मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री दीक्षित स्वामी

श्री दीक्षित स्वामी

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा इ.स.१८६६
आई/वडील: आईचे नाव ज्ञात नाही / वडील- लक्ष्मणशास्त्री
संन्यासानंतरचे नाव: नृसिंहसरस्वती
गुरू: प. प. वासुदेवानंद सरस्वती
कार्यकाळ: १८६६-१९२७
जन्म व कौटुंबीक पार्श्वभुमी

परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वतींचे अगणित महान व अधिकारी शिष्य झाले. त्यांत श्री दिक्षीतस्वामी तथा श्रीनृसिंह सरस्वतींचे नाव अत्यंत अग्रक्रमाने येते.

श्री गुरूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीपासून जवळच (शंकरापूर) नावाचे एक गाव वेदगंगा नदीचे तीरावर आहे. याच गावातील एक सत्शिल ब्राह्मण यज्ञयागांमुळे दिक्षीत नावाने प्रसिद्धीस आले. दत्तभक्ती घराण्यातच होती. त्याचे नृसिंहवाडीस पौर्णिमा व शनिवारी पायी येण्याचा नियम होता. कालांतराने शरीर वयोमान परत्वे क्षीण झाले. पण वारी चालूच होती. एकेदिवशी श्रीगुरूनी दर्शन देऊन नृसिंहवाडीला येण्याचे आता कष्ट करू नये याच स्वरूपात आपणास घरीच दर्शन होईल. या दिक्षीत ब्राह्मणाच्या मुलाचे नाव होते लक्ष्मणशास्त्री व त्यांचा लहान मुलाचे नारायण होय. पुढे जाऊन श्रीनृसिंह सरस्वती म्हणून प्रसिद्धी पावले. लक्ष्मणशास्त्री मुख्यत: भागवत कथन, पूजाअर्चा, व श्रीगुरूंच्या सेवेतच काळ घालवीत.

नारायण हा लहानपणापासून तल्लख बुद्धीमत्तेचा होता. एकपाठी होता. मिरजेत इंग्रजी शाळेत ५व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाहही पार पडला. पत्नीचे नाव वाराणसी होते. त्यांना पाश्र्चात्त्य पोशाखात विशेष रूची होती. एके दिवशी एका वृद्ध गृहस्थानी पोषाखाबद्दल नापसंती व्यक्त करून घराण्याच्या आदर्शाची आठवण करून दिली. व लक्ष्मण शास्त्रींचा दाखला दिला. नारायणावर त्यांचा सुप्त पण दूरगामी परिणाम झाला. त्यांनी विदेशी पेहराव व पुस्तके नाल्यात फेकून धोतर व शर्टसारखा देशी पोषाख घातला. पण नारायण खिन्न व एकाकी बसू लागला. पत्नीला हे परिवर्तन मान्य नव्हते. पण नारायणाने सर्वांकडे दूर्लक्ष केले. त्यांनी गीता एकनाथ भागवत वाचण्यास प्रारंभ केला.

त्यांच्या वाचनात वेदेश्र्वरीचे सार आले. हे जगत् मिथ्या आहे आणि फक्त ईश्र्वर सत्य आहे. जीवनातील सत्य जाणायचे असेल तर गुरूची कृपा व अनुग्रह आवश्यक आहे. ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबली व ते संसारात अत्यंत विरक्त होऊ लागले. एक दिवसाचा प्रसंग माता पिता व पत्नी बाहेरगावी गेल्याने भगिनी यमुनाने तुरईची भाजी केली. नारायणाने सर्व भाजी पुन्हा पुन्हा घेऊन संपवून टाकली. भाजीचे दोन तुकडे यमुनाने खाल्ले तर अत्यंत कडू होती. तिने नारायणाला विचारले तर उत्तर आले आपण कारल्याची भाजी खात नाही का? यात एवढे काय?

श्री लक्ष्मणशास्त्रींचा श्री वासुदेवानंद सरस्वतीशी घनिष्ठ परिचय होता. वाडी मुक्कामी त्यांची अनेक वेळेस भेट व बोलणेही झाले होते. श्री टेंबेस्वामींनी माणगाव सोडून सपत्निक नृसिंहवाडीस स्थलांतरानंतर श्री लक्ष्मणशास्त्री त्यांना भेटले व नारायणाला यथायोग्य मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बुवांनी ती मान्य केली आणि प. प. टेंबे स्वामींच्या रूपाने त्यांना गुरू मिळाले. नारायण गुरूसेवेत रुजू झाले. स्नान, संध्या वैश्र्वदेव स्मर्ताग्नीसह सर्व ब्रह्मकर्म करू लागले. त्यांनी गुरु सान्निध्यात उपनिषद, जीवनमुक्ती विवेक यांचा अभ्यास केला. पण सर्व वेदांताचे सार दोन शब्दात सांगितले ते म्हणजे ‘दत्त’. त्यानंतर टेंबेस्वामींनी संन्यास घेतला व नारायणाने आदर्श गृहस्थाश्रम आरंभला. अतिथीपूजा अन्नसंतर्पण रोज होत होते. ते रोज ५ घरी जाऊन शुष्क भिक्षा मागत प्रथमत: त्यांच्याच गावी खूप उपहास झाला. पण कालांतराने लोक त्यांच्या भिक्षेला येण्याची प्रतिक्षा करू लागले. त्यांनी अन्न संतर्पण, यज्ञ, दान याच्यावर जादा खर्च सुरू केला. बरेच लोक त्यांच्याकडे शास्त्रार्थ समजून घेण्यासाठी येऊ लागले व काही लोक तर त्यांना छोटे टेंबे स्वामी म्हणू लागले.

एकदा गावात प्लेगची मोठी साथ आली. त्यात पत्नी व एकुलता एक मुलगा मरण पावला. नारायणालाही प्लेगची लागण झाली. दत्तगुरूंची इच्छा काही औरच होती. नारायण बरे झाले. पत्नीची अत्येष्ठी करून लगेचच त्यांनी कुरुंदवाडचे वैदीक ब्राह्मणाकडून संन्यास ग्रहण केला ते नारायणस्वामी झाले. संन्यास ग्रहणानंतर गुरू श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या सानिद्ध्यात काळ व्यतीत करण्याची इच्छा होती. पण आपण वाडी सोडू नये असा वासुदेवानंद सरस्वतींचा आदेश आला. नारायण स्वामींचा संन्यास झाला होता पण दंडग्रहण झाले नव्हते. तेही वासुदेवानंद सरस्वतींकडून व्हावे ही गुरुचरणी प्रार्थना होती. त्यासाठीही आदेश आला "मी वाडीस आल्यावर पाहू" पूर्ण १७ वर्षानंतर थोरल्या महाराजांचे वाडीत आगमन झाले. तर त्यांनी सांगितले ‘दत्त महाराज म्हणाले तरच मी दंड देईन’ नारायण स्वामी दु:खी व व्यतीत झाले. तसे पाहिले तर नारायण त्यांचे ज्येष्ठ मानसपूत्र होते. श्री गुरुंच्या आज्ञेनेच नारायणस्वामींना दंड दिला व ते ‘नृसिंहसरस्वती’ झाले.

थोरले स्वामी म्हणजे वैराग्याची परमसीमा. देहबुद्धीच नष्ट झालेली. अनेक पुजारी भक्तजन जे गरुडेश्र्वरी जात त्यांना थोरले महाराज सांगत ‘श्री दिक्षीत स्वामींच्या आज्ञेचे पालन करा’ थोरल्या महाराजांच्या समाधीनंतर आपल्या गुरूचे एक मंदिर व्हावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पाचवा आश्रम स्वीकारून अवधूत झाले. त्यांनी औरवाडला श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ स्थापन केले.
datta-mandir-amareshwar श्री क्षेत्र अमरेश्वर

तेथे थोरल्या महाराजांच्या पादुका स्थापन करून पूजाअर्चा सुरू झाली. त्यांनी हजारो भक्तांच्या समस्या सोडवल्या. त्यांना आध्यात्मिक व भौतिकही मार्गदर्शन केले. त्यांनी गरुडेश्र्वर नासिक, विदर्भ, अलाहाबाद, काशी येथे दौरा केला. पण ते गुरूची महतीच वाढविण्यात उत्सुक होते. त्यामुळे थोड्याच दिवसात अयोध्येत जाऊन राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथेच ते अश्र्विन वद्य ७ शके १९२७मध्ये दत्तचरनी विलीन झाले.

थोरल्या महाराजांनी लहान वयापासून मार्गदर्शन करून नारायणाचे- नारायणस्वामी- व नंतर नृसिंहसरस्वती केले. याला कारण दिक्षीत स्वामींची निष्ठा आणि गुरूप्रेम. नृसिंह सरस्वती म्हणजे मूर्तीमंत गुरूनिष्ठा, उत्कठ, भावभक्ती, असलेले एक महान सिद्धयोगी. त्यांनी भक्तांसाठी अनेक चमत्कार दाखविले. पण ते त्यात कधीच अडकले नाही.

एक महान दत्तभक्त सिद्ध पुरूषाचे चरणी प्रणाम!
आपल्या सद्गुरूंबद्दल प्रेम कसे असावे याचे मूर्तिमंत आदर्श....दीक्षित स्वामी व थोरले महाराज

प. प. श्री दीक्षितस्वामी महाराज, हे प. प .श्री टेंब्येस्वामी महाराजांचे पट्टशिष्य. प. प. श्री टेंब्येस्वामी महाराज, शेवटच्या दिवसांत श्रीक्षेत्र गरुडेश्वरी मुक्कामाला होते. गरुडेश्वरी जाण्याच्या अगोदर, श्रीक्षेत्र वाडीला असताना! त्यांनी श्रीदीक्षितस्वामींना आपल्या पादुका दिल्या होत्या. आजही त्या पादुका वासुदेवानंद पीठांत श्री दत्तअमरेश्वर मंदिरांत पूजेंत आहेत. प. प. श्री दीक्षितस्वामी त्यांची अनन्यभावे पूजा करीत. पुढे, गरुडेश्वरला श्रीटेंबेस्वामी महाराजांची तब्बेत जेव्हा बिघडली, तेव्हा श्रीदीक्षितस्वामी निरनिराळे काढे, मात्रा, त्या पादुकांवर घालीत असत. एक भक्त अमरेश्वराहून गरुडेश्वरी गेले, तेव्हा त्यांनी श्रीटेंब्येस्वामी महाराजांच्या कानी ही गोष्ट घातली. श्रीस्वामी महाराजांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी त्या भक्ताजवळ निरोप दिला;  

"त्यांना सांगा, तुम्ही इतके दिवस केलेल्या या अपूर्व सेवेमुळेच आमचे आयुष्य एक महिनाभर अधिक वाढलेले आहे. आता मात्र देवांची आज्ञा झाली आहे, तेव्हा देह सोडणे प्राप्त आहे. म्हणून आता ही सेवा पुरे करावी!"

हा निरोप ऐकून, प.प.श्री दीक्षितस्वामी महाराजांनी पादुकांवर काढे घालणे बंद केले.

 गरुडेश्वरी औषधोपचार चालू नसताना देखील श्री टेंबेस्वामी महाराजांची तब्बेत ठीक राहू शकली होती, याचे रहस्य हे असे होते.
dikshir swami श्रीनृसिंहसरस्वती दिक्षितस्वामीं
 
श्रीनृसिंहसरस्वती दिक्षितस्वामीं व थोरले महाराज

एकदा दिक्षितस्वामीनी पत्रद्वारें विचारलें की, "माझ्या मनात शुक्लवृति घारण करावी असें आहे. वडिलार्जित अन्न सेवूं नये असें वाटते. कसें करु ? आपली आज्ञा होईल त्याप्रमाणे करीन." यावर वासुदेवानंदसरस्वतींनीं असें उत्तर दिलें की, "आपली इच्छा चांगलीच आहे. शुक्लवृति घरायला आमची परवानगी आहे. पण भिक्षा मागूं लागल्यानंतर ग्रामस्थ मंडळी तुम्हांला हंसतील. तें सहन करण्याची ताकद असेल तर शुक्लवृती घरावी. जे प्रथम हांसतील तेच लोक पुढें स्तुतिहि करतील. दोन्ही समानच मानावीं किंवा निंदा ही सुघाच होय व स्तुति हे विषच होय असें समजून स्वहिताला लागावयाचें  घैर्य असल्यास इच्छेप्रमाणें करा. आमचा पूर्ण आशिर्वाद आहे." याप्रमाणें उत्तर खंडांतून  वासूदेवमहाराजांचे उत्तर दिक्षितस्वामींला आले. तें वाचून त्यांच्या ह्रदयांत आनंद मावेना. आपल्या इच्छेनुरुपच महाराजांनी उत्तर धाडलें असें ते म्हणाले व वाराणशीला म्हणजे आपल्या पत्नीला त्यांनी आपला विचार कळविला. उघांपासून आम्ही जें घान्य आणून देऊं त्याचाच स्वयंपाक करावयाचा. घरांतल्या तांदुळांचा भात करूं नको असें तिला त्यांनीं सांगून ठेवले.
थोरल्या स्वामी महाराजांचे एकनिष्ठ शिष्य

सदलगा येथील दीक्षित हे फार मोठे दत्त भक्त होते. नृसिंहवाडीला नित्य दत्त महाराजांच्या दर्शनाला जाणे आणि जमेल तितकी सेवा करणे हे व्रत त्यांनी कायम जपले. नृसिंहवाडीस जावे, देवाच्या मनोहर पादुकांसमोर स्नान करावे , श्रींच्या पादुकांवर भक्तिभावाने पाणी घालावे, त्रिकाल दत्त महाराजांच्या पूजेचे वेळी उपस्थित राहावे आदी सेवा ते करीत असत. काळ न थांबता मार्गक्रमण करीत असल्याने वृद्धावस्था आली. त्याकाळी पायी प्रवास असल्याने नृसिंहवाडी प्रवासात अत्यंत कष्ट होऊ लागले. मात्र दत्त महाराजांनी आपल्याला निजरुपात दर्शन द्यावे हि मनात आस कायम होती. आणखी काही काळ गेल्यावर मात्र नृसिंहवाडीला येणे कठीण होऊ लागले. एकदा संगमावर अत्यंत काकुळतीने दीक्षितांनी दत्त महाराजांची आळवणी केली अहो महाराज एकदा तरी दर्शन द्या !

दयाघन दत्त महाराज ह्या हाकेला धावून येत तिथे अवतीर्ण झाले. षडभुज, एकमुखी. खालील हातात माला, कमंडलू , मधल्या हातात डमरू, त्रिशूल आणि वरील हातात शंख आणि चक्र, अंगावर छाटी, आणि कमरेला लंगोटी नेसली होती. इंद्रनील मण्याप्रमाणे काया, आणि डोक्यावर जटाजूट असे ते उभे होते. सुहास्य मुद्रेने ते दीक्षितांकडे पाहत होते. महाराजांचे रूप पाहून दीक्षितांनी पायावर लोळण घेतली. तोंडातून शब्द फुटेना. तेव्हा हि अवस्था पाहून महाराज म्हणाले काय अभिष्ट आहे ? पण दीक्षितांच्या तोंडून शब्द काही फुटला नाही तेव्हा दत्त महाराजांनी जवळ येऊन कुरवाळले आणि म्हणाले, मी तुझ्या कुळात मनुष्य रूपाने अवतार धारण करेन. यापुढे नृसिंहवाडीस येण्याचे कष्ट घेऊ नयेत. असे म्हणून दत्त महाराजांनी श्रीकृष्णामाईतील तीन गोटे घेतले आणि हे माझे रूप आहे हे समजून ह्याची स्थापना करावी आणि पूजन करावे, ते गोटे दीक्षितांच्या हातात ठेऊन दत्त महाराज अंतर्धान पावले. आणि थोड्या वेळाने दीक्षित भानावर आले. अत्यंत आनंदाने ते सदलग्याला जाऊन त्यांनी ह्या त्रिमूर्तीची स्थापना केली.

काही काळाने लक्ष्मणशास्त्री दीक्षित हे नृसिंहवाडी येथे कायमस्वरूपी राहावयास आले. अहिल्यादेवी आणि लक्ष्मणशास्त्री यांच्या पोटी दत्त महाराजांनी घेतलेला जन्म म्हणजेच नारायण दीक्षित अर्थात दीक्षित स्वामी महाराज होत. (जन्म शके १७८८ अर्थात इ स १८६६ साल, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुपारी बारा वाजता) जन्मलेल्या बालकाचे नामकरण नारायण असे केले. कालौघात उपनयन संस्कार आणि नंतर लोकव्यवहार आणि शास्त्राज्ञेकरिता नारायण शास्त्र्यांनी विवाह केला. काही काळ गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर नारायण दीक्षितांची भार्या अनंतात विलीन झाली आणि नंतर थोरल्या महाराजांच्या हस्ते नारायण दीक्षित अर्थात दीक्षित स्वामी महाराजांनी संन्यासाश्रम स्वीकारला.

दीक्षित स्वामी महाराजांनी अयोध्या येथे समाधी घेतली, या समाधी काळापर्यंत त्यांनी अमरेश्वर जीर्णोद्धार आणि तीर्थयात्रा केल्या. बापूशास्त्री कोडणीकर यांनी त्यांची केलेली चरित्र रचना अत्यंत माधुर्यपूर्ण असून संस्कृत येत नसलेल्यानी केवळ अर्थ वाचला तरी हे माधुर्य लक्षात येईल.

दत्त भक्तीचे एक वैशिष्ठ्य म्हणजे हि परंपरेने खालील वंशात पाझरते. प्रत्येक अवतारी पुरुषामागे त्याच्या पूर्वजांची फार मोठी सेवा हि अवताराला कारण ठरते.
प. पू. योगीराज श्रीगुळवणी महाराज व प. पू. श्रीमन्नृसिंह सरस्वती दीक्षितमहाराज .

कथन- गुळवणी महाराज

दीक्षितस्वामी म्हणजे भव्य पुरुष. वयाच्या ६० ला सुद्धा चेहऱ्यावर सुरकुती नव्हती. कधी थकलेले नसायचे. नेहमी आनंदी. त्यांचा भागवताचा एकादश स्कंद मी ऐकला आहे. वाडीच्या अनुष्ठानात दिक्षित स्वामींनी मला संकल्प सांगितला आहे. हुशंगाबादेला खर्रा घाटावर सीताराम महाराजांनी आश्रम बांधला. तेथे माझी व दीक्षितस्वामींची भेट झाली आहे.

श्रीदत्तात्रेयांचा सिद्धासनातील जो फोटो आहे त्याचे पहिले चित्र मी दीक्षितस्वामींच्या सांगण्यावरून काढले. ते पहिले चित्र दीक्षितस्वामींनी पूजेत ठेवले होते. त्याचे नंतर अनेक फोटो निघाले. त्या फोटोवरून तर औखाडच्या आश्रमातील श्रीदत्तात्रेयांची सिद्धासनातील मूर्ती काळ्या दगडात कोरून तयार केली आहे. ते मूळचे चित्र नंतर कोल्हापूरच्या कडेकरांकडे गेले. याचे लहान मोठे फोटो स्वतः दीक्षितस्वामींनी अनेकांना प्रसाद म्हणून वाटले आहेत.

दीक्षितस्वामींच्या आज्ञेवरून श्रीदत्तात्रेय षोडश अवतारांपैकी, सिद्धराज, अत्रीवरद, कालाग्निशमन, मायायुक्त, अवधूत, आदिगुरु ही सहा चित्रे आणि श्रीलक्ष्मीनृसिंहाचे चित्र अशी सात चित्रे तयार करून घेतली.

दीक्षितस्वामींनी औरवाड उर्फ अमरापूर येथे 'श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ' नावाची एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये पं.श्री. दत्तमहाराज कवीश्वर, श्री. भिर्डीकर, श्री. कडेकर, श्री. गणपतराव सातारकर, श्री.अण्णासाहेब कुलकर्णी आदींची सेवा रुजू आहे. 'गुरुशिष्य पंचायतन' हे चित्रही वामनरावांनी रंगीत छापून प्रसिद्ध केले.

श्री. दीक्षितस्वामींचे महानिर्वाण अयोध्या येथे अश्विन व.॥ ७ इ.स.१९२७ मध्ये झाले.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP