स्कंध ५ वा - अध्याय २४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४५
राहू तो सूर्याच्या अधोभागीं दहा - । सहस्त्र तीं पहा योजनें कीं ॥१॥
प्रति अमा-पूर्णी तिथींसी तो सूड - । घ्यावया, सायुध सिद्ध होई ॥२॥
जाणूनि हें चंद्र-सूर्यांसी ईश्वर । योजूनियां चक्र रक्षी स्वयें ॥३॥
उभा यदा राहुचक्राच्या पुढती । ग्रहणें तदा तीं सूर्यचंद्रां ॥४॥
अधोभागीं त्याच्या असे अंतरिक्ष । चारण ते सिद्ध वसती तेथें ॥५॥
राक्षस पिशाच्च त्याच्या अधोभागीं । मर्यादा भूमीची तयाखालीं ॥६॥
वासुदेव म्हणे भूमीच्या खालतीं । पाताल कथिती सप्त, मुनि ॥७॥

१४६
दैत्य दानवादि स्थानीं त्या वसती । सकल सौख्याची प्राप्ति तेथें ॥१॥
विष्णुचक्राविण भय नसे तेथें । सप्त पाताळ ते ऐका आतां ॥२॥
अतलांत वस मयासुरपुत्र । कपटविद्येंत निष्णात तो ॥३॥
नाम त्याचें ‘बल’ स्वैरिणी कामिनी । पुंश्चली या तिन्हीं जृंभोद्भूत ॥४॥
स्त्रिया, पापयुक्ता हाटकरसानें । मोहिताती मनें जातां तेथ ॥५॥
रसें त्या उन्मत्त होऊनियां नर । मानूनि ईश्वर बरळे बहु ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकावे वितल । द्वितीय पाताल विवर तें ॥७॥

१४७
हाटकेश्वर त्या स्थानीं अंबेसह । वसे सपार्षद भूतांसवें ॥१॥
हाटकी नदी त्या दंपत्यवीर्याची । प्राशूनियां अग्नि कनक थुंके ॥२॥
तया सुवर्णाचे बहु अलंकार । दैत्यस्त्रिया सर्व परिधानिती ॥३॥
तयाखालतीं तें सुतल बळीचें । ऐश्वर्य तेथींचें न वर्णवे ॥४॥
दानफलें तया लाभलें हें स्थान । मोक्षही त्याहून तुच्छ मानी ॥५॥
पितामहातें तो वर्णीतसे नित्य । धन्य महाभक्त प्रल्हाद तो ॥६॥
भक्तीवीण सर्व वैभव त्या तुच्छ । रक्षी देव नित्य बळीप्रति ॥७॥
पीडक रावणा फेंकिलें चरणें । दूर श्रीविष्णूनें बळिद्वारीं ॥८॥
वासुदेव म्हणे वैभव तो भ्रम । मानितो सज्जन बंधप्रद ॥९॥

१४८
त्रिपुराधिपति मयासी शंकरें । जिंकूनियां दिलें तलातल ॥१॥
चक्रभय नसे मयासी त्या स्थानीं । शंकराची जनीं कृपा ऐसी ॥२॥
क्रोधवश ‘महातली’ सर्पवृंद । कुहक, तक्षक कद्रूपुत्र ॥३॥
भय तयांलागीं नित्य गरुडाचें । दैत्य दानवांचें ‘रसातल’ ॥४॥
निवातकवचादिक देववैरी । वसती या विवरीं आनंदानें ॥५॥
सरमा ते इंद्रदूती तयां शापी । वधील तुम्हांसी इंद्र ऐसें ॥६॥
भयाकुल बहु शापें त्याचि दैत्य । वसताती नित्य रसातलीं ॥७॥
वासुकि आदि ते नागही पुढती । पाताळीं वसती अत्यानंदें ॥८॥
पंच सप्त सहस्त्रही फणी कोणा । मस्तकीं ते जाणा मणी त्यांच्या ॥९॥
वासुदेव म्हणे पाताळीं सर्वदा ॥ प्रकाश मण्यांचा तेज:पुंज ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP