मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें

ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: नृसिहवाडी येथे १८९९.
आई/वडील: सौ सरस्वती/नारायण दत्तात्रय पुजारी
गुरु/अनुग्रह: श्री वासुदेवानंद सरस्वती
जन्म व बालपण

कै. ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री यांचा जन्म पवित्रतम् नृसिंह वाडी येथे इ. स. १८९९ मध्ये एक अतिशय धार्मिक व वैदिक कुटुंबात झाला. कर्मठ दाम्पत्य श्री नारायण पुजारी व सरस्वती पुजारी हे दाम्पत्य श्री क्षेत्री वास्तव्यास होते. त्यांचे परिवारात दत्तभक्ती होती. श्रद्धेपोटी त्यांनी गुरुचारित्राच्या ४ पोथ्या लिहून काढल्या होत्या. वेदमूर्ती आत्मारामशास्त्री लहानपणीच खूप काटक व व्रात्य होते. शरीर यष्टी सदृढ व पोहण्यात पटाईत होते. उपनयानानंतर घरच्या परंपरे नुसार वाडीचे दामले शास्त्री व सांगलीचे केळकरशास्त्री यांचे कडून ऋग्वेदाची संथा घेतली. वेदाध्य।यन पूर्ण केले. त्यांची पठणशक्ती विलक्षण होती. संथा घेते समयी बाकी विद्यार्थी घोकायचे हे फक्त ऐकायचे परंतु नंतर ते संपूर्ण पाठ मुखोद्गत म्हणून दाखवीत आसत. कर्नाटकातील रामदुर्ग येथील जेरेस्वामी म्हणजे सातारचे शंकराचार्य यांच्यासह त्यांनी संस्कृत काव्यादी साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला.

पुढील शिक्षणास पैशाची व्यवस्था नव्हती. आई कडून ५ रुपये घेऊन अत्येभाऊ श्री घोरपडे, मामलेदार यांचेकडून हि आर्थिक मदत घेऊन ते काशी क्षेत्री सांगवेद विद्यालयात दिगंत कीर्ती असलेले नाय्यायिक वे. मु. वामाचरण भट्टाचार्य यांचेकडे न्याय व वेदांताचे शिक्षण घेतले. आत्माराम शास्त्री पहाटे ३ वाजता उठत गंगा स्नान करून तेथेच सकाळी सहा पर्यंत अनुष्ठान करीत. नंतर ६नंतर पाठशाळेत जात असत. माधुकरी मागीत नंतर काही पाठ व संध्याकाळी दुग्धपान करीत. आर्थिक परिस्थिती नसल्याने ते दुग्धपान  न करता दर्शनास जाणे पसंत केले. वाडीतून पत्र आले आणि ते परतले. पितृअज्ञा शिरसावंद्य  दुसरे काय !

काशीत असताना ते संध्येचे पाणी न टाकता एक बाई कडकड करीत असे. पण त्यांनी केव्हाही दुरोत्तर केले नाही. फक्त सांगितले मी पाणी टाकत नाही. खरे काय ते समजल्यावर ती बाई खूप रडली. खरोखरच शास्त्रीबुवा अत्यंत साधे एकमार्गी व ते कोणासही दुखवित नसत. काशीला  माधुकरी मागताना लागलाग झाली तर शास्त्रीबुवा माधुकरी गंगेस अर्पण करून चणे फुटाणे खाऊन दिवस काढीत असत. त्यांचे गुरुजी तर त्यांना म्हणत "ये बहुत होशीयार है" वाडीस आल्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य यांचे संचारात जगदीशी व गादाधरी पूर्वोत्तर वादग्रंथाचे व न्याय भाष्यदिकांचे आणि अद्वैतसिद्धादि वेदांतवाद ग्रंथाचे अध्यापन केले.
अध्यापन व ग्रंथ लेखन

पुढे अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान मंदिरात प्राध्यापक म्हणून वे. शा. सं. आत्माराम  शास्त्रींची निवड झाली मुलाखत घेणारे होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. नोकरी मिळत नसताना त्यांनी टेम्बे स्वामींच्या स्तोत्राचे अखंड अनुष्ठान चालू केले. तेव्हा प. प. शांतानंद स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितले तझ्यासाठी अमळनेर येथे तत्वज्ञान विद्यापीठात  जागा ठेवली आहे. त्यांना वाडी सोडून जायचे नव्हते पण जावे लागले. या तत्वज्ञान मंदिरात दरवर्षी ६ विद्वान पी. एच. डी. साठी येत असत त्यांना शास्त्रीबुवा मार्गदर्शन करीत. येथे येणारा विद्वान वर्ग शास्त्रीबुवाना मानु लागला. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक श्री मलकांनी, बॅनर्स विद्यापीठाचे श्री त्रिपाठी, पुणे विद्यापीठाचे श्री बरलिंगे, कलकत्त्याच्या घोष, श्री अत्रे श्री फडके, श्री पिंगळे यांचा समावेश होता. तत्वज्ञान मंदिरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, गुरुदेव  रानडे, इ. थोर तत्वज्ञ होऊन गेले. त्यांचे बरोबर चर्चा होई. तत्वज्ञान मंदिरातील मासिकात त्यांनी विपुल लिखाण केले. तसेच स्वराज सिद्धी  ग्रंथाचे भाषांतरही केले. त्यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय तेजस्वी होते. ते गोरेपान होते चालण्यात अतिशय चपळ होते. वेष नेहमी धोतर उपरणे असे. गावास जाताना कोट टोपी किंवा कोट व डोक्यास रुमाल असे. ते प्रेमळ, सात्विक व मितभाशी होते. आपुलकीने व प्रेमाने ते चौकशी करून मार्गदर्शन करीत. गीतेतील १२ व्या अध्यायातील सर्व गुण त्यांच्यात सामावलेले होते. संत एकनाथ महाराजांप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांची पावले गुलाबी वाटत. अंतर्ज्ञानी व ब्रम्हनिष्ठ व वेद, न्याय, वेदान्त, मीमांसा, इ. शडशास्त्रें, पुराण इत्यादींमध्ये प्रखर पांडित्य असलेले भारतातील सहा पंडितांपैकी ते एक होते.

पहाटे लवकर उठून काकड आरती, भूपाळ्या, पूजा, गुरुचरित्रा च्या १००० ओव्या, सूर्यनमस्कार, सूर्याकडे एकटक पाहत उपासना त्यांनी केली. दररोज रात्री भगवतगीता,रामायण वाचन केले. त्यांची भागवताची ११७ पारायणे झाली होती.

अमळनेर येथे विद्वान माणसे येऊन राहून जेवून शिकत असत. शास्त्री बुव।कडे रोज २५ लोक जेवणास असत. त्यांचा पगार १५० रु. होता घराचा खर्च २५ रुपयात भागवून १२५ रुपये ते वाडीस पाठवित. श्री करमलकर, नारायणानंद सरस्वती, यति महाराज, शिरोलकर महाराज यांनीही तेथे राहून वेदांताचा अभ्यास केला होता. त्यांनी कधीच कोणासही दुखावले नाही. ते प्राणिमात्रांवर प्रेम व दया करीत. शास्त्रीबुवांची पितृभक्ती पराकोटीची होती. वडीलांसमोर ते कधीही बसत नसत. एखादी चर्चा सुरु असेल तर वेळप्रसंगी २-२ तास उभे राहून वडिलांशी चर्चा करीत. दातृत्वामुळे शास्त्री बुवांच्या दाराशी आलेला अतिथी किंवा भिकारी कधीही विन्मुख जात नसे. शास्त्री बुआ आपल्या उत्कट भक्तीच्या बळावर वाडीला प्रत्यक्ष नरसिह सरस्वतींशी संवाद केला. अनुष्ठानात काटेकोर पणा व शिस्त होती. अमलनेरला पं. राजेश्वर शास्त्री द्रविड, दत्ता शास्त्री कविश्वर अशी मोठी माणसे येऊन गेली. पुढे तत्वज्ञान मंदिर बंद झाले. फलटण, पुणे येथे भागवत सप्ताह केले. श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांचेकडे ७-८ वर्षे शिकवीत असत. प. प. गुळवणी महाराज मुंबईत गेल्यावर शास्त्री बुआ कडे रहात. दोघात रात्री १० ते १ अध्यात्मिक चर्चा होत असे. कदाचित दोघेही एकरूप होऊन ब्राम्हस्वरूप होत असावेत. ठाण्यात त्यांचेकडे किशोरजी व्यास, गौतम शास्त्री, प्रा. निगळजी श्री जोशी इ. विद्यार्थी एम्. ए. तत्वज्ञान शिकण्यास होते. झाला महार पंढरीनाथ हे पद म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. गोविद गिरीजी महाराज सांगतात प्रथम शास्त्री बुआ व माझी मते भिन्न होती. शास्त्री बुआ म्हणाले आपण "दत्त माहात्म्य" तीन वेळा वाचणे. त्यांनी ते वाचले व त्यांचे मत परिवर्तन  झाले.

अमळनेर हुन सुट्टी लागल्यावर ते वाडीत येत असत.पहाटे३वाजता उठून देवाकडे जात. स्नान संध्या कर्मेकरून देवापुढे तल्लीन होऊन भूपाळ्या म्हणत. देवाला पाणी घालून स्वारीला गंध फुल वाहून मंडपात एकादशनी इ. अनुष्ठाने झाल्यावर सोवळ्याच्या माडीत जाऊन उपासना, जप, पोथी वाचन करीत. दुपारी वैश्वदेव, भोजन, विश्रांती झाली की दुपारी ३ वाजता पवामान सेवेसाठी मंदिरात येत. ते अतिशय गोड आवाजात पदे म्हणत.

वाडीतील पुजाऱ्यांचे बाबत त्यांच्या मनात अतीव प्रेम होते. कायम भोजनाचे वेळी वाडीत पुजारी काय करीत असतील असा विषय होई. गुळवणी महाराज व शास्त्रीबुआ याच्यात घनिष्ट व अत्यंत प्रेमाचे संबंध होते. प. प. गुळवणी महाराज आले की त्यांची शिष्य मंडळीही येत. त्यात शंका निरसन असे. इतर भक्तांनाही या दोन महापुरुषांमधील चर्चेतून अगाध ज्ञान मिळे. शास्त्री बुआ म्हणत 'परमेश्वराला नमस्कार करताना मी तुझा आहे, तू माझा आहेस व मी व  तू एकच आहोत अशा भावनेने नमस्कार करायला पाहिजे असे म्हणत. वाडीच्या मंदिराच्या जीर्णोद्धार हाच दोघांचाही ध्यास होता. दिवाळीची सुट्टी व गुरुद्वादशी शास्त्री बुआनि कधीही चुकविली नाही. असे साधारणतः ४ महिने ते वाडीत असत. परत जाण्याच्या अधले दिवशी हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हे पद ते म्हणत. इतरांना समजे शास्त्री बुआ आता उद्या जाणार. इतका वागण्यात शिस्तबद्धता होती. प्रवचनात अवघड विषय सोपा करून सांगण्याची त्यांची हातोटी होती. त्यांना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून अनुग्रह मिळालेला होता. गुळवणी महाराजांचे बरोबर श्री रंग अवधुत स्वामीना भेटण्याचा योग् आला तेव्हा नागेश्वर मंदिरातील तळघरात रंग अवधूतानी आपले सर्व चरित्र त्यांना सांगितले.

गुळवणी महाराजांनी थोरल्या स्वामी महाराजांची अनेक स्तोत्रे ग्रंथ यांची भाषांतरे केली. नारायण स्वामींचे चारित्रही त्यांचेकडून लिहून घेऊन प्रसिद्धही केले. दत्तमहाराज कविश्वर यांचाही त्यांचा घनिष्ट संबंध होता. त्यांनी मोजकेच ग्रन्थ लिहिले पण विषय आकाशाला गवसणी घालणारे होते. त्यांनी न्याय शास्त्रातील मुक्तवली ग्रंथाचे संशोधन केले. वेदातील स्वराजसिद्धीचे भाषांतर केले. वृद्धाशिक्षा ग्रांथाचेही भाषांतर केले. काव्य रचना, संस्कृत व मराठीपदे, भूपाळ्या व आरत्या लिहिल्या.

सदा प्रसन्न व्यक्तिमत्व, हसरी मूर्ती व विनोदी होते. शंकराचार्यांनी त्यांना विद्या वाचस्पती अशी पदवी देऊन गौरविले. आत्माराम शास्त्रींची भगवंतावर निस्सीम श्रद्धा होती एकदा ठाण्यात असंताना रात्री दिड पावणेदोनच्या सुमारास भागवतातील दशम स्कंधातील एक श्लोक ऐकला. दरवाजा उघडला तर मोरपीसधारी श्रीकृष्णाची मनमोहक छबी दिसली. साक्षात दर्शनाने शास्त्री बुआ सुखावले.

पुढे त्यांच्या शरीरावर सात पदरी गळू झाले शस्त्रक्रियाही झाली. पण ११-६-१९७३ ला त्यांनी आपला देह दत्तचरणी विलीन केला.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP