स्कंध ५ वा - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१२२
श्रीरामचरित्र किंपुरुषवर्षी । गाती गंधर्वादि अत्यानंदें ॥१॥
आर्ष्टिषेणांसवें ऐकतो मारुती । स्वयें तो रामाची स्तुति करी ॥२॥
म्हणे सीतापते, गुणांची तूं खाण । मूर्तिमती जाण मर्यादा तूं ॥३॥
विप्रांवरी प्रेम कल्याण जनांचें । ईश्वर तूं ऐसें सिद्ध करी ॥४॥
द्वैताचें न भान शांतीचें निधान । आरोपचि जाण नामरुप ॥५॥
दाविलेंसी प्रेम स्त्रियांचें दु:खद । सीतेस्तव खेद पावूनियां ॥६॥
केवळ भक्तीचि भांडवल भक्तां । मित्र तूं कपीचा भक्तीस्तव ॥७॥
उत्तरकोसल देशचि स्वर्गासी । रक्षूनि देवांसी नेलासी तूं ॥८॥
नर, वानर व देव दैत्य कोणी । जाई उद्धरुनि त्वद्भक्तीनें ॥९॥
वासुदेव म्हणे हनुमान ऐसें । स्तवन रामाचें करी प्रेमें ॥१०॥

१२३
नर-नारायण कल्पान्तापर्यंत । तप भारतात आचरिती ॥१॥
कोठें काय तप करिती कळेना । वृद्धि ज्ञान धर्मा सवैराग्य ॥२॥
सांख्य योगमार्गे तयांसी नारद । स्तविती त्यां नित्य सुजनांसवें ॥३॥
वर्णवेन तव लीला भगवंता । विजय इंद्रियांचा ब्रीद तव ॥४॥
मायातीता, तुच्छ भक्त जे जनांसी । तेचि त्वत्संपत्ति ज्ञानिश्रेष्ठ ॥५॥
परमहंसांचा तूंचि परमहंस । मस्तक हें नत तुझ्या पायीं ॥६॥
करुनि अकर्ता देहांत विदेही । पाहूनि सर्वही निर्विकार ॥७॥
ब्रह्मदेवोक्त तें योगाचें रहस्य । वसे मूर्तिमंत तुझ्या ठाईं ॥८॥
अभिमानहीन भक्त पावे मोक्ष । जगतीं कृतार्थ तोचि एक ॥९॥
स्त्रीपुत्रांचें केंवी होईल पुढती । चिंता हे जयासी मूढचि तो ॥१०॥
साधनें सकळ नरांचीं त्या व्यर्थ । यास्तव अखंड भक्ति देईं ॥११॥
वासुदेव म्हणे तोडीं मायापाश । प्रार्थिती नारद ईश्वरासी ॥१२॥

१२४
भारतवर्षीचे प्रमुख पर्वत । ऐकें आतां लक्ष देऊनियां ॥१॥
मंगलप्रस्थ तो मैनाक, त्रिकूट । ऋषभ, कुटक, कौल्लक, सह्य ॥२॥
देवगिरि, ऋष्यमूक तो श्रीशैल । वेंकट, महेंद्र, वारिधार ॥३॥
विंध्य, शुक्तिमान्‍ , ऋक्ष, पारियात्र । द्रोण, चित्रकूट, गोवर्धन ॥४॥
रैवतक, नील, ककुभ, गोकामुख । इंद्रकील, अंत्य कामगिरि ॥५॥
मुख्य हे पर्वत अन्यही बहुत । वर्णी नद्या नद वासुदेव ॥६॥

१२५
स्मरणही ज्यांचें जनांसी पावन । स्नानादिकें धन्य कां न होती ॥१॥
चंद्रवशा, अवटोदा, ताम्रपर्णी । कृतमाला, वेणी, वैहायसी ॥२॥
कावेरी, शर्करावर्ता, तुंगभद्रा । पयस्विनी, गोदा, कृष्णा, वेण्या ॥३॥
भीमरथी, तापी, पयोष्णी, निर्विध्या । सुरसा, नर्मदा, रेवा, सिंधु ॥४॥
चर्मण्वती, महानदी, वेदस्मृति । ऋषिकुल्या, कौशिकी, त्रिसामा ते ॥५॥
मंदाकिनी तेंवी यमुना, सरस्वती । सरयु, गोमती, रोधस्वती ॥६॥
दृषद्वती, सप्तवती तैं सुषोमा । सतद्रु ते अन्या चंद्रभागा ॥७॥
मरुद्‍वृधा तेंवी वितस्ता आसिक्नी । विश्वा याचि जनीं महा नद्या ॥८॥
वासुदेव म्हणे अंध, शोण ऐसे । नद भारतींचे पुण्यप्रद ॥९॥

१२६
कर्मासम गति लाभे या भारतीं । तैसीच सद्गति वर्णधर्मे ॥१॥
निष्काम ईश्वर चिंती तया मोक्ष । अभिमान नष्ट प्रथम व्हावा ॥२॥
सज्जनसंगानें गळे अभिमान । लाभ हा अनुपम भारतांत ॥३॥
देवही इच्छिती भारतांत जन्म । अल्पकालें धन्य होई एथें ॥४॥
ईशकथा भक्तवास्तव्य तैं भक्ति । वसतां वैकुंठीं तेंही तुच्छ ॥५॥
अनुखूलता ते सर्व या देशांत । जन्मूनियां येथ विषयी व्यर्थ ॥६॥
जालमुक्त पक्षी व्हावा जालगत । तैसेंचि तें कृत्य पामरांचें ॥७॥
वासुदेव म्हणे सेवा जे निष्काम । पुरवील काम सकल जाणा ॥८॥

१२७
याचक दात्यांचा संबंध न तुटे । मागणें तें ऐसें असो सदा ॥१॥
सकाम भक्तीनें सिद्ध होतां कार्य । त्यजी दूर दूर देवाप्रति ॥२॥
निष्काम भक्ताची चिंता ईश्वरासी । नित्य यास्तवचि श्रेष्ठता त्या ॥३॥
सकामाचा स्वर्ग पुण्यक्षयें क्षीण । मुक्तचि निष्काम होई अंतीं ॥४॥
यास्तव इंद्रादि प्रार्थिती प्रभूतें । भारतीं लाभूं दे जन्म आम्हां ॥५॥
निष्काम भक्तीचें असूं दे स्मरण । भक्त मात्र धन्य जगामाजी ॥६॥
सगरपुत्रांनीं अश्वार्थ खणितां । पावे अष्टरुपां जंबुद्वीप ॥७॥
स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन । मंदरहरिण, पांचजन्य ॥८॥
सिंहल तैं लंका, रमणक अंत्य । वासुदेव लक्ष पुढती देई ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP