मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी

श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


नाव: श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी                                               
जन्म: १९ मार्च १९२० इनेमेटे, चिपळूण       
मृत्यू:  १२ ऑक्टोबर २०११
आई / वडील: सौ. लक्ष्मीबाई व विष्णुपंत
स्वामीसुत श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी स्वामीसुत श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी

श्री कान्हेरे गुरुजी १९ व्या शतकात होऊन गेलेल्या अनेक विभूतींपैकी, अपरिचित असे अजून एक सत्पुरुष. या महान विभूतीविषयी परिचय.

कान्हेरे घराण्यातील मूळ पुरुष श्री गोविंदपंत कान्हेरे, मूळ गाव कोकणातील परशुरामाजवळील एनेमेटे गाव ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी कोकण. श्री कान्हेरे गुरुजींचा जन्म १९ मार्च १९२० रोजी सौ लक्ष्मी बाई आणि श्री विष्णूपंत या दाम्पत्याच्या पोटी अंबरनाथ(ठाणे) येथे रेल्वे क्वार्टर मध्ये झाला. श्री गुरुजींचे वडील विष्णुपंत जी.आय.पी. रेल्वेत स्टेशन मास्तर होते तसेच वर्ध्यास तार मास्तर होते, कान्हेरे घराण्याला सुरुवातीपासूनच धार्मिक वारसा होता, आणि गुरुजींच्या येण्याने त्यात आणखीन एक मोती ओवला गेला. सत्पुरुषांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात हे आपण अनेक संतांच्या चरित्रातून वाचतो. कान्हेरे गुरुजी याला अपवाद नव्हते, अवघे वय दीड वर्षांचे असताना त्यांना मातृवियोग सोसावा लागला. त्यानंतर गुरुजींची बहीण बबूताई यांनी त्यांना सांभाळले. वयाच्या आठव्या वर्षी श्री गुरुजींची मुंज झाली आणि त्यानंतर ते आपल्या बहिणीकडे गेले. मुंजीनंतर श्री गुरुजींचे वडील विष्णूपंत यांनी सन्यास स्वीकारला. त्यानंतर त्यांना श्री गोविंदानंद सरस्वती नावाने ओळखले जाई.

श्री अक्कलकोट स्वामींच्या पट्टशिष्यांपैकी श्री सच्चीदानंद स्वामी (मौनी स्वामी) हे श्री गुरुजींचे काका. त्याकाळच्या अनेक सिद्ध विभूतींनी मौनी स्वामींचा गौरवोद्गार केला आहे यात श्री टेम्भे स्वामींचे नाव अग्रणी घ्यावे लागेल. श्रीगुरुकथांक हे सविस्तर चरित्र मौनी स्वामींचे लिहिले गेले आहे. कान्हेरे घराण्याला किती दिव्य अध्यात्मिक वारसा लाभला होता, जो श्री मौनी स्वामी, श्री विष्णुपंत आणि श्री गुरुजींच्या माध्यमाने समजून येतो.

श्री कान्हेरे गुरुजींचे वास्तव्य काही काळ विजय चित्रमंदिर लक्ष्मी रोड येथे कान्हेरे फोटो स्टुडिओ मध्ये होते. व्यायामाची त्यांना आवड होती, गुरुजींची तब्येत  तरुणपणात भारदस्त होती, श्री गुरुजी ब्रम्हचारी होते. ते उत्तम तबला वादक आणि मसाजपटू होते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी व त्याकाळच्या अनेक गायकांच्या मैफिलीत तबल्याची साथ दिली.
श्री कान्हेरे गुरुजींची गुरुपरंपरा, त्यांची शिकवण याचा मागोवा

श्री कान्हेरे गुरुजींना श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचा प्रत्यक्ष अनुग्रह होता. ज्याप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी पट्टशिष्य कल्याण स्वामींना आणि अलीकडच्या काळात होऊन गेलेले महान संत श्री श्रीधर स्वामी यांना समाधीतून येऊन दर्शन दिले त्याचप्रमाणे सन १९४२ ला डेक्कन जिमखाना येथे श्री गुरुजी काही काळ वास्तव्यास असताना, एके दिवशी  स्वामी समर्थ प्रकटले आणि श्री गुरुजींना अनुग्रहित करून त्यांचे जीवन कृतकृत्य केले. कात्रज ला श्री व सौ कुलकर्णी यांनी श्री गुरुजींना स्वामींचे जे दर्शन झाले त्याचे प्रासादिक तैलचित्र तयार करवून घेतले आहे. श्री गुरुजी सांगत, त्यांच्या आयुष्यतला बराचसा काळ खूप खडतर गेला. त्यामुळे ज्योतिषांकडे जाऊन पत्रिका दाखवण्याचा नाद होता, एके दिवशी प्रत्यक्ष स्वामी समर्थानी प्रकटुन चित्रगुप्ताला बोलावून श्री गुरुजींची मागील सर्व कर्मांचा लेखाजोखा मागवला आणि तो फाडून टाकला. अश्या कित्येक अनाकलनीय घटना गुरुजींच्या आयुष्यात घडल्या.
श्री सद्गुरू श्री शंकर महाराज आणि श्री कान्हेरे गुरुजी

श्री कान्हेरे गुरुजी आणि श्री शंकर महाराज याविषयीचे सर्व कथन हे खुद्द श्री कान्हेरे गुरुजी यांनी भक्तांना त्यांच्या वाणीतून सांगितलेले आहे ते थोडक्यात नमुद करतो.

शंकर महाराज आजोबांना सांगत की तू स्वामींचा आहेस आणि आपल्या दोघांचे गुरू हे श्री स्वामी समर्थ असल्याने तू आणि मी गुरुबंधू आहोत. श्री कान्हेरे गुरुजींना श्री शंकर महाराजांचा ४ वर्षे सदेह सहवास लाभला. त्यांची पहिली भेट ही श्री स्वामींच्या मंडई पुणे येथील मठात झाली. श्री गुरुजी तबला वादना शिवाय उत्तम गाणं गात, असेच काही दिवस ते स्वामींच्या मठात जात असताना श्री शंकर महाराज तेथे येत. शंकर महाराजांचा वेष, आवेश हा नाठाळ लोकांसाठी वेडगळ पण सज्जनांसाठी कृपासिंधु असा असे. श्री गुरुजी स्वामींसमोर भजन म्हणत असताना श्री शंकर महाराज त्यांच्या खांद्यावर, अंगावर बसत, असे काही दिवस चालले, एके दिवशी रागावून श्री गुरुजी यांनी श्री महाराजांना ढकलले आणि श्री महाराज खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला खोप पडून रक्तस्त्राव होऊ लागला, हे बघून जवळचे जे शंकर महाराज कोण आहेत हे जाणत होते त्यांनी तरुण असणाऱ्या श्री गुरुजींना सुनावलं, त्यावेळी प्रत्यक्ष श्री शंकर महाराज यांनी त्या लोकांना हटकले आणि म्हणाले, तुम्ही मध्ये पडू नका हा माझा आहे आणि आम्ही बघून घेऊ, हा सर्व प्रसंग सुरू असताना श्री गुरुजींना वाईट वाटले आणि कळून चुकले की आपण हे बरोबर केले नाही त्यांनी श्री महाराजांची माफी मागितली, अर्थात दयासिंधु श्री महाराज आपल्या गुरुभक्तावर रागावतील कसे? त्यांनीही त्याला माफ करून झालं गेलं विसरून जाण्यास सांगितले, वाचकहो इथे नमूद करतो या सगळ्या प्रसंगापर्यंत श्री गुरुजी श्री शंकर महाराजांना विशेष ओळखत नव्हते, आणि इतर लोकांसारखीच कुणीतरी वेडा म्हणून महाराजांविषयी कल्पना करवून घेतली होती.

या प्रसंगानंतर मात्र श्री गुरुजी, श्री शंकर महाराजांचरणी नतमस्तक होऊन वागत. आणि पुढे काही दिवस श्री स्वामींच्या मठात दोघे भेटत. असेच एकदा गुरुजी स्वामींसमोर भजन म्हणत असताना श्री शंकर महाराज म्हणाले अरे मोठ्याने म्हण म्हाताऱ्याला ऐकू येत नाही, आणि गुरुजी मोठ्याने भजन गाऊ लागले तत्क्षणी श्री स्वामींच्या गळ्यातील हार खाली आजोबांपाशी पडला, तेव्हा महाराज म्हणाले आता म्हातार्याला ऐकू आल. (इथे श्री कान्हेरे गुरुजींनी श्री शंकर महाराज काय म्हणाले हे त्यांच्याच भाषेत सांगितलं.

यानंतर श्री शंकर महाराज आणि श्री कान्हेरे गुरुजी यांची सतत भेट होत असे, आणि या ४ वर्षांतल्या अनेक भेटींचे प्रसंग श्री कान्हेरे गुरुजींनी आम्हाला सांगितले, ते ओघाने आपण नंतर बघूच. असो..

श्री शंकर महाराज देह ठेवण्याच्या काही दिवस आधी श्री गुरुजींना जिथे आत्ता महाराजांची समाधी आहे तिथे घेऊन गेले, त्यावेळी ते दाट जंगल होते, आणि गुरुजींना म्हणाले कशी वाटली आमची समाधीची जागा? आम्ही इथेच वास्तव्य करणार आहोत कायमस्वरूपी, यावरून त्या दोन विभुतींमध्ये एकमेकांविषयी किती प्रेम होते हे दिसते.

असेच एका प्रसंगी श्री शंकर महाराज श्री गुरुजींना म्हणाले की माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला देणार आहे, त्यावर गुरुजी महाराजांना नम्रतेने म्हणाले की ह्याबाबतीत तुम्ही श्री स्वामींनाच विचारा, अर्थात श्री शंकर महाराज हे स्वामींशी एकरूपच होते आणि श्री गुरुजी असे म्हणल्यावर त्यांना आनंद झाला व म्हणाले  शाब्बास! मी तुझी परीक्षा घेत होतो आणि त्यात तू पास झालास.

असाच एक सर्व परिचित असा श्री शंकर महाराज आणि श्री गुरुजींचा इथे प्रसंग पुन्हा एकदा पाहू.

समाधीच्या काही दिवस आधी  कान्हेरे गुरुजींना महाराजांनी सायंकाळी  वाजता जेवावयास बोलावले होते. त्याप्रमाणे गुरुजी महाराजांकडे जाण्यास  निघाले. इतक्यात एका कीर्तनकाराचा तबलजी न आल्याने ते गुरुजींना तबला वाजवण्यासाठी घेऊन गेले. कीर्तन रात्री उशिरा संपल्यावर गुरुजी महाराजांकडे गेले. महाराज वाट पाहत होते. महाराजांनी त्यांची चांगली कानउघडणी केली, अरे वीस रुपयांसाठी केवढी मोठी संधी घालवलीस  
गुरुजी तरुण अल्लड होते. त्यांनी श्री शंकर महाराजांच्या योग्यतेची पूर्ण ओळख झाली नव्हती. गुरुजींनी हात धुतले व पाटावर बसले. तोच आतून दागिन्यांनी मढलेली एक सुंदर स्त्री आली. तिने स्वयंपाक वाढला. त्या स्त्रीकडे गुरुजी पहात राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, अरे ताटाकडे बघ, गुरुजी हे ऐकून लाजले. मान वर न करता गुरुजी गुपचूप जेवले व हात धुण्यास आत गेले. तेथे ती स्त्री नव्हती. एकच दरवाज्याची खोली. बाई गेली कुठे? आतील खोलीत सहा ते सात ताटं जेवलेली उष्टी पडलेली होती. हे पाहून गुरुजींनी महाराजांना विचारले, कोण कोण आले होते भोजनासाठी? त्यावर महाराज म्हणाले, मी लवकरच जाणार, म्हणून स्वतः स्वयंपाक केला व श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, श्री साटम महाराज, श्री स्वामी समर्थ साऱ्यांना बोलावले होते. हा अमूल्य दर्शनयोग तुला घडावा म्हणून मी तुला बोलावले होते. त्यावर कुतूहलाने गुरुजी म्हणाले, ती बाई कोण होती? पटकन नाहीशी झाली, त्यावर महाराज म्हणाले, तुला जेवण वाढण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला थांबवले. तू खरोखर भाग्यवान आहेस. मी उद्या जाणार आहे. तू इथे यायचे नाही. तुला ते सहन होणार नाही, हा महाराजांचा शब्द त्यांनी पाळला.

कै. कान्हेरे गुरुजी हे एक मोठे आध्यात्मिक साधक होते. समाधी नंतरही महाराजांनी प्रेम करावे असे भाग्य कै. कान्हेरे गुरुजींच्या वाट्याला आले. आळंदीला श्री ज्ञानेश्वर माउलींनी गुरुजींना दर्शन देऊन उपकृत केले.
शक्तीपाताचार्य श्री वामन गुळवणी महाराज आणि श्री कान्हेरे गुरुजी

श्री स्वामी समर्थ हे श्री गुरुजींचे मोक्ष गुरू होत, पण देहधारणेनंतर देहावर असणारा गुरू करणे क्रमप्राप्त असते, त्याप्रमाणे, त्या काळातील महान योगाचार्य श्री वामन गुळवणी महाराज यांनी सन १९६१ साली श्री गुरुजींना शक्तिपात दीक्षा दिली. श्री कान्हेरे गुरुजी आयुष्याच्या उत्तरार्धात नारायणपेठेत शिवरकर यांच्या कार्यालयात बसत असत. आणि श्री व सौ डोके यांच्या नारायण पेठेतील सदनिकेत रात्री विश्रामास आणि दिवसातील बहुत काळ असत.
श्री गुरुजी असताना पहाटे ५ पासून ते रात्री ११ पर्यंत सतत भक्तगणांचा राबता असे, आणि श्री गुरुजी सर्वांना अतिशय प्रेमाने उपदेश करत. ज्याला त्याला त्याच्या सद्गुरूंची महती आणि शिकवण, साधना ते सांगत. सगुणोपासना, ध्यान, नामस्मरण याची महती ते नेहमी सांगत. घरी आलेल्या प्रत्येकाला ते काही ना काही प्रसाद देत अगदी एक पेढा असेल तरी दोघांमध्ये अर्धा करून ते वाटत. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाला शिवस्वरूप समजून प्रत्येकाची मळवट अष्टगंधाने अतिशय प्रेमळ हाताने भरत.

श्री गुरुजींकडे सकाळची पूजा, दुपारी स्वामींना नैवेद्य, दत्ताचा धावा, दत्ताची पंचपदी, रविवारी श्री गोंदवलेकर महाराजांची पंचपदी अखंडपणे शेवटपर्यंत होत असे. श्री गुरुजींना आम्ही कधीही १- २ तासांच्या वर  झोपलेले बघितले नाही, तरी त्यांचा उत्साह तरुणाला लाजवेल असाच होता.

सन २०११-२०१२ साली 'ऋषितुल्य' पुरस्काराने गौरवण्यात आले.  श्री गुरुजींना स्वामींची चित्रे रेखाटण्याचा छंद होता, दिवसभारत ते २०-२५ स्वामींची चित्रे सहज रेखाटत

समकालीन संतांमध्ये, श्री गुरुजींना चित्रकूटचे श्री माधवनाथ महाराज, श्री शंकर महाराज, श्री श्रीधरस्वामी, श्री बाबामहाराज सहस्रबुद्धे, श्री परीट बाबा, श्री कलावती आई, श्री कसबेकर महाराज, केडगावचे श्री नारायण महाराज, श्री गुळवणी महाराज, आळंदीच्या स्वामींचे शिष्य ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन, राम भोसले, सोनोपंत दांडेकर या ना अश्या अनेक संतांचा प्रत्यक्ष सहवास लाभला.

श्री गुरुजींना देहात बघितलेले, भेटलेले अनेक जण आहेत, नक्कीच काहीतरी जबरदस्त पुण्याई फळाला आली म्हणून श्री गुरुजींचा सहवास लाभला. अश्या महान विभूतीविषयी अधिक काय बोलावे, त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सन १२ ऑक्टोबर २०११ सायंकाळी आपला पवित्र देह वयाच्या ९२ व्या वर्षी श्री स्वामीचरणी रुजू केला, आजही श्री गुरुजी सुक्ष्मरूपाने आपल्यात आहेत याची वेळोवेळी प्रचिती येते!!

"उपासनेला दृढ चालवावे भुदेव संतासि सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे" या उक्तीला साजेसे असे गुरुजी होते.

शब्दांकन- श्री कान्हेरे गुरुजी भक्तपरिवार

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP