स्कंध ५ वा - अध्याय १६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१००
परीक्षिती म्हणे प्रियव्रतरथें । झालीं सप्तदीपें कथिलें पूर्वी ॥१॥
वर्णन तयांचें करा सविस्तर । सगुण आकार ईशाचा तो ॥२॥
सगुणावांचूनि निर्गुणांत चित्त । कदा न सुस्थित होत असे ॥३॥
मुनि नृपाळासी म्हणती ते सृष्टि । लीला ईश्वराची समजें मनीं ॥४॥
अशक्य सृष्टीचें यथार्थ वर्णन । कल्पनाही पूर्ण करवेनाचि ॥५॥
स्थूलमानें ऐकें वर्णन सृष्टीचें । सावधान चित्तें राजश्रेष्ठा ॥६॥
वासुदेव म्हणे स्थूल चिंतनानें । सूक्ष्म तत्त्व बाणे पुढती चित्तीं ॥७॥

१०१
भूमंडळांबुजीं सप्तकोश, मध्य । तेंचि जंबुद्वीप सुविख्यात ॥१॥
लक्ष योजनें तें नृपाळा, विस्तीर्ण । पद्मपत्रासम समवर्तुळ ॥२॥
योजेनें सहस्त्रनव ज्यां विस्तार । नवखंडें थोर तयामाजी ॥३॥
सीमेवरी त्याच्या एकेक पर्वत । ऐसे गिरि अष्ट श्रेष्ठ तेथें ॥४॥
मध्यभागीं त्याच्या इलावृत्त शोभे । त्यामाजी विराजे कनकमेरु ॥५॥
वासुदेव म्हणे विस्तार मेरुचा । वर्णियेला साचा कथितों तोचि ॥६॥

१०२
जंबुद्वीपासम विस्तार मेरुचा । वर्णवेन साचा गिरिश्रेष्ठ ॥१॥
षोडश सहस्त्र योजनें भूमींत । तितुकाचि मुळांत द्विगुण वरी ॥२॥
उत्तरेसी नील, श्वेत, शृंगवान । पर्वत हे तीन अनुक्रमें ॥३॥
रम्यक तैं हिरण्मय तेंवी कुरु । वर्षे तीं साचारु तयामाजी ॥४॥
पूर्वपश्चिमेसी क्षार समुद्रान्त । विस्तारले श्रेष्ठ गिरी ऐसे ॥५॥
सहस्त्र द्वय ती योजनें त्या रुंदी । एकाहूनि लांबी न्यून ऐका ॥६॥
उंची सकलांची समानचि असे । दक्षिणेसी तैसे गिरि ऐकें ॥७॥
वासुदेव म्हणे योजना हे रम्य । देऊनियां ध्यान श्रवण करा ॥८॥

१०३
निषध हेमकूट हिमालय गिरि । वर्षे तेथ हरी किंपुरुष ॥१॥
भारत तृतीय वर्ष तें प्रसिद्ध । इलावृत्त मध्य सकलांच्या ॥२॥
माल्यवानगिरि पश्चिमेसी त्याच्या । केतुमाल वर्षा मर्यादा तो ॥३॥
गंधमादन तो शोभतो पूर्वेसी । भद्राश्च वर्षाची सीमारुपें ॥४॥
दश सहस्त्र ती योजनें त्या उंची । द्विसहस्त्र रुंदी योजनें त्या ॥५॥
मंदार तैं मेरुमंदर, सुपार्श्व । कुमुद हे चार श्रेष्ठ गिरि ॥६॥
सभोंवार स्तंभासम ते मेरुच्या । विस्तार तयांचा इतरांसम ॥७॥
आम्र जंबु तेंवी कदंब तैं वट । ऐसें वृक्षश्रेष्ठ तयांवरी ॥८॥
वासुदेव म्हणे ध्वजचि ते चार । शोभती साचार चोंहीकडे ॥९॥

१०४
एकादश शत योजनें विस्तार । ऐसे वृक्ष थोर विस्तारले ॥१॥
दुग्ध मधु इक्षुरस तेंवी जल । र्‍हद ऐसे चार तयांवरी ॥२॥
सिद्ध किन्नर ते मनसोक्त प्राशिती । अष्टमहासिद्धि सहज तयां ॥३॥
नंदन तै चैत्ररथ, वैभ्राजक । सर्वतो तें भद्र उपवनें ॥४॥
विचरति तेथें देव आनंदानें । देवांगनांसवें थोर थोर ॥५॥
मंदराद्रीवरी एकादश शत । योजनें तो उंच आम्रवृक्ष ॥६॥
शिखरीं तयाच्या गिरिशृंगाकार । अमृत मधुर पडती फळें ॥७॥
आरक्त तयांच्या रसानें सरिता । नामें ‘अरुणोदा’ वाहतसे ॥८॥
इलावृत्ताचा ती सिंची पूर्वभाग । जलें त्या सुगंध यक्षिणींसी ॥९॥
वासुदेव म्हणे आश्चर्यकारक । वर्णन हें शुक करिती मोदें ॥१०॥

१०५
मेरुमंदरीं ते वाहे जंबुनदी । अपूर्वता तेही परिसा आतां ॥१॥
गजांगासमान जंबूफळें तेथ । रस दक्षिणेस वाहे त्यांचा ॥२॥
तीरावरी शुष्क होता जांबूनद । उत्तम कनक होई बहु ॥३॥
देवलोकीं अलंकार सर्व याचे । देव गंधर्वाचें बहुविध ॥४॥
सुपार्श्व पर्वतीं कंदंबाचा वृक्ष । मधुधारा पंच तयांतूनि ॥५॥
पश्चिमेची शोभा वाढे त्या प्रवाहें । वटवृक्ष आहे कुमुदावरी ॥६॥
पंचामृत, गुड, अन्न, वस्त्र, शय्या । आसनादि तयां शाखेंतूनि ॥७॥
प्रवाह तयांचे उत्तरेसी जाती । कामना पुरती भोगितां ते ॥८॥
जरारोगादिक सर्व दु:खनाश । सेवितां ते सौख्य सकल लाभे ॥९॥
वासुदेव म्हणे मेरुच्या भोंवतीं । पर्वत विंशति कुरंगादि ॥१०॥

१०६
पृथ्वी कमलाचा मेरु हाचि गाभा । केसरांची शोभा पर्वत ते ॥१॥
चारी दिशांप्रति गिरी दोन दोन । द्वारपालांसम शोभा देती ॥२॥
करवीर कैलासगिरी दक्षिणेसी । शिखरीं ब्रह्मयाची पुरी दिव्य ॥३॥
दशसहस्त्र ते योजनें विस्तृत । कथिती कनकमय पूर्ण ॥४॥
इंद्र अग्नि यम निऋति वरुण । तैसाचि ईशान, सोम, वायु ॥५॥
ऐशा दिक्पालांचीं नगरें तीं अष्ट । ब्रह्मपुरी श्रेष्ठ ‘मनोवती’ ॥६॥
अमरावती ते तेजोवती रम्य । यशोवती तया नामें ऐसीं ॥८॥
वासुदेव म्हणे अष्टलोकपाल । आनंदें तें स्थळ शोभवीती ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP