स्कंध ५ वा - अध्याय २२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४१
कुलालचक्रस्थ पिपीलिकादिक । चालती उलट ऐसें भासे ॥१॥
तैसीचि सूर्याची गति भासे भिन्न । सव्य ते दक्षिण भ्रमरुप ॥२॥
द्वादश मासांत भोगी बारा राशी । पक्ष चांद्रमासीं होती दोन ॥३॥
मास पितरांच्या होई अहोरात्र । सपाद नक्षत्र द्वय राशी ॥४॥
षष्ठमांश अब्द ऋतु त्या म्हणती । अयन बोलती अर्धाब्दातें ॥५॥
लंघी जयाकाळीं पूर्ण नभपथ । सूर्य तेंचि अब्द पंचधा तें ॥६॥
संवत्सरादि तीं पंचनामें त्यांसी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥७॥

१४२
प्रतिपदेसेचि येऊनि संक्रांत । सौर चांद्र अब्द आरंभ जैं ॥१॥
संवत्सर तेंचि, पुढती प्रतिवर्षी । दिन षटक्‍ वृद्धि सूर्यवर्षी ॥२॥
चांद्रवर्षी दिनषट्‍क होई न्यून । पंचवर्षे पूर्ण होतां मूळ ॥३॥
प्रथमादि कर्मे वत्सरें जाणावीं । ऐसी ध्यानीं घ्यावी सूर्यगति ॥४॥
सूर्यावरी एक लक्ष तीं योजनें । मंडळ चंद्राचें गतिमान ॥५॥
द्वादशगुण त्या सूर्याहूनि गति । म्हणती कलानिधि चंद्राप्रति ॥६॥
मनोमय अन्नमय अमृतमय । तेंवी सर्वमय म्हणती तया ॥७॥
वासुदेव म्हणे जीवन सर्वाचें । चंद्रचि हा असे म्हणती मुनि ॥८॥

१४३
तीन लक्ष उंच योजनें त्याहूनि । नक्षत्रें गगनीं क्रमिती मार्ग ॥१॥
तयाहूनि दोन लक्ष तीं योजनें । शुक्र असे जाणें वृष्टिदाता ॥२॥
तितुकाचि उंच पुढती तो बुध । चंद्राचा तो पुत्र फलदाता ॥३॥
तितुकाचि उंच पुढती मंगल । करी अमंगल सामान्यत्वें ॥४॥
बृहस्पति पुढें तितुकाचि उंच । होई शुभप्रद विप्रांसी तो ॥५॥
लक्ष योजनें तीं पुढती शनैश्चर । वर्ष सार्धद्वय एका स्थळीं ॥६॥
एकादश लक्ष योजनें पुढती । सप्तर्षि चिंतिती सकलाभीष्ट ॥७॥
वासुदेव म्हणे सूर्यमंडळाची । ओळख हे ऐसी संक्षेपानें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP