मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
ही तल्लख गोड कोण बाल ? ऐल...

गज्जलाञ्जलि - ही तल्लख गोड कोण बाल ? ऐल...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


ही तल्लख गोड कोण बाल ?
ऐल्लास अहा ऊतास आला !
ये लुब्धक सोडुनी नभाला
का ऐन्दु सरोवरांत न्हाला ?

आरक्त गमे जणू ऊषा ही,
वा आस हसे दिशांत दाही;
चापल्य असें न तीस काही,
प्याल्यांत पडे विवर्ण हाला.

नेत्रांत पहा न भीति कोठे,
कौतूहलपूर मात्र लोटे.
थारेल कसें समोर खोट ?
हा रोख जणू सतेज भाला !

ज्योत्स्नेपरि सौम्य सज्जनाशी,
नाही परि ही परप्रकाशी;
ओढूं न बघे कुणास पाशीं,
टाकी न कुणावरी हवाला.

पाहूनि हिला मनास वाटे,
चौफेर पुन्हा वसन्त थाटे,
जाती लपुनी फुलांत काटे,
कां घालुं नये गळ्यांत माला ?

सञ्जीवन हें कुणास साधे ?
लाभे तुझियाच हें प्रसादें.
जो पात्र तुझ्या कृपेस त्या दे,
गाठील न तो कृतान्त काला.

ती आस नसे मला जराही,
मी हा विरहांत दूर राहीं;
तूझ्या स्मरणें परी धरा ही
होऊ मज रम्य यज्ञशाला.

७ फेब्रुवारी १९३३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP