स्कंध ५ वा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५४
परीक्षितीलागी बोलताती शुक । अंगिरा गोत्रांत विप्र एक ॥१॥
शमादिसंपन्न धर्माचाररत । तया धर्मनिष्ठ भार्या दोन ॥२॥
एकीलागीं नऊ पुत्र गुणवंत । पुत्र कन्या मात्र दुजीलागीं ॥३॥
पुत्र जो तियेचा भरत नाम त्यासी । पूर्वजन्मस्मृति तयालागीं ॥४॥
आसकीनें होतां स्वजनसंगती । अन्य जन्माप्रति कारण ते ॥५॥
जाणूनियां ऐसें राहिला अलिप्त । वासुदेव वृत्त प्रेमें कथी ॥६॥
ईश्वरस्मरणकीर्तनेंचि मुक्ति । जाणूनियां तोचि ध्यास घेई ॥७॥
ठेवितां कोठेंही प्रेम घडे नाश । जाणूनि सिद्धान्त वागे तैसें ॥२॥
जड मूढ,अंध म्हणावें आपणा । आचरी वर्तना ऐशापरी ॥३॥
ऐशा मूढातेंही पुत्रप्रेमें विप्र । वाढवी सदय दक्षतेनें ॥४॥
उपनयनादि करुनि तयासी । शिकवी बळेंचि वेदशास्त्र ॥५॥
निवृत्त तो व्हावा यास्तव भरत । दावितो मूढत्व पित्यालागीं ॥६॥
वासुदेव म्हणे पुत्रहितास्तव । पित्याचें हृदय तुटूनि जाई ॥७॥

५६
रात्रंदिन तया मूढास्तव विप्र । प्रयत्न साचार करी बहु ॥१॥
आत्महिताचीही सोडूनियां चिंता । पुत्रशिक्षणाचा ध्यास घेई ॥२॥
ऐसे दिन जातां उचली त्या काळ । कांता ते द्वितीय सती गेली ॥३॥
बांधव पुढती भरताचा नाद । सोडूनि तयास उपेक्षिती ॥४॥
द्विपाद पशूचि जाणावे ते राया । ‘जडा’ ‘उन्मत्ता’ त्या संबोधिती ॥५॥
वेडयासम तोही प्रत्युत्तर त्यांसी । देई परी त्यांची आज्ञा पाळी ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा जडमूढ । राहूनि भरत दिवस कंठी ॥७॥

५७
कदा धरिती वेठीसी । कोणी वेतनही देती ॥१॥
भिक्षान्नही कदा सेवी । यथालाभें तृप्त होई ॥२॥
सुखार्थ न भक्षी अन्न । इच्छी केवळ रक्षण ॥३॥
स्वयंसिद्ध सुखरुप । आत्मा मीचि ऐसा बोध ॥४॥
तेणें मान अपमान । स्तुति निंदा त्या समान ॥५॥
सर्व ऋतूंमाजी पाही । आच्छादनावीण राही ॥६॥
देह पुष्ट बळकट । औदासिन्यें मळकट ॥७॥
वासुदेव म्हणे गुप्त । तेज ज्ञात्याचें न व्यक्त ॥८॥

५८
अमंगल वस्त्र मलिन त्या सूत्रें । म्हणती नाममात्रें ब्राह्मण हा ॥१॥
आचारविहीन अधम मानून । सर्व अपमान करिती त्याचा ॥२॥
अन्नास्तव करी मोलेंही चाकरी । लाभे तें स्वीकारी कदान्नही ॥३॥
शूद्रराज पुत्रलाभार्थ एकदां । कालीतें नराचा बळी इच्छी ॥४॥
आणिला जो नर गेला तो पळूनि । शोधूनि दमले दूत ॥५॥
माळ्यावरी शेत रक्षितां भरत । दिसला तयांस रजनीमाजी ॥६॥
सुलक्षणी तया पाहूनि बांधिलें । मंदिरांत नेलें चंडिकेच्या ॥७॥
वासुदेव म्हणे कठिण प्रसंग । आणूनि, श्रीरंग रक्षी भक्तां ॥८॥

५९
विधियुक्त स्नान घालूनियां वस्त्र । नेसविती दूत नूतन त्या ॥१॥
अलंकार माळा लावूनियां उटी । मस्तकीं लाविती तिलक स्पष्ट ॥२॥
धूपदीप लाह्या पुष्पें फळें आदि । अर्पूनि वधासी सिद्ध होती ॥३॥
गीत वाद्य स्तुति नौबदींच्य नादें । अंबिकेच्या पुढें बैसविती ॥४॥
शूद्रराज खड्‍गहस्तें वधास्तव । सज्ज होतां काय नवल होई ॥५॥
संकटींही विप्रवध न करावा । शास्त्राचा जाणावा निर्णय हा ॥६॥
त्यांतही ब्रह्मज्ञ दयाळु भरत । चिंतूनि देवीस क्रोध येई ॥७॥
वासुदेव म्हणे विपरीत कर्म । करितां दारुण फल लाभे ॥८॥

६०
क्रुद्ध जाहली चंडिका । करकरां चावी दाढा ॥१॥
उडी मारुनि गर्जली । खड्ग घेऊनि धांवली ॥२॥
छेदी दुष्टांची मस्तकें । करी कंदुक तयांचे ॥३॥
नाचे रुधिर प्राशूनि । कर्मासम फल जनीं ॥४॥
भरतासी मृत्युभय । नव्हतें सदा तो निर्भय ॥५॥
देहासक्ति नसे जया । भगवंत रक्षी तया ॥६॥
वासुदेव म्हणे भय । ईशभक्ता करी काय ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP