स्कंध ५ वा - अध्याय १४ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


N/A८४
परीक्षितीलागीं बोलताती शुक । मम देहादिक भावना हे ॥१॥
मायाकृत होतां, जीव गुणलिप्त । कर्मे इष्टानिष्ट करिती सदा ॥२॥
तेणें तयांलागीं बहु देहप्राप्ति । इंद्रियांची तृप्ति हेंचि साध्य ॥३॥
अनादि संसारनिमग्न ते तेणें । संसारींचे जाणें मार्ग घोर ॥४॥
लोभग्रस्त जेंवी व्यापारीसमूह । पावूनियां मोह भ्रमतो वनीं ॥५॥
तैसाचि हा जीव स्मशानसदृश । संसारारण्यांत मार्ग क्रमी ॥६॥
वासुदेव म्हणे आशामग्न जीव । धरुनियां हाव श्रमतो बहु ॥७॥

८५
जन्मोजन्मीं श्रांत होतांही विषय - । मानूनियां भय, न सोडीचि ॥१॥
शत्रूसम नित्य संकटीं इंद्रियें । लोटिती न कळे अद्यापि त्या ॥२॥
सद्‍गुरु तैं देवपादपद्मीं भृंग । व्हावें हा विश्वास न वसे त्याची ॥३॥
मनासवें पंचइंद्रियें हे चोर । करिती बेजार नागवूनि ॥४॥
ईश्वरप्रात्यर्थ जोडावें जें पुण्य । नेती तें हिरुन भुलवूनि ॥५॥
वासुदेव म्हणे व्यसनान्धाप्रति । दुर्जन लुटिती सर्वकाल ॥६॥

८६
टकमकां पाही रुप । होई गायन लोलुप ॥१॥
करी कामिनीसी स्पर्श । पक्वान्नांचा नित्य स्वाद ॥२॥
मोह सुगंधी द्रव्यांचा । ध्यास संसारसुखाचा ॥३॥
घेऊनियां ऐसा छंद । जीवाचाही करिती घात ॥४॥
सकल परमार्थसाधनें । लुटितां जीव दु:खी दैन्यें ॥५॥
स्वकीय ते नाममात्र । परी लांडगे प्रत्यक्ष ॥६॥
अजापालाच्या समक्ष । भक्षिताती अजामांस ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसे । आप्तस्वकीय स्वार्थाचे ॥८॥

८७
गृहस्थआश्रम क्षेत्रचि जाणावें । विविध उगवे बीज तेथें ॥१॥
पर्जन्य पडतां माजे बहुरान । वासना त्या जाण तैशारीति ॥२॥
लाभतांचि संधि घेती व्यक्तरुप । राहूनि अदृश्य दीर्घकाल ॥३॥
कर्पूर संपतां वास जात नाहीं । वासना या तेंवी जन्ममूळ ॥४॥
मशकदंश ते दुर्जन गांजिती । परी न मानिती कष्ट जीव ॥५॥
मिथ्या हा पसारा मानूनियां सत्य । धांव घेई नित्य विषयांमाजी ॥६॥
वासुदेव म्हणे भोजन, मैथुन । तेंवी रसपानमग्न जीव ॥७॥

८८
कदा मानवातें लाभतें सुवर्ण । परी विष्ठा जाण अग्नीची ते ॥१॥
सुवर्णाश्रित ते सर्व दोष जनीं । हांव धरी मनीं जीव त्याची ॥२॥
शीतवारणार्थ कोलती पिशाच । शोधितां सर्वांग दाह पावे ॥३॥
तैसा सुवर्णाचा संग्रह पीडक । करी प्राणवात कदाकाळीं ॥४॥
अन्न वस्त्र स्थानास्तवचि भ्रमण । आवर्तचि जाण युवती जळीं ॥५॥
कवटाळी अंकीं तदाचि अंधार । प्रीतिरुप घोर पसरे बहु ॥६॥
दुष्कर्मप्रवृत्त होई त्या अंधारीं । देवता त्या परी अवलोकिती ॥७॥
वासुदेव म्हणे देहासक्ति नरा । करी दुराचारा उल्हसित ॥८॥

८९
तुच्छत्व भवाचें येई कदा ध्यानीं । परी विसरुनि जाई क्षणीं ॥१॥
तेणें पुनरपि मिथ्या विषयांचा । ध्यास तया साचा लागतसे ॥२॥
घूक रानमाशांसम कदा दुष्ट । करुनि क्रूर शब्द भय देती ॥३॥
जोंवरी सुकृत तोंवरी सुयश । संपतां तें कष्ट होती बहु ॥४॥
वासुदेव म्हणे अनुकूल काल । जाणूनि गोपाल स्मरे ज्ञाता ॥५॥

९०
पापवृक्षासम उपकारहीन । धनिक हें ज्ञान नसे मूढा ॥१॥
तेणें सुखेच्छेनें लागे त्यांच्या मागें । केंवी विषकूपानें तृषा शमे ॥२॥
इहपर सौख्यास्तव द्रव्यव्यय । करिती न, हाय मृतचि ते ॥३॥
ऐशा संगतीनें मृतचि तो होई । नीचसंगें होई कदा नीच ॥४॥
पाखंडमताचा करुनि स्वीकार । व्यर्थ इहपर गमवी सौख्य ॥५॥
परपीडेनें त्या अन्नान्नप्रसंग । येतां तो उद्युक्त पितृबाधा ॥६॥
दावानल वाटे कदा त्या संसार । विपरीत तो काल प्राप्त होतां ॥७॥
क्रूरपणें राजदूत त्या गांजिती । मूर्च्छना खळासी येई तेणें ॥८॥
वासुदेव म्हणे चेंडूफळीसम । सुख:दुखीं मन झोंके घेई ॥९॥

९१
पिता, पितामहा चिरंजीव मानी । जनदु:खें मनीं कदा दु:खी ॥१॥
कर्मगिरी कदा चढावया जाई । कांटे खडे पाईं रुततां बैसे ॥२॥
जठराग्नि कदा शांति न पावतां । कातावूनि आप्तां दु:ख देई ॥३॥
निद्रा अजगरग्रस्त होई प्रेत । दंश दुष्टसर्प करिती कदा ॥४॥
तदा गर्वदाढा गळूनियां जाई । दु:खकूपीं होई पतन त्यांचें ॥५॥
परस्त्री, परधन इच्छी कदा कामें । प्रत्यक्ष न जाणे मृत्यूचि तो ॥६॥
सुटतां त्यांतूनि द्रव्य तें ती दारा । हरुनियां घरा नेती अन्य ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा चिंतामग्न । होऊनियां दीन काळ कंठी ॥८॥

९२
कदा दमडीस्तव करितो कापट्य । तेणें संकटांत पडे बहु ॥१॥
ऐसे उपसर्ग भवसिंधूमाजी । सुख, दु:ख, प्रीति, द्वेष, भय ॥२॥
अभिमान, ताठा, उन्माद तैं शोक । मोह तेंवी लोभ, मत्सरही ॥३॥
ईर्षा, अपमान, क्षुधा, आधिव्याधि । जन्म-मृत्यूआदि पीडा बहु ॥४॥
वासुदेव म्हणे भवार्णवीं नित्य । दु:खेंचि बहुत अविवेक्यासी ॥५॥

९३
राया, मूर्तिमंत माया ते कामिनी । करपाश दोन्हीं कंठी घाली ॥१॥
बुद्धि, बल, सर्व पाशें त्या विकल । तोडाया ते बल नसे कोणा ॥२॥
गृह-धनांदींची मालिका पुढती । ऐसे जीव जाती नरकीं स्वयें ॥३॥
सकल ऐश्वर्यसंपन्न हरीचें । चक्रचि तें साचें कालरुपी ॥४॥
आपरमाणु परार्धापर्यंत । कालाचे त्या भेद ध्यानीं घ्यावे ॥५॥
अवस्थारुपानें देखत देखतां । संहारी तो लोकां ब्रह्मयातेंही ॥६॥
भांबावूनि तेणें स्वीकारी पाखंड । वासुदेव शांत ईशप्रेमें ॥७॥

९४
सनातन तया प्रभूचा अव्हेर । करी, तया स्थैर्य केंवी लाभे ॥१॥
कंक गृध्रासम नास्तिकता निंद्य । केंवी चित्त शांत व्हावें तेणें ॥२॥
अनुभव त्याचा घेऊनियां जीव । विप्रांचा आश्रय फिरुनि करी ॥३॥
परी ते संस्कार तोलती न तया । शूद्राचार राया, पुढती होती ॥४॥
कुटुंबपोषण, कांतासमागम । सौख्य रात्रंदिन हेंचि त्याचें ॥५॥
विषयांध, ऐसा होई रोगग्रस्त । घोर तें संकट दरीसम ॥६॥
मृत्युगज तेथें पाहूनि घाबरे । वासुदेव स्मरे ईश्वरासी ॥७॥

९५
द्रव्यार्थ याचना करी कदा कोणा । पुरतां न कामना चौर्य करी ॥१॥
निंदा, अपमान, शासन पुढती । करी विवाहादि तथापीही ॥२॥
असह्य तो होतां करी घटस्फोट । यातना भोगीत मरुनि जाई ॥३॥
मित्र तयाप्रति त्यागूनि पुढती । आपुला क्रमिती विषयपंथ ॥४॥
ईशपराड्मुख दैवहीन ऐसा । ध्यास ईश्वराचा घेईचि ना ॥५॥
भक्त मात्र कर्मयोग संपवूनि । ईश्वरभजनीं दंग होती ॥६॥
अद्रोही संयमी विवेकी जे योगी । रुतती न पंकीं तेचि थोर ॥७॥
वासुदेव म्हणे जोंवरी वासना । तोंवरी न कोणा मुक्तिलाभ ॥८॥

९६
भरतोक्त ऐसा कथूनियां बोध । रायाप्रति शुक वदति ऐका ॥१॥
भरताचा मार्ग इतरां न शक्य । केंवी गरुडपंथ मशका साध्य ॥२॥
बाल्यापासूनीचि वैराग्य तयासी । अन्य कोणा कैसी योग्यता ते ॥३॥
राया, ईशभक्ता अशक्य न कांहीं । तया मोक्षश्रीही तुच्छ वाटे ॥४॥
ऐहिक सौख्याचा काय तया तोरा । श्रेष्ठ न ईश्वरावांचूनि त्या ॥५॥
मृगदेहत्यागसमयीं भरत । वदला तें वाक्य ऐकें राया ॥६॥
यज्ञ याग योग धर्मसंरक्षण । देवा, भक्तिज्ञान तूंचि सर्व ॥७॥
उत्पत्ति संहार तुझ्याचि स्वाधीन । प्रभो, हें वंदन तुजलागीं ॥८॥
आयुर्बल कीर्ति भाग्य मोक्षद हें । चरित्र ऐकावें नित्य प्रेमें ॥९॥
सकल कामना तेणें होती पूर्ण । वासुदेव गान करी तेंचि ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP