मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
वहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...

गज्जलाञ्जलि - वहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


वहवा रे वाचिवीर प्रेमपाठी फाकडे !
वाहवा रे शूर राघू वेषवेडे भाबडे !

बन्धुनाशीं दावितां शास्त्रोक्त औदासीन्य वा !
आणि पाळी आपुली येतांच लोटे कां रडे ?

या कुणी वन्द्य स्मृती केल्या कुणासाठी पहा,
काळलेखांचा करा अभ्यास, वाचा, घ्या धडे.

दुर्बळांची नागमोडी चाल ती शोभो तयां,
वीर पातळांतुनीही खेचुनी दे हासडे.

संस्कृतीच्या रक्षणाला शक्ति कोठे दाण्डगी ?
जिङकिते आर्यांस पूर्वीं कां जहाले राङगडे ?

रोमचें साम्राज्य तें कां रानटयांनी झोडिलें ?
संस्कृतीचें ओज जातां केवढा घाला पडे !

आपुल्या संरक्षणाची काळजी अन्यावरी ?!
देवही पाही, न वारी भेकडांचें साकडें.

स्वर्गवासी देव तो पाही परीक्षा तूमची,
का प्रतीक्षेने वहाती शत्रुपापाचे घडे ?

बोलतां आम्ही सुपर्ण व्योमसञ्चारी, परी
जुम्पिले घाण्यास जातां आणि नेत्रीं झापडें !

जन्मलां शार्दूलवंशीं, स्वत्व जाणा, आचरा;
धूर्तता ये घेऊनी का जम्बुकाचें कातडें ?

शान्ततावादी बना सामर्थ्य अङगीं आणुनी,
व्यर्थ आत्मानात्मचिन्ता कां ? बघा देहाकडे.

काय हो शेळ्या हजारों ऐकटया वाघापुढे
देववत निश्चेष्ट देखा कागदींचे आकडे ?

देश - धर्म - स्त्री - त्रयीची या प्रतिष्ठा साण्डुनी
वाचवूं स्वप्राण पाही आर्य तो हें ना घडे.

मार खाऊनी जगावें - अप्रतिष्ठा ती नको !
क्षत्रियाला क्षेत्र - तीर्थी मृत्यु कार्यीं आवडे.

२१ ऑगस्ट १९२६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP