स्कंध ५ वा - अध्याय १५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


९७
परीक्षितीलागीं निवेदिती शुक्र । पुत्र भरतास सुमति नामें ॥१॥
जीवन्मुक्ता तया कलियुगामाजी । देवता दुर्बुद्धि मानितीले ॥२॥
‘वृद्धसेना’ तेंवी ‘आसुरी’ या दोन । सुमतीतें जाण रुचिर कांता ॥३॥
‘देवताजित’ तैं ‘देवद्युम्न’ पुत्र । ‘परमेष्ठी’ पुत्र देवद्युम्ना ॥४॥
धेनुमती धन्य माता ते तयाची । कांता गुणवती सुवर्चला ॥५॥
‘प्रतीह’ तयाचा पुत्र महाज्ञाता । जयाचिया हाता मोक्षसौख्य ॥६॥
प्रतिहर्ता तेंवी प्रस्तोता उद्गाता । विस्तार हा ऐसा प्रतीहाचा ॥७॥
प्रतिहर्त्याप्रति स्तुतीच्या उदरीं । संतती जाहली अज, भूमा ॥८॥
भूमासी उद्गीथ तयासी प्रस्ताव । विभु नामें पुत्र प्रस्तावातें ॥९॥
पृथुषेण तया आकूति त्या नक्र । नक्राप्रति गय पुत्र झाला ॥१०॥
वासुदेव म्हणे गयाचें चरित्र । ऐकूनि पवित्र व्हावें आतां ॥११॥

९८
राजा परीक्षिता, गय विष्णुअंश । स्वधर्मे प्रजेस सौख्य देई ॥१॥
ज्ञात्यांच्या सेवेनें झाला सुसंस्कृत । अहंभाव नष्ट झाला त्याचा ॥२॥
ऐसेंही असूनि कर्तव्यपालन । करी निरभिमान राहूनियां ॥३॥
तयासम कोणी जाहलाचि नाहीं । नांदती त्या ठाईं सकल गुण ॥४॥
ईश्वरांशावीण एका ठाईं ऐसे । नांदतील कैसे गुण थोर ॥५॥
दक्षकन्या श्रद्धा मैत्री तेंवी दया । अभिषेक गया करिती हर्षे ॥६॥
भूधेनु राज्यांत सोडूनियां पान्हा । जनांच्या कामना पूर्ण करी ॥७॥
वासुदेव म्हणे निरिच्छ गयासी । सत्कर्मे लाभती सकल भोग ॥८॥

९९
गयगयंतीसी पुत्र झाले तीन । सुगती, अवरोधन, चित्ररथ ॥१॥
चित्ररथकांता उणेंतें ‘सम्राट’ मरीचि तयास पुत्र झाला ॥२॥
बिंदुमानपुत्र मधु पौत्र त्याचा । वीरव्रत त्याच पुढती पुत्र ॥३॥
मंथु, प्रमंथु ते वीरव्रतपुत्र । भौवन मंथूस पुत्र एक ॥४॥
भौवनासी त्वष्टा विरज तयातें । विषूची कांतेचे शत पुत्र ॥५॥
तेंवी एक कन्या, विरजा वर्णिती । शोभा तो वंशाची म्हणती जन ॥६॥
वासुदेव म्हणे भरताचा वंश । ऐसा पुण्यवंत वर्णियेला ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP