स्कंध ५ वा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१६
परीक्षितालागीं निवेदिती शुक । करी नाभिराज पुत्रइच्छा ॥१॥
परी राणीलागीं संतान न होई । यज्ञकर्मी होई दंग तदा ॥२॥
राया, द्रव्य, देश, काल तेंवी मंत्र । दक्षिणा ऋत्विज विधान हें ॥३॥
सप्तमार्ग लोकीं ईश्वरप्राप्तीचे । श्रद्धेनें शुद्धातें यश देती ॥४॥
नाभिराजभक्ति पाहूनि भगवान । प्रत्यक्ष दर्शन तया देई ॥५॥
सांवळें तें रुप पाहूनि ऋत्विज । स्तविती तयास नम्रभावें ॥६॥
वासुदेव म्हणे दरिद्य्रासी ठेवा । तैसा कां न व्हावा सकलां मोद ॥७॥

१७
अत्यानंदें विप्र प्रार्थिती हरीसी । प्रभो, तुजलगीं नमस्कार ॥१॥
असमर्थ तुझ्या वर्णना शेषही । नामरुप कांहीं नसे तुज ॥२॥
सांसारिक भावें मानितांही रुप । देवा, अत्यद्भुत गुण तुझे ॥३॥
सकलांचीं सर्व पातकें विनष्ट । करावीं वैशिष्टय हेंचि तव ॥४॥
केवळ स्तवन अथवा पूजन । करितां प्रसन्न होसी भक्तां ॥५॥
पूर्णकामा, तुज काय असे न्यून । यज्ञ पूजा ज्ञान आम्हांस्तव ॥६॥
हिताहित तेंही कळेना आम्हांसी । ऐसे मंदमती देवा आम्हीं ॥७॥
केवळ कृपेनें पावलासी आम्हां । भाव जाणूनियां अंतरींचा ॥८॥
पूजा, यज्ञादीनें तुज काय लाभ । आम्हां मात्र मार्ग तोचि असे ॥९॥
वासुदेव म्हणे ऋत्विज कृतार्थ । होऊनि प्रभूस नमिती भावें ॥१०॥

१८
नाभिराजाच्या यज्ञांत । म्हणती भेटही प्रत्यक्ष ॥१॥
आतां मागणें संपलें । भाग्य उदयासी आलें ॥२॥
मुनि विरागीही ज्ञाते । गाती केवळ गुणांतें ॥३॥
पराधीन वा स्वतंत्र । असतां तुझाचि आठव ॥४॥
होवो, हाचि वर देईं । जेणें पाप नष्ट होईं ॥५॥
प्रभो, कुबेर तोषतां । तया मागाव्या कण्या कां ॥६॥
परी अनिवार माया । रायाचा हो पुत्र देवा ॥७॥
जया सज्जनसंगति । तया लाभे ब्रह्मदीप्ति ॥८॥
कळे विषय तें विष । होई तदाचि विरक्त ॥९॥
वासुदेव म्हणे क्षमा । म्हणती करीं नारायणा ॥१०॥

१९
नाभिराज ठेवी मस्तक चरणीं । सद्भावें जोडूनि करद्वय ॥१॥
भक्तवत्सल तैं बोले भगवान । उदरीं येईन मीच तुझ्या ॥२॥
विप्रवाक्य होवो सत्य हे मदिच्छा । तयांची श्रेष्ठता त्रैलोक्यांत ॥३॥
मुख तेंचि माझें यास्तव तयांची । होईल सत्यचि वाणी राया ॥४॥
परीक्षिता, मेरुदेवीतें पुढती । दिवस लोटती योग्य वेळीं ॥५॥
वासुदेव म्हणे धर्मबोधास्तव । घेई अवतार जगन्नाथ ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP