मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
वेडा झाला, म्हणा हवें तर ...

कवि - वेडा झाला, म्हणा हवें तर ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


वेडा झाला, म्हणा हवें तर उठला जनतेंतुनीं,
कवी हा तन्मय निजगायनीं;
सुखदु:खांच्या व्यामोहाच्या सुटला फेर्‍यांतुनी
नसे जग याच्या ध्यानींमनीं
स्वार्थ विसरला अविरत फिरतो गुंगत विजनीं, वनीं
म्हणुनिया निंदो याला कुणी.
परि जगीं मिळालें याचें याला पुरें,
वैभवें वाटती यास दुजी पामरें,
मग करील कां हा स्पृहा तयांची बरें ?
एकच याचें यास पुरे, मग ह्सोत, हसतिल कुणी,
कवी हा, हा जगताचा धनी, ॥१॥

मदांध कमले ! जगीं कुणावर या पसरी मोहिनी,
न हा वश कविवर तुजलागुनी !
दंभा ! नीचा ! कळे न का तुज हा सत्याचा झरा,
सुखें जा नाच जगीं पामरा !
सैताना ! मत्सरा ! अरेरे ! जासी कोणाकडे ?
दिसेना कविवर का तुज पुढें ?
हा पवित्र पुरता ज्ञानसूर्य कीं अहा !
जा, तमा नीघ, हा उदया आला पहा !
अविवेका घूका, दडुनि कुठेंहि रहा.
हा प्रेमाचा धवलचंद्रमा भूवर ये उतरूनी;
कवी हा, हाजगताचा धनी ॥२॥

स्वच्छंदी हा प्रभातबायू झोके घे अंबरीं,
लतांना पुष्पित करितो तरी;
चंद्र पहा हा गगनमंडालीं हसतो वेडयापरी,
कर्षितो सागरलहरी तरी;
हे ! असाच समजा हा स्वच्छंदी कवी
हा जगास अपुल्या इच्छेसम वागवी,
हा भूस अर्पितो सदैव सुख मानवी,
खरा भिकारी, खराच वेडा, परंतु मोठा गुणी;
कवी हा, हा जगताचा धनी ॥३॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP