हंसराज ह्यांचा दमा कायमचा बरा झाला व त्यास यथावकाश पुत्रलाभ झाला.
श्री गोपालदास महंत महाराज समाधी नासिक श्री गोपालदास महंत महाराज समाधी, नासिक

तात्यासाहेब वाणवळे ह्यांना होशंगाबाद येथे त्यांच्या मुलीच्या घरी गोपालदास महाराजांना घेऊन जाण्याची इच्छा झाली. त्यांना नातू झाला होता व मुलीस महाराजांच्या दर्शनाची इच्छा झाली. पण गोपाळदासनी जाण्याचे नाकारले. शेवटी श्री माधवनाथांस मध्यस्थी घातले व दोन माणसे गोपालदास महाराजांना आणावयास गेली. त्यांना पाहून महाराजांनी उग्र रूप धारण केले व म्हणाले ‘नरसिंह अपना आसन छोडकर नही जाते. चले जावं. नही तो  दंडा मिलेगा’ तेंव्हा ती दोन माणसे पळून गेली. मग श्री माधवनाथांनी परत मध्यस्ती केली व निरोप पाठवला ‘आपके भाई कहते है नर्मदा माता बुलाती है’  मग आपली फाटकी गोधडी घेऊन व विजार घालून ते टांग्यात बसले.

श्री गोपालदास तसे नग्नच असत पण बाहेर जाताना तसे जात नसत. ते शांत वृत्तीने रेल्वेत बसले व मध्ये जळगाव येथे कर्डीले मामलेदार ह्यांचे कडे उतरले. तेथे जाताच अत्यन्त घाणेरड्या  नाल्याचे पाणी पिऊन ते पिशाच्च लीला करू लागले. त्यांना आणण्यास जे लोक गेले त्यांना पण पाण्याचा प्रसाद मिळाला पण ते पाणी नर्मदा जलसारखे गोड लागले. श्री माधवनाथ महाराज व गोपालदास ह्यांच्या भेटीचे बरेच उल्लेख सापडतात परंतु त्यांच्या बोलण्याची सांकेतिक भाषा इतरांस समजत नसे.

श्री बीडकर महाराज हे नाशिक येथे सून १९०८ मध्ये काळाराम मंदिरासमोरील दत्त मंदिरात ६ महिने राहिले होते. हे १०७ वर्ष जुने दत्त मंदिर पंचवटीत काळाराम मंदिराचे समोर आहे व श्री  बीडकर महाराजांनीच स्थापन केले आहे. जेंव्हा श्री बीडकर महाराजनचे भक्त गोपाळदासांचे दर्शनास गेले तेंव्हा ते म्हणाले सोने येथून तेथून सर्व सारखेच असते. अशा रीतीने गोपाळदासनी सांगितले की सर्व संत सारखेच असतात त्याची पडताळणी नको. श्री गजानन विजय ११ व्या अध्यायात श्री गजानन महाराज व गोपालदास ह्यांच्या भेटीचा उल्लेख असा वर्णन केला आहे

वंदिली माय निलंबिका । तेवी गहनीनाथ देखा ।
तेथुनि झाले नाशिका । गोपालदास भेटावया ।
हा गोपालदास महंत । काळ्यारामाच्या मंदिरात ।
धुनी लावूनी दारात । पंचवटीच्या दारात बसला असे ।
राम मंदिरासमोर एक । होता पिंपळाचा पार ।
शिष्यासहित साधूवर । तेथे जाऊनि बैसलें ।
गोपाळदासांस आनंद झाला ।  बोलले जवळच्या मंडळींना ।
आज माझा बंधू आला । वर्‍हाडातून गजानन ।

गोपालदास महंत हे फार उच्च कोटीतील संत होते. त्यांनी नाशिक येथे शुक्रवार माघ वद्य नवमी शके १८४१ रोजी आपले अवतार कार्य संपविले. श्री गोपालदास महाराजांची समाधी पंचवटी येथे गोदावरी नदीच्या काठी आहे. श्री महाराज ज्या ओवरीत दीड वर्षे उभे होते व नंतर धुनी लावून होते ती ओवरी काळाराम मंदिरात प्रवेश करताच उजव्या हातास आहे. येथे श्री महाराजांचा फोटो ठेवला आहे.

ह्या लेखातील माहिती ही श्रे विवेक वैद्य, पुनर्वसू प्रकाशन व संपादक स्वामीकृपा दिवाळी अंक ह्यांच्या श्री गजानन महाराज चरित्रकोश व श्री माधवनाथ महाराज ह्यांच्या चरित्रातून घेतली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP